You are currently viewing आपण इथे बसलो तरी मन मात्र बऱ्याच ठिकाणी भटकून येते, मनावर स्वतःचा ताबा हवा :- सद्गुरु श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

आपण इथे बसलो तरी मन मात्र बऱ्याच ठिकाणी भटकून येते, मनावर स्वतःचा ताबा हवा :- सद्गुरु श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

*आपण इथे बसलो तरी मन मात्र बऱ्याच ठिकाणी भटकून येते, मनावर स्वतःचा ताबा हवा :- *सद्गुरु श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी*

*हजारोंच्या उपस्थितीत अध्यात्म केंद्र माठेवाडा, सावंतवाडी येथे पार पडला सत्संग आनंद सोहळा*

कणेरी मठ संस्थानचे मठाधिपती प.पू.श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींच्या अमृतवाणीने सावंतवाडी सह जिल्हा आणि गोव्यातील अनेक भक्तगण सुखावले. गेली दोन तीन वर्षे कोल्हापूर कणेरी मठावरून स्वामीजींचे कोरोना परिस्थितीमुळे सावंतवाडी अध्यात्म केंद्रात प्रवचन, मार्गदर्शन लाभले नव्हते. परंतु यावर्षी कणेरी मठ येथे जवळपास तीस लाख लोकांच्या उपस्थितीत न भूतो न भविष्यती असा “पंचमहाभूत लोकोत्सव” पार पडल्यावर श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींनी स्वतः सावंतवाडी येथील अध्यात्म केंद्रात प्रवचनासाठी येण्याचं कबूल केलं आणि काल पार पडलेल्या सत्संग आनंद सोहळ्यात आपल्या अमृतवाणीतून स्वामींनी भक्तगणांना अक्षरशः भारावून सोडले.


*”जो वर जातो तो कधी न कधी खाली येतो आणि जो खाली असतो तो कधीतरी वर जातोच…हा निसर्ग नियमच आहे…* त्यामुळे कुणीही चांगली परिस्थिती असताना माजू नये…प्रत्येकाला चांगल्या वाईट परिस्थितीतून जावे लागते…कर्माचे भोग असतात ते…अशी शिकवण दिली.
हजारोंच्या उपस्थितीत अध्यात्म केंद्र माठेवाडा, सावंतवाडी येथे पार पडलेल्या सत्संग आनंद सोहळ्याचा आनंद जिल्ह्यासह गोवा येथील अनेक स्वामी भक्तांनी घेतला. *आपण इथे सत्संगात जरी बसलो तरी आपले मन मात्र आपल्या घरी जाऊन घरात काय चाललंय हे पाहून येते* अगदी मनसोक्त भटकून येते परंतु एखादा सिनेमा पाहताना किंवा टीव्हीवरील सिरीयल पाहताना तासनतास मन त्या सिरीयल मध्ये सिनेमांमध्ये रंगून जातं. तशाचप्रकारे मन जर सत्संग, अध्यात्मामध्ये रंगून राहिलं तर नक्कीच मानवाला सुखाची प्राप्ती होईल मानवाची दुःख सुखात बदलून जातील. अशा प्रकारे अनेक उदाहरणे देत स्वामीजींनी मन आणि माणसाची अवस्था याचे अत्यंत सोप्या शब्दात विवेचन केले.
श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींचे सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी श्री काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट, अध्यात्म केंद्र सावंतवाडी येथे आगमन झाले. *”जय गुरु जय जय गुरु… जय गुरु जय जय गुरु…!* चा गजर करत टाळांच्या निनादात दिंडीने स्वामींचे अध्यात्म केंद्र सावंतवाडी येथे स्वागत करण्यात आले. सावंतवाडी अध्यात्म केंद्रातील सुवासिनींनी आरती ओवाळली तदनंतर स्वामींची पाद्यपूजा करण्यात आली. दूरदूरवरून आलेल्या अनेक भाविकांनी, भक्तगणांनी स्वामींचे दर्शन घेतले. अध्यात्म केंद्र सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सुंदर अशी रोषणाई करून विशाल मंडप सजवला होता. त्यामुळे कार्यक्रमास शोभा आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच अध्यात्म केंद्र सावंतवाडी येथे गेली साडेतीन वर्षे योगाभ्यास घेणाऱ्या डॉ.संगीता तुपकर यांच्या योगसाधकांनी सूर्यनमस्कार व चंद्र नमस्कार सादर करून त्यांचे उपयोग सर्व भक्तगणांना माहित करून दिले. योगाभ्यासानंतर नेहमीप्रमाणे दासबोध वाचन करून अध्यात्मिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वामींनी आपल्या प्रवचनातून अध्यात्माचे महत्त्व आपल्या जीवनात काय आहे हे आपल्या अमृतवाणीतून भक्तगणांना सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच झालेल्या योगाभ्यासाचा आधार घेत पतंजली योगाचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे सांगताना, स्वामींनी आपण नेहमी जी कामे करतो त्या कामातून आपला व्यायाम होत नसतो तर नित्याची कामे आणि व्यायाम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे पटवून दिले. योग करताना डावीकडे वळतो किंवा उजवीकडे वळतो पाठीमागे झुकतो, पुढे झुकतो याने आपल्या शरीराच्या विविध भागांमध्ये साचलेली चरबी पातळ होऊन घामाद्वारे, लघवीद्वारे, संडासद्वारे आपल्या शरीरातून निघून जात असते. त्यामुळे योगाचे विविध प्रकार करणे हे आजच्या धकाधकीच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे, असे सांगून योगाभ्यासाकडे गांभीर्याने लक्ष द्या असे सुचित केले. अनेक वेगवेगळी उदाहरणे देत स्वामींनी आपल्या अमृतवाणीतून सर्व भक्तगणांना मंत्रमुग्ध करून सोडले होते. त्यामुळे स्वामींची अमृतवाणी ऐकण्यासाठी आलेल्या प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
कणेरी मठ येथे झालेल्या पंचमहाभूत लोकोत्सवात अनेकांनी सहभाग घेतला होता. परंतु प्रत्यक्ष स्वामींचे दर्शन कित्येकांना झालेच नव्हते. त्यामुळे सावंतवाडी अध्यात्म केंद्र येते पार पडलेल्या “सत्संग आनंद सोहळ्यात” अनेकांनी स्वामींचे चरण स्पर्श करून दर्शनाचा लाभ घेतला. स्वामींच्या प्रवचनानंतर आरती होऊन अध्यात्मिक कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सत्संग आनंद सोहळ्याच्या शेवटी व्यासपीठावरच भक्तगणांसाठी स्वामींच्या दर्शनाची रांगेत व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे श्रीकाडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट अध्यात्म केंद्र सावंतवाडीने आलेल्या सर्व भक्तगणांसाठी महाप्रसादाची सोय केली होती. श्री काडसिद्धेश्वर गुरुभक्त, बंधू-भगिनींनी महाप्रसादाचा येथेच्छ लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या वेळी दरवर्षी महाप्रसादासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश पै यांचा स्वामींच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. स्वामींनी काही दिवसापूर्वी कोल्हापूर कणेरी मठ येथे झालेल्या पंचमहाभूत लोकोत्सवात अमूल्य असे योगदान देणाऱ्या आणि सर्व कार्यक्रम नीटनेटका, पद्धतशीरपणे पार पडण्यासाठी सहकार्य केलेल्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे शिक्षण व मराठी भाषा मंत्री, सावंतवाडीचे नाम.दीपक केसरकर यांचाही गौरवाने नामोल्लेख करून सहकार्याबद्दल आभार मानले. सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष श्री.प्रेमानंद उर्फ बबनराव साळगावकर यांनी देखील कार्यक्रमास हजेरी लावून आस्वाद घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा