You are currently viewing महिला प्रीमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात मुंबईने रचला इतिहास

महिला प्रीमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात मुंबईने रचला इतिहास

हरमन-इशाकच्या कामगिरीने गुजरातचा पराभव

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

महिला प्रीमियर लीगला शनिवारी (४ मार्च) नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर एका नव्या अध्यायाला धमाकेदार सुरुवात झाली. अभिनेत्री कियारा अडवाणी, क्रिती सॅनन आणि पॉप गायक एपी धिल्लन यांनी पहिल्या उद्घाटन समारंभात आपल्या सादरीकरणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. पाठोपाठ हरमनप्रीत कौर आणि युवा फिरकी गोलंदाज सायका इशाक यांनी त्यांच्या कामगिरीने मुंबई इंडियन्सला गुजरात जायंट्सवर मोठा विजय मिळवून दिला.

मुंबई इंडियन्सने पहिला सामना १४३ धावांनी जिंकला. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने २० षटकांत ५ गडी गमावून २०७ धावा केल्या. त्यांनी भारतीय भूमीवर टी२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला. भारतातील महिला क्रिकेटमध्ये टी२० सामन्यात २०० हून अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुजरात संघाला प्रत्युत्तरात १५.१ षटकांत 9 गडी गमावत ६४ धावाच करता आल्या.

गुजरातची कर्णधार बेथ मुनी पहिल्याच षटकात दुखापतीमुळे बाहेर पडली त्यामुळे ती फलंदाजीला आली नाही. गुजरात संघाला हा पराभव लवकरच विसरावा लागणार आहे. दुसऱ्याच दिवशी रविवारी (५ मार्च) संघाला दुसरा सामना खेळायचा असल्याने त्याला पुरेशी विश्रांती मिळणार नाही. याच मैदानावर गुजरातचा सामना यूपी वॉरियर्सशी होणार आहे.

मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीतने मैदानात उतरताच धावा करायला सुरुवात केली. एका वेळी तीने सलग सात चेंडूंत सात चौकार मारले होते. हरमन ज्या पद्धतीने फलंदाजी करत होती ते पाहून मला न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्युलमची आठवण झाली. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासातील पहिल्याच सामन्यात मॅक्युलमने तुफानी खेळी केली. कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध १५८ धावा केल्या होत्या. हरमनने त्याच पद्धतीने फलंदाजी केली. तिच्या खेळीने स्पर्धेला धमाकेदार सुरुवात झाली.

मुंबईकडून हरमनप्रीत कौरने सर्वाधिक ६५ धावा केल्या. तिने ३० चेंडूंच्या खेळीत १४ चौकार मारले. तिलाच सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. सलामीवीर हिली मॅथ्यूजने ३१ चेंडूत ४७ आणि अमेलिया केरने २४ चेंडूत नाबाद ४५ धावा केल्या. गुजरातकडून स्नेह राणाने सर्वाधिक दोन बळी घेतले. तर गुजरातसाठी केवळ दयालन हेमलता आणि मोनिका पटेल यांना दुहेरी आकडा गाठता आला. हेमलताने २३ चेंडूत नाबाद २९ धावा केल्या. हेमलताच्या बॅटमधून एक चौकार आणि दोन षटकारही निघाले. मुंबईकडून सायका इशाकने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. नताली सीव्हर आणि अमेलिया केर यांना प्रत्येकी दोन गडी बाद केले.

उद्या स्पर्धेतला दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स दुपारी ३:३० वाजता तर उत्तर प्रदेश वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स हा सामना रात्री ७:३० वाजता होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा