You are currently viewing भारत-चीन मित्र का शत्रू (भाग-१)

भारत-चीन मित्र का शत्रू (भाग-१)

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा लेख –

 

भारत-चीन मित्र का शत्रू (भाग-१)

 

भारत आणि चीनचे संबंध अनेक वर्षापासून पडद्याच्या वेगवेगळ्या पातळीवर वर-खाली होत आहेत. तसं पाहिलं तर दोन्ही देशाच्या इतिहासात दोघांचा कधी संबंध आला नाही. एक शेजारी म्हणून हजारो वर्ष आपण एकत्र राहत आहोत. कधी संघर्ष ही झाला नाही आणि कधी राजकीय संबंधही आला नाही. काही प्रवासी आले गेले एवढेच काय ती एकमेकाबद्दल माहिती. बुद्ध धम्म हा भारतामधुनच चीनमध्ये गेला आणि मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. दोघांच्या मध्ये तिबेट हा देश होता. इंग्रज सुद्धा समजायचे हा देश अतिश्रीमंत आहे. काही समज असे होते की तिबेट स्वर्ग आहे आणि बऱ्याच लोकांनी तिबेटमध्ये जाऊन त्याबद्दल माहिती घेण्याचा आणि लिखाण करण्याचे प्रयत्न केले. पण तिबेटी लोकांनी कोणालाच तिकडे येऊ दिलं नाही किंवा राहू दिलं नाही. परदेशी लोकांबरोबर तिबेटीयन लोकांचा फार जास्त संबंध कधीच आला नाही. कारण तिबेटी लोकांनी कुणाला जवळ येऊन दिले नाही. १९४७ आणि १९५० मध्ये दोन्ही देश स्वतंत्र झाले. त्या अगोदर इंग्रजांच्या काळामध्ये या भागाचा पूर्ण ताबा इंग्रजांकडे होता. चीन फार कमजोर होता. त्याचा फायदा घेऊन तिबेट हा स्वतःला स्वतंत्र देश मानत होता. तिबेट आणि ब्रिटिश इंडियामध्ये करार झाला होता. ज्या अनुरूप अरुणाचलची सीमा निर्धारित करण्यात आली होती आणि त्याबरोबर करार करून अरुणाचल प्रदेश हा ब्रिटीश इंडियामध्ये सामील झाला. पण ह्या कराराला चीनने कधीही मानलं नाही. चीनच्या म्हणण्याप्रमाणे इंग्रजांना तिबेटबद्दल करार करायचा कुठलाही अधिकार नव्हता. त्यामुळे अरुणाचल प्रदेश आणि तिबेटच्या मध्ये सीमा म्हणून मॅकमोहन लाईन बनवण्यात आली, ती बेकायदेशीर आहे व अरुणाचल प्रदेश हा चीनचा एक भाग आहे, असे चीनने नेहमी मानले. हा मूळचा कळीचा मुद्दा आहे.

दुसरीकडे लडाख भागामध्ये सीमा कधीच निर्धारित करण्यात आली नव्हती आणि इंग्रजांनी जी लाईन बनवली ती भारत आणि चीनमध्ये सीमा आहे असं मानण्यात आलं आणि स्वातंत्र्यानंतर भारताने तीच सीमा निर्धारित केली. म्हणून लडाख भागात असो की अरुणाचल भागात असो जो इतिहास आणि सीमा आम्हाला दिल्या त्या दोन्ही देशांमधील सीमा अनिर्णयीत राहिल्या. दोन्ही देशांना त्या मान्य नव्हत्या. यामध्ये दोन्ही देशांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन्ही देशांचा संबंध सुधारण्याचा प्रयत्न झाला व ‘हिंदी चिनी भाई भाई’ असा नारा सुद्धा त्या काळामध्ये देण्यात आला. त्या काळामध्ये अमेरिका आणि युरोप यांचे ‘नाटो’ हे गटबंधन झाले. सोवियत संघाचे दुसरे गटबंधन झाले आणि या दोन्ही गटबंधनाचे आपापसामध्ये प्रचंड वैर निर्माण झालं. त्याला ‘शीतयुद्ध’ म्हणतात. अर्थात चीन कम्युनिस्ट देश होता, म्हणून नैसर्गिकरित्या तो सोवियत संघाबरोबर गेला. भारत देखील एक समाजवादी देश म्हणून पुढे येऊ लागला. प्रचंड दारिद्रयामुळे भारताला वेळोवेळी एक वेगळी भूमिका घ्यावी लागली आणि भारताने गटनिरपेक्ष देश अशी संघटना बनवली. या देशांचे तत्त्व असे होते की आपण कुठल्याही गटबंधनांमध्ये जायचं नाही. पण प्रत्येक गटनिरपेक्ष देशाला वेळोवेळी कुठल्या गटबंधनाबरोबर जायचे हा अधिकार होता. म्हणून या शीतयुद्धाचा काळात भारत आणि चीन देखील कुठल्याही गटबंधनाचे भाग कधी झाले नाहीत आणि दोघांनी मिळून सुद्धा कुठली भूमिका घेतली नाही. त्यामध्ये १९६२ उजाडला, त्यावेळी सीमावाद निर्माण झाला. चीनने तिबेटवर कब्जा केला होता आणि तिबेट हा आपलाच देश आहे, आपलाच भाग आहे, असे ऐतिहासिक दृष्ट्या पुरावे देऊन सिद्ध केले होते. भारताने देखील तिबेट हा चीनचा भाग आहे, म्हणून मान्यता दिली होती. त्या काळात आश्रय घेण्यासाठी दलाई रामाबरोबर तिबेटचे लोक भारतात आले आणि तेव्हापासून धर्मशाळा येथे ते भारतात राहत आहेत. भारताने अजून देखील तिबेट हा स्वतंत्र देश आहे हे मान्य केलं नाही. तिबेट हा चीनचाच भाग आहे असेच मान्य केलेले आहे. पण तेथील आश्रय दात्यांना येथे आश्रय देण्यात आलेला आहे व त्यांची चळवळ भारतातच एक स्वतंत्र देश बनवण्याची चळवळ चालू आहे. भारत त्यांना पाठिंबा देत नाही, पण विरोध देखील करत नाही. ही भारताची भूमिका पहिल्या पासून आजपर्यंत राहिलेली आहे. या पार्श्वभूमीवर १९६२ चे युद्ध पेटले. लढाऊ क्षेत्रामध्ये अक्षय चीन भागांमधून चीन आणि तिबेटमध्ये जाणारा रस्ता बनवला. त्याला भारताने फार उशिराने विरोध केला. लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये राजकीय नेत्यांनी नेहमीप्रमाणे भाषणे केली. “आखरी गोली आखरी जवान तक लढेंगे|” अशा वल्गना केल्या.

तत्कालीन चीनचे प्रमुख माऊ हे पहिले चीनचे प्रमुख एका मध्यमवर्गीय कुटुंबातून होते. त्यांची आई शिक्षिका होती आणि कट्टर बुद्दिष्ट होती. वडील सदन शेतकरी होते व अत्यंत कडक शिस्तीचे होते. माऊ सामान्य कुटुंबात वाढले. त्यामुळे त्यांच्यात गरिबांसाठी आस्था होती. म्हणून ते कम्युनिस्ट झाले व आयुष्यभर कम्युनिजमचा प्रसार करायचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांची मानसिकता साम्राज्यवादाची नव्हती. म्हणून इतर देशांवर राज्य करून प्रभाव पाडणे त्यांनी फार प्रयत्न केला नाही. पण अमेरिके विरोधाच्या लढाईमध्ये त्यांनी अनेक देशांना मदत केली. जसे अमेरिका दक्षिण कोरिया युती झाल्यावर चीनने उत्तर कोरियाला मदत केली आणि घमासान युद्ध सुरु झाले. या पार्श्वभूमीवर बघताना माऊचा भारतावर हल्ला करण्याचा किंवा भारतावरचे अधिकार गाजवायचा त्यांचा प्रयत्न नसावा. पण त्या काळामध्ये सीमारेषा निश्चित झालेल्या नव्हत्या आणि प्रत्येक देश आपला अधिकार वाढवायचा प्रयत्न करत होता. लडाख भागामध्ये अक्षयचीन मधून चीनने रस्ता काढला, जो भारताच्या सीमारेषेत होता. ते एक आक्रमणच होते. लोकसभेच्या भाषणांमध्ये गरमागरमी भरपूर होती. खासदार म्हणायचे की आखरी गोली और आखरे जवान तक लढेंगे. पण सैन्याच्या परिस्थितीचा आढावा आणि माहिती कुणालाच नव्हती. त्यात सैन्याचे राजकारण सुद्धा करण्यात आले. अत्यंत कर्तव्यदक्ष असणारा जनरल थोरातला सैन्याचे प्रमुख न बनवता सप्लायमध्ये काम केलेल्या जनरल कौल यांना सैन्याचे प्रमुख केले. सैनिकाकडे थंडीत घालता येणारे बूट नव्हते. हत्यार देखील जुनेच होते. थ्री नोट थ्री रायफल होती आणि सैन्य अजिबात युद्धाच्या तयारीत नव्हते. राजकीय लोकांना त्याची जाणीवच नव्हती. त्यावेळेला चीन म्हणत होता की, आपण चर्चा करून प्रश्न सोडवूया, पण पंडित नेहरू आणि सर्व राजकीय नेत्यांनी म्हटले की आधी तुम्ही परत जा आणि मग चर्चा करू. चीन म्हणत होता की आधी चर्चा करू आणि मग निर्णय झाल्यावर मागे जाण्याचा वगैरे विचार करू, सीमारेषा निश्चित करू आणि मग कारवाई करू. आपल्याला माहीतच आहे की जेव्हा युद्धाच नाव निघतं तेव्हा आपली सारी जनता आक्रमक होते आणि या भूमिकेतून १९६२ च युद्ध झालं, त्यात प्रचंड पराभव झाला. अनेक जवान आखरी गोली आखरी जवान तक लढले. शौर्यामध्ये वीरतेमध्ये भारतीय जवान कुठे कमी पडले नाहीत. पण चौका-चौकामध्ये लढले आणि आत्मसमर्पण केले. पण शक्तीमध्ये कमी पडल्यामुळे चीनचा विजय झाला. चीनने जवळजवळ अरुणाचल प्रदेश, आसामपर्यंत कब्जा केला होता. लडाख सीमेवर सुद्धा अनेक भाग कब्जा केला. पण युद्धबंदी झाल्यावर चीनचे सैन्य परत गेले. तेव्हापासून १९८७ पर्यंत भारत चीनचा काही संबंध नव्हता. राजीव गांधींनी १९८७ साली आणि नंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी चीनमध्ये जाऊन संबंध सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला. आजपर्यंत सीमा भागात शांतता प्रस्थापित केलेली आहे. पण मध्ये मध्ये लुटूपुटुच्या लढाई झाल्या. पण दोन्ही सैन्यांनी शस्त्राचा वापर टाळला आणि त्यामुळे युद्ध झालं नाही. दोन्ही देशानी संयम पाळलेला आहे. दोन्ही देशांमध्ये सीमा भागाचा करार झालेला आहे व तेथे बॉर्डर ऐवजी लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल (LAC) निर्माण केली आहे. तरी देखील देशांमध्ये कायमचा तणाव बनलेला आहे, पण अनेकदा एकमेकाला सावरून घेतलेले आहे.

चीन भारत सीमा किंवा एल.ए.सी. हे ३४८८ कि.मी.ची आहे. जम्मू आणि काश्मिरबरोबर १५९७ कि.मी., हिमाचल प्रदेश बरोबर २०० कि.मी., उत्तराखंड बरोबर ३४५ कि.मी., सिक्कीम बरोबर २२० कि.मी. आणि अरुणाचल प्रदेश बरोबर ११२६ कि.मी., तिथे आय.टी.बी.पी. १७३ बॉर्डर पोस्ट आहे. त्याचबरोबर दोन्ही एल.ए.सी.च्या दोन्ही बाजूला चीन आणि भारत सेना तैनात आहे. गेल्या ७५ वर्षात अनेक तणावग्रस्त प्रसंग उद्भवले आहेत. त्यातला सर्वात जास्त घालवण हे लडाख मधील व्हॅली २०२० आणि तवांगमध्ये अरुणाचल प्रदेश २०२२ मध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष झाला. साधारणत: २०१३ नंतर संघर्ष वाढला आहे. पण हे का झाले? ह्याचा सुद्धा आढावा घेतला पाहिजे. दोघांच्या मैत्रीमध्ये सुधारणा कधी झाली नाही. दोघांचा एकमेकाकडे बघण्याचा संशयास्पद दृष्टिकोन आहे. इतके वर्ष झाली तरी दोन्ही देशांना आपली सीमारेषा बनवता आलेली नाही. १४ भागांमध्ये सीमारेषा बनवण्याचे काम चालू आहे, ह्या सर्व भागांमध्ये सीमारेषा निर्धारित केल्यानंतर एक पूर्ण सीमारेषा बनेल. त्यात तिबेटन लोकांचा दलाई रामाच्या वारसाचा प्रश्न आहे. त्यामुळे संघर्ष वाढण्याची शक्यता जास्त आहे.

चिनीने आर्थिक प्रगती १९८० नंतर झपाट्याने केली आहे. चीनचा जीडीपी भारताच्या पाचपट आहे. म्हणजे दोन्ही देशांमध्ये गॅप १४ ट्रिलियन डॉलरचा आहे. आणि पुढच्या काळामध्ये जरी विकासदर चीनचा भारतापेक्षा कमी झाला असता तरी पंधरा वर्षांमध्ये विषमता २० ट्रिलियन डॉलरची होणार आहे. दोन्ही देशाच्या मिलिटरी मध्ये अंतर आहे, पण भारताला संरक्षण हिमालय आणि हिंद महासागर देतो. भारताला या सर्व गोष्टीचा आढावा घेऊन सर्व क्षेत्रात आर्थिक, सामाजिक आणि सैनिक क्षेत्रात पुढे जावे लागणार आहे. शेवटी चीनशी स्पर्धा ही अटळ आहे.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. न. ९९८७७१४९२९

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =