You are currently viewing संजना हळदिवे यांना सर्वोत्कृष्ट महिला पत्रकार पुरस्कार

संजना हळदिवे यांना सर्वोत्कृष्ट महिला पत्रकार पुरस्कार

बांदा येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण संपन्न

कणकवली

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई / सिंधुदुर्ग संलग्न इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा बांदा येथील आनंदी मंगल कार्यालय येथे रविवार, १९ फेब्रुवारीला पार पडला. सोहळ्यात फोंडाघाट येथील पत्रकार तथा ‘कोकण एक्सप्रेस च्या संपादिका सौ. संजना हळदिवे यांना सर्वोत्कृष्ट महिला पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुरस्कार प्रदान करताना व्यासपिठावर सेवानिवृत्त कॅप्टन शंकर भाईप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ. अर्चना घारे – परब, उद्योजक विशाल परब,बांदा सरपंच सौ. प्रियंका नाईक, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग संपर्कप्रमुख बाजीराव फराकटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष रमेश परब, माजी शिवसेना महिला तालुकाप्रमुख अपर्णा कोठावळे, बांदा वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, राष्ट्रवादीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ गोवा संपर्कप्रमुख शिवाजी नेहे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन जिल्हा सरचिटणीस राकेश केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

संजना हळदिवे गेली सहा ते सात वर्षे पत्रकारितेत कार्यरत आहेत. चार वर्षांपूर्वी, अगदी कोरोनाचे संकट असतानाही त्यांनी स्वत : चे ‘कोकण एक्सप्रेस’ नावाचे ‘ डिजिटल न्यूज चॅनेल ’ सुरु करण्याचे धाडस दाखवले. असा स्वत:चा न्यूज चॅनेल सुरु करणाऱ्या संजना या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या महिला पत्रकार आहेत. या चॅनेलच्या माध्यमातून पत्रकारिता करताना त्यांनी अनेक अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला आहे. विशेष म्हणजे मुळ कोल्हापूरच्या असणाऱ्या संजना या लग्नानंतर कणकवली तालुक्यात आल्या. मात्र, सिंधुदुर्ग हीच कर्मभूमी मानून त्या पत्रकारितेत कार्यरत आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मराठी पत्रकार संघाने पुरस्काराने गौरविले आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल संजना यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तर यापुढेही पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजातील समस्या, प्रश्नांची सोडवणूक करणार असून सदैव वस्तुनिष्ठ बातमीदारी करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही संजना यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा