You are currently viewing घुंगरू…
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

घुंगरू…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य… लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम विनोदी ललित लेख*

*घुंगरू….!*

गुलाबी थंडीचे मंतरलेले दिवस…दिनकर निशेला भेटण्यासाठी पश्चिमेला निघाला होता…चंदेरी केसरी किरणांची टेकडीवर दाटी होऊ लागली… तरू वेलींच्या पानापानांतून निरोप घेणारी मृदू किरणे हळूच डोकावून पाहू लागलेली…देवघरात दिवे लावणीची वेळ होताच मी दुचाकीने गावची वेडीवाकडी वळणे पार करतच…हवेतील गारवा कधी कानांना तर कधी डोळ्यांना झोंबत असतानाही आपल्याच धुंदीत शहराकडे निघालो होतो… सायंकाळ होताच झाडा झुडपातून ऐकू येणारी पक्ष्यांची किलबिल…नदीच्या किनाऱ्याने गाडी जातानाचा पाण्याचा खळखळाट…अंतरी साठवित मार्गक्रमण सुरू होते.. अंगावर गुलाबी थंडीने काटे उभे राहत होते…”ये राते ये मौसम नदी का किनारा ये ठंडी हवा….” हे आवडते गाणे गुणगुणत मित्राच्या वाढदिवसाची पार्टीची नशा डोक्यात चढवत शहरातील रस्त्यांवरच्या झगमगीत दिव्यांच्या उजेडात पोचलो..!
वाढदिवसाची पार्टी नेहमीप्रमाणेच…शहरातील त्याच्याच आलिशान बंगल्याच्या टेरेसवर…! झगमग करणारे विविध दिवे…सोनेरी हॅलोजन दिव्यांचा मंद प्रकाश… केक कापताना झालेली फुलांच्या पाकळ्यांची उधळण…आणि “बार बार दिन ये आये…तुम जियो हजारो साल…” म्हणत दिलेल्या शुभेच्छा…कुणाच्या थंस्अप तर कुणाच्या बियरच्या ग्लासचे चिअर्स रंगात आले…काही नशेत धुंद झाले अन् काही तंदुरच्या भट्टीसमोर कोंबड्यांवर ताव मारत पोट पूजा करून थंडीने गारठलेले हात शेकत जेवून तृप्त झाले… बियरचे घोट रिजवता रीजवता भुतांच्या गोष्टी सुरू झाल्या…कॉलेजात असताना रात्रीच्या वेळी आंगणेवाडीच्या जत्रेतून येताना एसटी स्टॉपवर दिसलेली सफेद साडीतील बाई…तिच्या सावकाश हालचाली आणि दुचाकीची किक मारताना उडालेली धांदल… भर थंडीत अंगातून वाहून गेलेला घाम… बियरची किक लागल्यावर एकाने अगदी रंगवून सांगितला…नदीच्या काठावर असलेल्या आंब्याच्या झाडाच्या आडव्या फांदीवर पाय हलवत पहाटे चार वाजता बसलेला पोरगा… किड्यांचे किर्र किर्र करणारे आवाज…पाण्याचा खळखळाट…अंगावर भीतीने आलेले शहारे सारं काही सांगताना दुसऱ्या मित्राने हिरव्या आंब्याच्या फोडींना मीठ मसाला लावून खिरमिटलं करतात तसं मीठ मसाला लावून सांगितलं… रात्रीच्या काळोखात घुंगरू बांधलेला दांडा…पायात चामड्याचे भले मोठे चप्पल…त्या चपलांचा करर्र कर्र आवाज… अन् खांदावर घोंगडी घेऊन फिरणारे देवचार…एकापेक्षा एक थरार… सर्वजण एकत्र असताना ऐकायला मजा आली…
रात्रीचे बारा वाजून गेले…अंगात उष्णता वाढल्याने थंडीही वाजत नव्हती…घरी जाण्यासाठी सर्व बाहेर पडलो… गाडीला किक् मारायला लागलो…पण गाडी चालू होईना…काही वेळ कसरत केल्यावर मित्राने स्वतःची दुचाकी देत म्हणाला “ही गाडी घेऊन जा…मी घेईन तुझी गाडी दुरुस्त करून…” गाडीचा प्रश्न मिटला… “चल मेरे घोडे तुडूक् तुडूक्…” करत पुन्हा एकदा शहरातील आलिशान बंगले…इमारती…गुळगुळीत रस्ते… अन् झगमग करणाऱ्या दिव्यांना निरोप देत गावातील किर्द काळोखाने वेढलेल्या रस्त्याकडे माझी गाडी वळली… दिव्यांची रोषणाई बंद झालेली…दोन्ही बाजूला झाडांनी वेढलेले रस्ते…अमावास्येचा दाट अंधार… अन् त्यात आपलेसे वाटणारे म्हणजे झगमगणारे काजवे…!
डोक्यात आणि डोळ्यासमोर येत होत्या त्या पार्टीत ऐकलेल्या भुतांच्या गोष्टी…खडबडीत, खड्ड्यांच्या रस्त्यावर गाडी हळूहळू चालू लागली तसा घुंगरू वाजल्याचा आवाज कानावर येऊ लागला… मनातील भास समजून गाडीचा वेग वाढवला तसा आवाज सुद्धा जोराने माझ्या मागून कुणीतरी येतोय तसा वाटू लागला… मागे पाहण्याची हिंमतच नव्हती…रात्रीच्या वेळी देवचार फिरतात असं मित्रांने पार्टीत सांगितलेलं पुन्हा पुन्हा आठवू लागलं… मागून देवचार लागला की काय म्हणून खड्यांची पर्वा न करताच गाडीचा वेग वाढवला… थंडीतही धरधरून घाम फुटला… घामेजलेल्या अंगाला आता मात्र थंडी बोचू लागली…भीतीने अंगावरचे केस उभे राहिले…जणू माझ्या अगोदर स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तेच सज्ज झाले होते… अन् एक, दोन, तीन म्हणताच पळत सुटणार होते…
घुंगरुंचा आवाज आता तर माझ्या सोबतच चालल्याचा भास होऊ लागला…नदीच्या काठावरच्या रस्त्यावर येताच एका बाजूचे जंगल भीतीदायक तर नदीचा काठ आश्वासक वाटू लागला…देवचार पाण्यातून येणार नाही म्हणून जंगलाकडे न पाहता गाडी सुसाट सोडली…
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे….
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे…
निःशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले…
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले…
रात्रीस खेळ चाले..रात्रीस खेळ चाले…
हे गाणे डोक्यात जोरजोरात वाजू लागले…
गावची सीमा ओलांडली… पण देवचार का पाठ सोडेना… कुणाकडून तरी ऐकलेलं…”देवचार सीमेच्या बाहेर जात नाहीत…” पण, हा तर घरापर्यंत पाठलाग करत आलेला…. गावात अंधार गडद होता…घरांचे दिवे बंद झालेले…स्मशान शांतता पसरलेली…
“एक खेळ लपाछपीचा…तू पण ये ना खेळायला…रोज नवा हा खेळ भासांचा…” असं गाणं गात कोणीतरी बोलवतय असा भास होऊ लागला… अन् घराच्या समोर आलो…गाडी अंगणात उभी करून चावी खेचतच पायऱ्या चढून अंगणातील विजेचा दिवा सुरू केला…
“उजेडात देवचार दिसत नाहीत म्हणे”
अन् मागे वळताना हातातील गाडीची चावी पायऱ्यांवरून गरंगळत खाली पडली…आणि तिच्यासोबत देवचार…!
मित्राच्या गाडीच्या किचैनला घुंगरू होता आणि गाडी चालताना तोच तर वाजत होता… देवचाराच्या काठीच्या घुंगरू सारखाच….!!

©[दीपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा