वैभववाडी
महाराष्ट्र आणि छ.शिवाजी महाराज यांचे अतुट नाते आहे. महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापन करुन त्यांनी अद्वितीय कामगिरी केली आहे. सतराव्या शतकाच्या प्रारंभीचा राजकीय परिस्थिती पाहता त्यांनी शुन्यातून स्वराज्य निर्माण केलेले दिसते. भारताच्या मध्ययुगीन इतिहासाची सर्व समिकरणे बदलून पुरोगामित्वाचा नवा विचार दिला. या शिवविचारांचे आचरण झाले पाहिजे, असे प्राचार्य डॉ. सी.एस.काकडे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील सांस्कृतिक व इतिहास विभाग तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शिवजयंती कार्यक्रम प्राचार्य डॉ. सी.एस. काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा.ए.एम.कांबळे,आयक्युएसी समन्वयक डॉ.डी.एम.सिरसट, प्रमुख मार्गदर्शक प्रा. एस. एन. पाटील, डॉ.आर.एम.गुलदे व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डी.एस.बेटकर उपस्थित होते.
सुरवातीला दिप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमापूजन करण्यात आले.
राज्य सरकारने दि.१९ फेब्रुवारी, २०२३ पासून राज्यगीत म्हणून जाहीर केलेले ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत सादर करण्यात आले. महाविद्यालयातील कु.पुजा साखरपेकर व कु.शुभम राणे यांनी आपल्या मनोगतातून शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.
छ.शिवाजी महाराजांनी शेती, शेतकरी आणि शेतमजूर यांच्यासाठी केलेले कार्य महत्त्वपूर्ण असे आहे. ‘शेतकरी सुखी तर राज्य सुखी’, शेतकऱ्याची भरभराट तीच राज्याची भरभराट ही त्यांची विचारधारा होती. राज्यातील सर्वसामान्य जनतेला अधिकारी, सेनापती, जमिनदार यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेतली होती.
अशाप्रकारे शेतकरी हिताचे विचार मांडणारे आणि अंमलबजावणी करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राज्यकर्ते होते असे प्रा.एस.एन.पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
छ.शिवाजी महाराजानी उभारलेली प्रशासन व्यवस्था ही लोककल्याणकारी व आदर्शवत होती. सर्वांसाठी समान कायदा आणि समान न्याय ही पध्दत रुढ केली. आपल्या राज्यात लोकशाहीची मूल्ये रुजविण्याचे काम छ.शिवाजी महाराजांनी केल्याचे डॉ.आर.एम.गुलदे यांनी सांगितले.
शिवजयंती निमित्त महाविद्यालयातील स्पंदन विभागाच्यावतीने भित्ती पत्रकाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डी.एस. बेटकर यांनी केले, तर डॉ.विजय पैठणे यांनी आभार व्यक्त केले.