अवैद्य धंद्यांची माहिती द्या, :पोलीस अधिकारी डॉ.रोहिणी सोळंके.

अवैद्य धंद्यांची माहिती द्या, :पोलीस अधिकारी डॉ.रोहिणी सोळंके.

रावणाच्या नाभित वार करण्यासाठी विभिषण शोधायला हवेत….

सावंतवाडीत अवैद्य दारू धंद्यांची जत्राच.

सावंतवाडीच्या नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांनी कार्यभार स्वीकारला आणि गोवा बनावटीच्या करमुक्त दारूच्या गाड्या पोलिसांकडून पकडल्या जाऊ लागल्या. अवैद्य दारू धंद्यांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना नाहीत असे वारंवार सांगितले जात होते मग यावेळी दारू वाहतूक करणाऱ्या गाड्या पोलिसांनी कशा काय पकडल्या?
१८ जुलै २०१३ च्या महाराष्ट्र सरकारच्या जी आर नुसार दारूबंदी साठी स्वतंत्र उत्पादन शुल्क खात्याला कारवाईचे अधिकार देण्यात आले होते. परंतु परमिट रूम, बारमध्ये जाऊन दारूची जंत्री तपासणारे उत्पादन शुल्क खाते परमिटरूम अथवा बार मधून गोवा बनावटीची करमुक्त दारू विकली जात असूनही त्यांच्यावर कारवाई करताना दिसत नाही. आणि पोलिसांना परमिट रूममध्ये घुसण्याचे अधिकार नाहीत, किंवा तशी माहिती पोलिसांकडून उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांना दिली गेली तरी कारवाई होत नाही किंवा परमिट रूम वाल्यांना ते अगोदरच सावध करतात. त्यामुळे अळीमिळी गुप चिळी असाच प्रकार सुरू असतो. परंतु उत्पादन शुल्क खात्याला सोबत घेऊन पोलीस त्यांच्यावर कारवाई करू शकतात, तशी कारवाई होताना का दिसत नाही?
दारूच्या गाड्यांना पायलटिंग करून सुरक्षित पोचवण्याचे काम काही जण करतात. याची माहिती खात्यातील सर्वानाच असते. त्यांची पगारापेक्षा जास्त वाढत असलेली प्रॉपर्टी, बँक बॅलन्स, यांची माहिती उच्चाधिकारी का मागवत नाहीत? दारूच्या अवैद्य धंद्यांशी निगडित असणाऱ्या खात्यातीलच अनेकांची मालमत्ता तपासली आणि चौकशी केली तर अवाढव्य मालमत्ता कुठून आली याची माहिती मिळू शकते, परंतु तशी कारवाई करणार कोण?
सावंतवाडी शहरातील दारू व्यवसायिकांशी संबंधित अनेक तरुण आपल्या दुचाकी गाडीतून दारू विक्रीचा धंदा करतात. पॉम्पस हॉटेल समोर, नरेंद्र डोंगर परिसर, कोलगाव कासारवाडा परिसरातील जंगलमय भाग इत्यादी परिसरात असे उद्योग सुरू असतात, परंतु माहिती असूनही अशा अवैध्य दारूच्या व्यवसायात असणाऱ्या मुलांवर कारवाई का होत नाही?
सावंतवाडीत कित्येक तरुण वर्ग काळ्या काचा लावलेल्या गाड्या घेऊन फिरत असतात. तलावाच्या काठावर काळ्या काचांच्या पिवळ्या गाड्या उभ्या असतात. काळ्या काचा लावून गाड्या फिरविणे नियमबाह्य आहे. परंतु गोवा बनावटीच्या करमुक्त दारूचा अवैद्य व्यवसाय करणारे हे तरुण बिनधास्तपणे काळ्या काचा लावून पोलिसांच्या समोरून फिरत असतात. परंतु ते दारूचा व्यवसाय करतात हे माहीत असूनही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का होत नाही? सूट मिळत असल्याने भविष्यात याच दारू व्यवसायातील गाड्यांमधून अनैतिक चाळे चालतात आणि त्यातूनच तरुणाईकडून आंबोली घाटातील गुन्ह्यासारखे गंभीर गुन्हे घडतात. परंतु दारू व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या वाहनांची चौकशी होत नाही ती कधी होणार?
आंबोली घाटातील मृतदेह प्रकरणात अटकेत असणाऱ्या संशयितांना ड्रग्स पुरविण्याचे काम करणारा खुफिया दोन तास हाच त्यांच्या सुटकेसाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. त्यांची चौकशी होऊन आपण अडचणीत येऊ या भीतीपोटी तो अटकपूर्व जामिनासाठी देखील राजकीय वजन वापरून वकील शोधत होता. परंतु तशा प्रकारची चौकशीच झाली नसल्याने शहराला ड्रग्सच्या नशेच्या गर्तेत लोटणारे असे कितीतरी खुफिया निर्ढावले आहेत. अशा ड्रग्सच्या विळख्यात तरुणांना लोटणाऱ्या लोकांवर कारवाई होणार की नाही?
सावंतवाडीत मटक्याचा धंदा सर्वात जास्त टपरी आणि स्टॉल वर चालतो. गेल्या ८/१० महिन्यात अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या स्टॉल ची माहिती जरी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घेतली तरी त्या टपरी उभारण्याचा उद्देश आणि त्यातून चालणारे धंदे उघड होतील. पॉम्पस हॉटेल समोर पांडवांनी गुफा खोदावी तशी एका रात्रीत उभी राहिलेली टपरी का उभारली? कोणी उभी केली हे देखील शोधल्यास मटक्याचे गुरू कोण आहेत याची जंत्री मिळू शकेल. ही जंत्री शोधली जाणार का?
पोलीस उपविभागीय अधिकारी या उच्च विध्याभूषित आहेत, त्यांनी साध्या वेशात जरी सावंतवाडीतील टपरीवर चॉकलेट घेण्यासाठी गेल्या तरी तिथे काय चालते याची सहज माहिती होऊ शकते. सावंतवाडीत उभी राहिलेली टपरींची जत्रा ही केवळ मटक्याचा धंदा वाढवण्यासाठीच उभी राहिली आहे. विद्यमान लोकप्रतिनिधी, माजी लोकप्रतिनिधी असे कितीतरी लोक मटक्याच्या जीवावर लाखोंच्या गाड्या घेऊन फिरताहेत आणि करोडोंच्या बंगल्यात एसी मध्ये लोळताहेत. असे अवैद्य मटक्याचे धंदे करणारे, ज्यातून सरकारला कर म्हणून कवडीही मिळत नाही आणि सर्वसामान्य मात्र कर भरून मेटाकुटीस येतो अशा मटक्यासारख्या अवैद्य धंद्यांवर कारवाई कधी होणार? सावंतवाडीतील टपरींची तपासणी होणार का?
सावंतवाडीत भरवस्तीत, बाहेरचावाडा येथे जुगाराच्या बैठका बसतात. लाखोंची उलाढाल अशा जुगाराच्या बैठकांमधून होत असते. धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीने चालणाऱ्या क्लबमध्ये रमी खेळली जाते, परंतु तिथे नक्की कोणते खेळ खेळतात आणि सौदेबाजी होते का याची चौकशी होणार का?
सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून डॉ. रोहिणी सोळंके यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर अवैद्य गोवा बनावटीच्या दारूच्या गाड्या पकडल्या गेल्या आहेत. तसेच अवैद्य धंद्यांची माहिती दिल्यास त्यावर कारवाई करण्याचा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे जसे रावणाला मारायला त्याच्याच घरातील विभीषण कारणीभूत होता तसेच अवैद्य धंद्यांना मोकळीक द्यायला, वाढायला खात्यातीलच पैसे आणि मालमत्ता जमवून गब्बर झालेले काही विभीषण कारणीभूत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दारू धंद्यांच्या रावणावर हल्ला करतानाच प्रथम विभीषण शोधून त्यांना जेरबंद केले पाहिजे तरच रावणाच्या नाभीत वार करता येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा