You are currently viewing “राणेंनी तोंड आवरावे आणि बेईमानी वृत्ती सोडावी, अन्यथा कोणताही पक्ष कार्यकर्त्याला मोठा होऊ देणार नाही”…

“राणेंनी तोंड आवरावे आणि बेईमानी वृत्ती सोडावी, अन्यथा कोणताही पक्ष कार्यकर्त्याला मोठा होऊ देणार नाही”…

– संदेश पारकर

राणे आपल्या मुलांचा राग दुसऱ्यांच्या मुलावर का काढतात ?

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या आक्रमक भाषणानंतर विरोधकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांच्या दोन पुत्रांनी तर सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडून उद्धव साहेबांन वर टीका केली. राणे यांनी आता स्वतःच्या तोंडाला लगाम घालण्याची गरज आहे. कारण त्यांची बेताल सुटलेली जीभ आणि बेईमानी वृत्ती सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसाठी धोकादायक आहे. आपल्या अपयशी आणि नादान मुलांचा राग नारायण राणे दुसऱ्यांच्या मुलांवर का काढतात, असा प्रश्न या निमित्ताने पडला आहे.

नारायण राणे यांचा पूर्वोतिहास आज नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण महाराष्ट्राला तो माहिती आहे. नारायण राणे आज ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचे नेते आणि विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तो इतिहास भर विधान परिषदेत वाचून दाखवला आहे. नारायण राणे यांची आज जी काही ओळख आहे, ती फक्त आणि फक्त शिवसेना आणि ठाकरे कुटुंबामुळे आहे, हे तिन्ही राणेंनी लक्षात ठेवले पाहिजे. शिवसेना बाळासाहेब नसते तर नारायण राणेंची काय अवस्था असती, याचीही तिन्ही राणेंनी कल्पना करावी. राणे यांच्या ज्या काही संस्था उभ्या आहेत त्यासुद्धा शिवसेना आणि ठाकरे यांनी आधार दिल्यामुळेच, हेच सत्य आहे.

नारायण राणे यांचा सूर्य मावळला तो त्यांच्या दोन्ही मुलांमुळे. त्यांच्या दोन्ही मुलांनीच कार्यकर्त्यांना दूर लोटले, टगेगिरी केली, राडे केले आणि त्याची फळे राणे यांच्या राजकारणाला भोगावी लागली. मात्र आदित्य ठाकरेंनी आपल्या वडिलांचे आणि कुटुंबाचे नाव आणखी मोठे केले, ही राणे यांची सल आहे. आपल्या मुलांच्या अपयशामुळे खचलेले राणे त्या न्यूनगंडातून ठाकरेंच्या मुलावर टीका करीत नाहीत ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काल नारायण राणे ज्या शब्दात बोलले त्याला शुद्ध कृतघ्नपणा म्हणतात. ज्या ठाकरे कुटुंबाने राणे यांना संपूर्ण महाराष्ट्रात ओळख दिली, पदे आणि सन्मान दिला त्याच ठाकरे कुटुंबाच्या सदस्यावर राणेंनी पुराव्यांशिवाय केलेली चिखलफेक निषेधार्ह आहे. नारायण राणे आज सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत. त्यांचे म्हणणे ते आपल्या नेत्यांकडे मांडू शकतात. आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकतात. पण कसलाही पुरावा नसताना, एखाद्या चांगल्या व्यक्तीचे असे चारित्र्यहनन करणे महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याला शोभत नाही. उद्धव साहेबांच्या पुत्रावर टीका करताना आपली मुले काय करीत आहेत, याचा अभ्यासही नारायण राणे यांनी करावा.

जिथे खायचे त्याच पानात घाण करायची हाच राणेंचा स्वभाव आहे. आधी राणे शिवसेनेत होते त्याच पक्षाच्या नेतृत्वाचा राणेंनी उद्धार केला. नंतर राणे काँग्रेसमध्ये गेले आणि खुद्द काँग्रेस पक्ष आणि विलासराव, अशोक चव्हाण तसेच पृथ्वीराज चव्हाण अशा नेत्यांवर टीका केली. आता राणे भाजपात आहेत. उद्या न जाणो भाजप सोडायची वेळ आली तर हेच राणे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही लाखोल्या वाहतील.

महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. ते ठाकरे कुटुंबाला ओळखतात आणि राणे कुटुंबालाही ओळखतात. राणेंच्या कालच्या पत्रकार परिषदेने त्यांची स्वतःची प्रतिमा मलीन झाली असे नाही, तर त्या पत्रकार परिषदेने सर्व पक्षातल्या महत्वाकांक्षी कार्यकर्त्यांचे नुकसान केले आहे. ज्यांनी मुख्यमंत्रीपद दिले त्या ठाकरेंना राणे अशा शब्दात बोलू शकतात, तर आपले काय होईल, अशी भीती भाजपच्या नेत्यांच्या मनात निर्माण झाली तर तो दोष कुणाचा ? आणि एखाद्या आक्रमक कार्यकर्त्याला ताकद दिली आणि त्या कार्यकर्त्याचा “राणे” झाला तर काय ? असे कोणत्याही पक्षाला वाटले तर त्यातही काही चुकीचे नाही.

नारायण राणे यांचे आता वय झाले आहे. त्यांनी आराम करावा. जिभेला लगाम घालावा. कारण त्यांची ही बेभान झालेली जीभ त्यांच्या दोन्ही मुलांचे नुकसान करणार हे निश्चित आहेच, शिवाय ते इतर पक्षातील आक्रमक कार्यकर्त्यांचेही नुकसान करणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा