व्हीलचेअर प्रदान : शिक्षणासह नोकरीचीही हमी
सावंतवाडी
”मला आर्थिक मदत नको परंतु मला माझ्या स्वतःच्या पायावर उभ राहण्यासाठी हात द्या. मला माझी परिस्थिती सावरायची आहे. त्यासाठी मला जॉब करायचा आहे. त्यासाठी मला आपली साथ हवी आहे, द्याल ना.. “अशी आर्त विनवणी त्या दिव्यांग युवतीने केली आणि तिला मदतीचा आधार देण्यासाठी गेलेल्या सामाजिक बांधिलकी संघटनेच्या सदस्यांच्या डोळ्यात पाणी तरारले.
सावंतवाडी शहरातील भटवाडी येथे राहणाऱ्या वाडेकर कुटुंबाची व्यथा ऐकून सामाजिक बांधिलकी संघटनेचे कार्यकर्ते भावुक झाले. अठरा वर्षांपूर्वी पती गेला. सहा वर्षा पूर्वी मुलगा अपघातात गेला तर वयाच्या सहाव्या वर्षी मुलीला ताप येऊन अचानक अपंगत्व येऊन हळूहळू चालणं बंद अशा दुःखांचा डोंगर घेऊन जगत असणाऱ्या मायलेकीला सामाजिक बांधिलकीने आधार दिला.
मुलीला वयाच्या सहाव्या वर्षी अपंगत्व आल्याने डॉक्टरने सांगून टाकलं “हि जास्त काळ जगू शकत नाही तिला चांगलं चांगलं खायला द्या” हेच वाक्य मुलीच्या डोक्यात अजूनही घर करून राहिलं आहे. आज ही मुलगी म्हणजेच हर्षदा वसंत वाडेकर ही २१ वर्षाची असून “मी एक ना एक दिवस नक्कीच चालू शकेन” या आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर बी कॉमच्या तृतीय वर्षापर्यंत येऊन पोहोचली आहे. आर्थिक परिस्थिती हालाख्याची असल्याकारणाने तिच्यावर योग्य उपचार होऊ शकले नाहीत. तरीही भटवाडी परिसरातील लोकांनी त्यांना आर्थिक हातभार दिला. कित्येक वर्ष ती भटवाडी येथील भाड्याच्या घरामध्ये राहत आहेत.
शुक्रवारी सामाजिक बांधिलकीचे सदस्य शेखर सुभेदार यांनी या घटनेची माहिती देताच त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकीची टीम पोहचून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला
सामाजिक बांधिलकीचे सेवानिवृत्त प्रा. सतीश बागवे यांनी त्या मुलीला सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून योग्य उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न करूच परंतु शिक्षणाला मदत व संगणक प्रशिक्षणासाठी ॲडमिशन घेऊन देऊ, असं सांगून तिचा आत्मविश्वास वाढवला. कित्येक दिवसांनी आपल्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तिच्या आईचेही अश्रू अनावर झाले.
यावेळी समीरा खालील यांनी त्या दोघींनाही धीर दिला व आम्ही सर्व तुमच्या पाठीशी राहू असे सांगितले. यावेळी निळेली साहस संस्थेचे भीमराव हळदीकर व हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप कोल्हापूरचे विश्वस्त श्रीमती रेखा देसाई,
सौ. सुजाता गोरे यांनी आपल्या संस्थेमार्फत हर्षदा वाडेकर हिला व्हीलचेअर प्रदान केली. तर सामाजिक बांधिलकीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल परुळेकर, संजय पेडणेकर, रवी जाधव, समीरा खालील, शेखर सुभेदार, साधले सर , प्रा. सतीश बागवे ,प्रा. शैलेश नाईक, प्रा. प्रसाद कोदे, शाम हळदणकर ,शेखर सुभेदार व शरद पेडणेकर यांनी तिला तिच्या स्वतःच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी स्वीकारली.