नाग्या महादू निवासी वसतिगृहाच्या मदतीला पोचली सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान….
सावंतवाडी
गरीब, गरजू, शोषित- पीडित, वंचित समाज घटकासाठी मदतीचा हात देणारी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची मंडळी शनिवार 5 जुलै रोजी दुपारी या आदिवासी कातकरी समाजाच्या मुलांच्या वसतिगृहांमध्ये मदतीचा हात देण्यासाठी दाखल झाली. त्यावेळी वसतिगृहाचे संचालक श्री. उदय आईर व सौ आईर व वसतिगृहातील मुलांनी त्यांचे सामूहिक प्रार्थनेच्या माध्यमातून उत्स्फूर्त स्वागत केले. या मुलांना शालोपयोगी वस्तू व जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचा एक अनौपचारिक असा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष श्री. शैलेश नाईक यांनी केले त्यात त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्य थोडक्यात विशद केले व वसतिगृहाच्या भेटीचे प्रयोजन स्पष्ट केले. यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री सतीशचंद्र बागवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुलांना आजच्या युगात शिक्षण, तंत्रज्ञान, आत्मविश्वास आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व पटवून देऊन भविष्यात या मुलांना स्वावलंबनाकरिता लागणारी मदत देण्यासाठी माझी संस्था आणि मी कटिबद्ध राहील असे आवर्जून सांगितले. यानंतर या मुलांना भेट देण्यासाठी संकल्पना मांडणारे संस्थेचे रवी जाधव यांनी मुलांशी संवाद साधला. तसेच ज्येष्ठ नागरिक संस्थेचे श्री अरुण मेस्त्री यांनी संस्थाचालक श्री.आईर यांचे मनोभावे कौतुक केले आणि हे ईश्वरी कार्य करत असल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.
यानंतर सावंतवाडी शहर आणि परिसरातील अनेक दानशूर आणि सेवाभावी व्यक्तीनी दिलेल्या शालोपयोगी व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यावेळी या वस्तू जमविण्यासाठी ज्यांनी विशेष परिश्रम घेतले ते रवी जाधव, रूपाताई गौंडर, शरदीनी बागवे व लक्ष्मण कदम यांचे विशेष कौतुक करण्यात आले. या दात्यांमध्ये श्री महालक्ष्मी सुपर बाजार यांच्याकडून 83 मुलांना चप्पल्स , सुराणा ब्रदर्स कडून सर्व मुलांना रेनकोट तर चेतन बेंगल स्टोअर चेतन अशोक गुप्ता यांच्याकडून मुलांना शालोपयोगी वस्तू देण्यात आल्या तसेच मुलांसाठी खाऊ व इतर जीवनावश्यक वस्तू करिता सावंतवाडी मोती तलाव कट्टा ज्येष्ठ नागरिक ग्रुप, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रा.डॉ. देविदास बोर्डे, लीशा बांदेकर,कळसुलकर इंग्लिश स्कूल संचालक श्री दत्तप्रसाद गोटस्कर, सामाजिक कार्यकर्ता तथा सुवर्णकार संजू शिरोडकर, नाईक फरसाण, माने गिफ्ट कॉर्नर महेश गोंधळेकर, कल्याण कदम, रवींद्र गगनग्रास, सचिन पिकुळकर पंकज पेडणेकर यांनी या वस्तू देऊन मुलांना सहकार्य केले त्यांचेही आभार संस्थेचे विद्यमान संचालक श्री आईर यांनी मानले आपल्या संस्थेच्या स्थापनेपासून आज पर्यंतच्या खडतर प्रवासाचा व या प्रवासात ज्या मंडळींनी साथ दिली त्याचा आवर्जून उल्लेख केला. मात्र शासन स्तरावरून कोणतीच मदत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश चंद्र बागवे उपाध्यक्ष शैलेश नाईक खजिनदार रवी जाधव, रूपा गौंडर ( मुद्राळे)
संचालिका शरदिनी बागवे, श्री लक्ष्मण कदम, ज्येष्ठ नागरिक अरुण मेस्त्री उपस्थित होते. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.