*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*_प्राथमिक स्तरावर मूलभूत शिक्षणाची नितांत गरज असताना आज त्याची हेळसांड होत आहे का? असल्यास त्याचे दुष्परिणाम…*
“शिक्षण.. मानवाचा मूलभूत अधिकार आहे म्हणजे जगातल्या
प्रत्येक माणसाला शिक्षण मिळालेच पाहिजे तो त्याचा मूलभूत
अधिकार आहे व त्या पासून त्याला कोणी ही वंचित ठेवू नये.”
पण, प्रत्यक्षात काय चित्र आहे? मूलभूत शिक्षणाचा अधिकार
आपल्याला आहे व ते घेतले पाहिजे या विषयी आज एकसाविसाव्या शतकातही प्रचंड अज्ञान आहे हे पाहून खरेच
आश्चर्य वाटण्या सारखी परिस्थिती आहे.जगात दोन टोकाचे
दृश्य आपल्याला दिसते. भाकरीसाठी रोज झगडावे लागत
असेल तर…? कुठला अधिकार त्यांना आठवणार? भाकरीचा
की शिक्षणाचा? आज भारतातच एकच उदा. ऊसतोड मजुरांचे
घ्या ना? पूर्ण कुटूंब पोटासाठी भटकत असतांना मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे हे आई वडिलांना प्रकर्षांने वाटत असले तरी ते काय करणार? त्यांची जगण्याची लढाईच
इतकी भयंकर आहे की , ते म्हणतील, आधी आम्हाला जगू
द्या मूलभूत की काय ते नंतर बघू?जगात आजही असे अनेक
लोक आहेत की त्यांना रोजच्या जगण्यासाठी प्रचंड झगडा
द्यावा लागतो.
मी दररोज सकाळी कचरा वेचणारी बाई, अत्यंत नियमित,
उन्हाळा पावसाळा हिवाळा तिचा कधीही नेम चुकला नाही,
अशी, तिच्याशी उत्सुकतेपोटी संपर्क साधला व तिच्याशी
बोलले. म्हणाली, हा कचरा दररोज विकला तरच माझी चूल
पेटते.मुले ही मला मदत करतात. असे लोक शिक्षणाचा
अधिकार तरी माहित करून घेतील का? मूलभूत शिक्षणाची
ही आबाळ तर “मूल्य शिक्षण”कसे मिळणार ?”मूल्य शिक्षण
हे आपण जन्मल्यापासूनच आपले कुटुंबिय व नंतर शाळेत
दाखल झाल्यावर शाळेतूनही ते आपल्याला मिळत असते.”
आज मूलभूत शिक्षणाचीच वानवा दिसते तर मूल्य शिक्षण
कसे मिळणार.तुम्ही म्हणाल, शिक्षणाचे प्रमाण प्रचंड
वाढले आहे, हो ना? नाही कोण म्हणते?पण म्हणून “आसेतू
हिमाचल “देश शिकला असा त्याचा अर्थ होत नाही.आपले
महालाकडे लवकर लक्ष जाते, झोपडीकडे आपण कानाडोळा
करतो, नाके मुरडतो हे ही सत्य आहेच ना?इंग्रजी शाळा इतक्या बोकाळल्या आहेत की पटसंखेसाठी मी सुद्धा दारोदार
शाळा कॅालेजातून फिरले आहे. आज मराठी शाळांची परिस्थिती भयावह आहे.मोलकरणीला परवडत नसले तरी ती
आता मुलाला(तिला सेमी बोलता येत नाही तरी)सेमीला घातले असे सांगते.
मला आठवते ती भरभरून उत्साहाने ओसांडणारी माझी
प्राथमिक शाळा व तिथे राबवले गेलेले उपक्रम. आम्ही उत्तम
नागरिक घडलो तिथेच ना? घरी आई वडिलांचे उत्तम संस्कार
व शाळेतील हवीहवीशी वाटणारी ती शिस्त व करडे असले तरी आवडणाऱे शिक्षक व त्यांचे आदर्श वर्तन ! त्या शाळेतच
आमची पायाभरणी(मूलभूत) झाली व मूल्य संस्कारही आपोआपच झाले. त्यांनी काय मूल्यसंस्काराचे वेगळे क्लासेस
भरवले होते काय? नाही . मूलभूत शिक्षण घेतांनाच घरीदारी
समाजात हे संस्कार आपोआप होत असतात.म्हणजे मूलभूत
शिक्षण घेतांनाच मूल्य शिक्षण थोरामोठ्यांच्या वर्तनातून
आपोआप झिरपत असते. मुले आई वडिलांचे शंभर टक्के
अनुकरण करतात व शिक्षकां सारखे आदर्श होण्याची मनिषा
बाळगतात. त्यात त्यांना किती यश येते हा अभ्यासाचा विषय
आहे, पण मनात मात्र शिक्षक असतातच हे ही खरेच आहे.
माझे शेकडो विद्यार्थी आज ही मला विसरलेले नाहीत हे मला
वेळोवेळी कळत असते.म्हणजे आई वडिल आजी आजोबा व
इतर नातलग व शिक्षक या सगळ्यांमिळून मूलभूत शिक्षण व मूल्यसंस्कार होत असतात. उदा. शाळेची प्रार्थना, प्रतिज्ञा
देशभक्ती राष्ट्रप्रेम सहिष्णुता सर्वधर्म समभाव नैतिकता इ. दहा ते बारा संस्कार मूलभूत शिक्षण घेतांनाच आपोआप रूजले पाहिजेत, रूजतात, अशी अपेक्षा असते.
पण आज चित्र फारच बदलले आहे.मराठी शाळा ओस पडत
आहेत. इंग्रजीला विरोध नसला तरी तिचे प्रस्थ वाढले आहे.
एकूणच थोडी संभ्रमावस्था आहे की काय? असे चित्र दिसते
आहे.काळा नुसार बदलले पाहिजे हे खरे असले तरी आमच्या
पिढीतले लोक नाही म्हटले तरी चिंतेत आहेत व निमूटपणे परिस्थितीला सामोरे जात आहेत.थोडे घाबरलेलेही आहेत की
कुठे जाणार ही नाव? कुठल्या खडकावर आदळणार तर नाही ना? परिस्थिती कशी ही असो पुढे तर जावेच लागते ना? काळ
कधी ही थांबत नाही. नवी पिढी कर्तृत्ववान असली तरी ती
तेवढीच नीतिमान असावी अशी आम्ही अपेक्षा करतांना आमचे
वर्तन कितपत आदर्श आहे? हे ही आम्ही तपासून पहायला हवे!
तिथेच या प्रश्नाचे खरे उत्तर आम्हाला मिळू शकेल नाही का?
आता तरुणांनीच ह्या प्रश्नाला हात घालून भावी भारतीय
आधारस्तंभ कसे चांगले निपजतील याचा विचार करणे गरजेचे
आहे. व त्या साठी मूलभूत शिक्षणाचा स्तर उंचावून तो अधिकार प्रत्येकाने मिळवावा या साठी एक जनअभियानच
उभारले पाहिजे . खरे तर युद्ध पातळीवरच हा प्रश्न सोडवावा
इतका तो महत्वाचा असतांना आम्ही मात्र नको त्या गोष्टींच्या
मागे लागलो आहोत हे दुर्दैवच नाही काय?
असो खूप मोठा व प्रचंड व्याप्ती असलेला हा विषय आहे नि
त्याची चर्चा होणे गरजेचे आहे असे मला वाटते?
तुम्हाला काय वाटते ?
धन्यवाद मंडळी…
“माझी मते पटलीच पाहिजेत असा माझा मुळीच आग्रह नाही.ती फक्त नि फक्त माझी मते आहेत.
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: १३ फेब्रुवारी २०२३
वेळ: रात्री ११/२७