You are currently viewing बांधकाम कामगारांना सर्व हक्क मिळण्यासाठी संघटना व लढ्याशिवाय पर्याय नाही – कॉ.शाम काळे

बांधकाम कामगारांना सर्व हक्क मिळण्यासाठी संघटना व लढ्याशिवाय पर्याय नाही – कॉ.शाम काळे

देवगड

बांधकाम कामगारांना आपले सर्व हक्क मिळवून घेण्यासाठी व महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी मंडळाच्या सर्व योजना प्राप्त करण्यासाठी संघटना आणि संघर्ष हा एकमेव पर्याय आहे. महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना कायद्यानुसार हक्काचे घर, वयाच्या 60 वर्षानंतर दहा हजार रुपये पेन्शन व कल्याणकारी मंडळाने घोषित केलेल्या सर्व 32 योजनाचा लाभ मिळून घेण्यासाठी संघटितपणे लढा देण्याची आवश्यकता आहे.१ मे २०२३ महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनापासून वर्षातून किमान एकदा दहा हजार रुपये सन्मानधन बोनस म्हणून बांधकाम कामगारांना देण्यात यावे अशी मागणी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटकचे जनरल सेक्रेटरी कॉ. शाम काळे यांनी केले.ते फणसगाव तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथे आयटकच्या बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन आयटकचे राज्याध्यक्ष काॅ. संजय मंडवधरे, भिवंडी येथील कामगार नेते कॉ. विजय कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. मंचावर ज्येष्ठ कामगार नेते कॉ.रमेश सहस्त्रबुध्दे उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज्याध्यक्ष संजय मंडवधरे म्हनाले, बांधकाम कामगार अहोरात्र राबराब राबून छोट्या छोट्या घरापासून तर उंच उंच गगनचुंबी इमारती उभ्या करतो.त्यामध्ये सौंदर्य भरतो. रस्ते उभारतो,पूल उभारतो,आपला घाम गाळतो,आपले रक्त आटवतो,आपला जीव धोक्यात घालतो,धोकादायक प्रवास करतो, कित्येक किलोमीटर पायी चालतो, इमारतीच्या बाजूला असुरक्षित झोपडीत राहतो,रस्त्याच्या कडेला झोपतो.

बांधकाम कामगारांना आपल्याला रोजगाराची हमी नाही,सुरक्षेचे साधन नाही,कागदावर हजेरी नाही अनेकांचा पीएफ नाही.काम करत असल्याचे प्रमाणपत्रही अनेक ठिकाणी मिळत नाही. आजही मोठ्या प्रमाणावर खऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी झाली नाही.सरकारच्या अनेक योजना कागदावरच राहतात.त्या योजनांचा आणि निधीचा उपयोग सत्तेचे वाटेकरी मोठ्या प्रमाणात लुटून नेत असल्याच्या बांधकाम कामगारांच्या तक्रारी आहेत. अनेक खऱ्या बांधकाम कामगारांच्या हातात काहीच पडत नाही.
त्याचे कारण बांधकाम कामगारांमध्ये असलेला जागृतीचा अभाव हे देखील आहे.आयटक संघटनेला 103 वर्षाचा संघर्षाचा,एकजुटीचा इतिहास आहे. असे यावेळी संजय मंडवधरे यांनी सांगितले.
बांधकाम कामगार अधिनियम 1996 नुसार स्थापन झालेल्या महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे‌.तसेच बांधकाम कामगारांना वेळेवर लाभ मिळत नाहीत.त्यामुळे या कायद्याचा मुख्य उद्देश सफल होताना दिसत नाही. असे कामगार नेते विजय कांबळे यांनी प्रतिपादन केले.
सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना आपले हक्क मिळवून देण्यासाठी संघटित होऊन आपल्याला एकजुटीने लढा द्यायचा आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन आयटक चे कोषाध्यक्ष कॉ.विजय बचाटे यांनी केले.
बांधकाम कामगारांच्या नोंदणीचे व नुतनीकरणाचे प्रलंबित अर्ज त्वरित निकाली काढा.मंडळाच्या 29 योजनांचा लाभ देण्याबाबत योग्य ती कारवाईचे तातडीने करण्यात यावी.बांधकाम कामगारांच्या घरांची योजना तातडीने राबविण्यात यावी. बेघर व गरजू बांधकाम कामगारांना प्राधान्याने घरे देण्यात यावीत. बांधकाम कामगारांना अवजारे घेण्यासाठी असलेली पाच हजार रुपये देण्याची योजना नव्याने पूर्ववत सुरू करण्यात यावी.१ मे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनापासून बांधकाम कामगारांना दरवर्षी किमान दहा हजार रुपये सन्मानधन देण्यात यावे.मध्यांन भोजन योजनेतील गैरप्रकार थांबवण्यात यावे. मध्यान भोजन कामाच्या साईटवर थेट पोहोचवण्यात यावे. जेवणाची गुणवत्ता ही चांगल्या दर्जाची असावी. निकृष्ट दर्जाचे जेवण देणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.बांधकाम कामगारांना काम केल्याचे प्रमाणपत्र सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देण्याबाबतचे अडथळे दूर करण्यात यावे. सर्व आस्थापनांना बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देणेअनिवार्य करण्यात यावे. त्यांच्या आस्थापना नोंदणी अनिवार्य करावी व प्रत्येक बांधकाम कामगाराला काम केल्याचे प्रमाणपत्र मिळते अथवा नाही याची दक्षता घेण्यात यावी.नोंदणी व लाभापासून खरे बांधकाम कामगार वंचित राहणार नाहीत याबाबत सर्व ठिकाणी पडताळणी करून दक्षता घेण्यात यावी.बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व लाभ याबाबतच्या अडचणी सोडवण्यासाठी तालुकास्तरावर दरमहा “समस्या निवारान” शिबिराचे आयोजन करावे. महात्मा फुले आरोग्य योजना पारदर्शक व काटेकोरपणे अंमलबजावणी करून सर्व बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ द्या.
वयाच्या साठ वर्षानंतर सर्व बांधकाम कामगारांना किमान दरमहा पाच हजार रुपये पेन्शन देण्यात यावे.
या प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी आपल्याला संघटित होऊन आपल्या हक्कासाठी लढा द्यायचा आहे असे आवाहन यावेळी बांधकाम कामगारांचे नेते कॉ.विजय बचाटे यांनी केले.
संतोष तेली, तुकाराम नेरुरकर, संतोष पाटील, मंगेश नारिंगेकर, निलिमा जाधव चंद्रकांत परब, दिनेश सावंत, वैदेही फणसेकर, सुहासिनी होहावडेकर, विजय गुरव व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा