You are currently viewing प्रेमाबद्दल पुन्हा काही तरी…….
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

प्रेमाबद्दल पुन्हा काही तरी…….

*लेखक कवी गझलकार डॉ.शेख इक्बाल मिन्ने (रेडिओलोजिस्ट), औरंगाबाद लिखीत अप्रतिम लेख*

*प्रेमाबद्दल पुन्हा काही तरी…….*
.
*प्रत्येक माणसाची जातकुळी,स्वभाव, शारिरीक रचना,चालण्या बोलण्याची ढब वेगळी असते…आपण एखाद्याला स्वभावातले चांगले-वाईट गुण सहजीवनात कळू लागतात.पण कुणीही अत्यंत चांगला,निर्दोष आणि कुणीही राक्षसा सारखा क्रूर,वाईट असतो असे नाही* ……
.
*काही माणसं काही क्षणातच मनाला भावतात,*
*ती हवी हवीशी वाटतात,
ती आपल्या आसपासच असावीत असं वाटतं.
तर काही जण कितीही सहवासात राहिली तरी त्यांच्या बद्दल ओढ नावाची गोष्ट निर्माणच होत नाही………मन एक अजीब रसायन आहे*…


.
*फक्त सौंदर्य हे प्रेमात पडायला कधीच पुरेसं नसते……खूप सुंदर असलेली व्यक्ति जर उर्मट, फटकळ, हट्टी, आत्मकेंद्रीत आणि अहंकारयुक्त असेल तर ती व्यक्तीदेखील कालांतराने कंटाळवाणी, निरस वाटू लागते.
वागण्यात, बोलण्यात आपुलकी,प्रेम नसेल तर हळु हळू त्या सौंदर्यापासून जोडीदार दुरावला जावू शकतो मग समोरची व्यक्ती कितीही सुन्दर दिसत असली तरीही…!*


.
कारण शेवटी आपण व्यक्तीच्या स्वभावाबरोबर रहातो…शरीर तर निमित्तमात्र असते. टवटवीत सुगंधी फूल जसे सायंकाळ होता होता कोमेजते, ते मलूल पडते,त्याचा सुगंधही क्षीण पडतो तसेच सौंदर्याचे आहे. त्यामुळे आपले वागणे,बोलणे आपले व्यवहार इतरांशी जुळवून घेणे यातच खऱ्या प्रेमाला यशस्वी करण्याची गुरुकिल्ली आहे.
प्रेम…प्रेम म्हणजे असते तरी काय? *शारिरीक सुख क्षणिक असतं… पण प्रेमामुळे एकमेकांच्या सहवासात घालवलेले क्षण आयुष्यभराची शिदोरी बनून राहतात.
प्रेमामध्ये मिळणाऱ्या आत्मिक समाधानास तोड नाही. त्यामुळे तर असा सहवास कायमच हवा हवासा वाटतो.
प्रेम म्हणजे एकमेकांचा आदर,त्याग, ओढ,एकमेकांची काळजी,मदत, भावनांची जपणूक,काहीही न सांगता,बोलता एकमेकांच्या मनातलं कळणं…..


पण प्रेमात व्यवहार, दुरावा,संशय,स्वार्थ, विश्वासघात, एकमेकांच्या उकाळ्या-पाकाळ्या, शिवीगाळ,शारीरिक मारहाण, शाब्दिक द्वंद सुरू झाले की प्रत्येक शब्दागणिक प्रेम आकसत जाते. असलेल्या प्रेमाचं हळूहळू द्वेषात रुपांतर होते. अशावेळी जोडीदाराच्या श्वासाचा आवाजही सहन होईनासा होतो. खाण्याचा आवाज मचमच वाटू लागतो, पायमोज्यांचा वास येवू लागतो. घामाचा वासही दुर्गंध वाटू लागतो…

व्यक्तीच्या स्वभावात गोडवा, विनयशीलता आणि शालीनता असेल तर त्याच्या सोबत घालवलेल्या एक एक क्षण हवाहवासा वाटतो…

सहवासातील माणसांचं देखील असंच असतं…एखाद्याच्या सौंदर्याने, प्रकाशाने दिपून जाणं, हा काही क्षणांचा खेळ असतो; पण खरे आत्मिक समाधान हे समईच्या इवल्याशा तेजानेच मिळतं…*
.
आपल्या आयुष्यातही अनेक लोक येतात आणि जातात…….काही जण आपल्याला दिपवून टाकतात तर काही तुमच्या आयुष्यातील अंधाराची जाणीव करून देतात……….
.
परंतु या सगळ्यात खरं प्रेम समईच्या ज्योतीसारखं रहातं……मंदपणे,शांतपणे तेवणारं आणि मनाला शांती देणारं आत्मिक समाधान देणारं…….
.
परिवर्तन निसर्गाचा नियम आहे,जगात कुठलीच गोष्ट शाश्वत,कायमस्वरूपी आणि निरंतर नसते. पण खरं आणि मनापासून केलेलं सात्विक प्रेम मात्र नेहमी सोबत राहतं, जगण्याची उमेद देतं, जोडीदारासह आयुष्य जगताना आनंद देतं. अवगुण प्रत्येकात असतात पण त्याकडं नजर अंदाज करून जोडीदाराच्या चांगुलपणा जास्तीत जास्त कसा विकसित होईल आणि त्याच्या बरोबरच आपलाही स्वभाव मनमिळावू,आनंदी, वृत्ती संतुष्टीची आणि जगणं निखळ कसं होईल हेही पाहिलं पाहिजे.

नातं टिकतं ते फक्त आणि फक्त प्रेम आणि विश्वासाचा आधार घेऊनच… आणि ज्या क्षणी तुम्ही त्याला व्यवहाराचे नियम लावायला सुरुवात करता तेव्हा त्या प्रेमाचा पराभव निश्चित होतो….
जगण्यासाठी पैसा नक्की हवा पण नात्यात पैसा,व्यवहार आला की त्या नात्याला कीड लागते..
आई कधी आपल्या लेकरांना किती दिलं आणि कधी दिलं याचा हिशेब ठेवते का?
प्रेम हे असेच निस्वार्थी आणि प्रांजळ असलं पाहिजे…
काळयाकुट्ट अंधारात दिवा लावताच जसं दाही दिशा उजळतात, खरे प्रेमदेखील तुमची अशीच सोबत करतं…..

प्रेमामध्ये आर्तता असते. पण याचना नसते. भक्ती नसली तरी एकमेकांवर अपार श्रद्धा असते. प्रेमाच्या माणसांसाठी कष्ट उपसताना, त्रास घेताना,स्वतः सोसलेल्या त्रासांची मग मोजदाद नसते आणि पर्वाही. उलट हे सारे करण्यात व्यक्ती आपले सर्वस्व पणाला लावते.

साधा विचार करून बघा, भोवताली दिव्यांची आरास असतानाही आपण समईच्या तेजाभोवतीच राहण्याचा प्रयत्न करतो.. का?………कारण त्या तेजाला सात्विकतेचा, निरागसतेचा, आपुलकीचा स्पर्श असतो…
.
खरं सांगू?
असे, निरागस, निस्वार्थी,पवित्र आणि भावनाशील प्रेम लाभणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी मिळकत असते. पण ती फक्त फार कमी माणसांच्या नशीबाने येते असं मला वाटतं…
.
पण आजकाल असं बावनकशी प्रेम मिळणं ही गोष्ट अशक्य आहे, हे ही मी जाणतो……

आपल्या स्वभावात आपुलकी,विनय, सहनशीलता, समजून घेण्याची क्षमता असेल तर दिवसागणिक प्रेमात वृद्धी होत जाते एवढे मात्र निश्चित आहे. त्यामुळं मिळालेलं खरं प्रेम ओळखायला शिका, ते जपायला शिका आणि ते मनापासून टिकवायलाही शिका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जोडीदारावर विश्वास ठेवा,एकमेकांच्या कर्तृत्वावर भरोसा ठेवा. एकमेकांची कमजोरी नव्हे तर एकमेकांची शक्ती बना. काळ बदलण्यास , नशीब पालटण्यास वेळ लागत नाही. अत्यल्प काळात रंक कुबेर बनू शकतो. लक्षात ठेवा कठीण आणि वाईट दिवसात द्दढ विश्वासाने सोबत असलेली व्यक्तीच हृदयात कायम वसते. कारण सुखाचे सारेच सोबती असतात मात्र दुःखात साथ देणारी एखादीच व्यक्ती असते.*

*- डॉ शेख इक्बाल मिन्ने*
*औरंगाबाद*
*7040791134*

प्रतिक्रिया व्यक्त करा