You are currently viewing “उद्या” येत नाही

“उद्या” येत नाही

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*”उद्या” येत नाही*

 

घटका गेली पळे गेली

तास वाजे झणाणा

आयुष्याचा नाश होतो

राम कारे म्हणाना।।

 

समर्थ रामदास स्वामींची ही रचना म्हणजे *वेळ* या दोन अक्षरी शब्दाला सर्वांगपूर्ण दिलेला विचार,अर्थ आणि महत्त्व आहे.

 

वेळ हा शब्द उच्चारताच त्या शब्दाभोवती असलेल्या, वेगवेगळ्या अर्थाने उच्चारल्या जाणाऱ्या अनेक लड्या उलगडायला लागतात.

“अजुनही वेळ गेलेली नाही”

” प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी. वेळ निघून जाण्यापूर्वी तिची किंमत कळायला हवी.”

” वेळ वाया आयुष्य वाया”

” गेलेले धन परत मिळू शकते मात्र एकदा गेलेली वेळ परत येत नाही.”

“समय की पाबंदी रखो”

” टाईम इज मनी.” “वेळ म्हणजेच धन.”

खरं म्हणजे जितक्या कळकळीने आपण म्हणतो “पाणी वाचवा” “वीज वाचवा” तितक्याच तीव्रतेने “वेळ वाचवा” असेही म्हटले पाहिजे.

 

वेळ हा एकच शब्द अनेक मुद्दे घेऊन समोर येतो. वेळ पाळणे, वेळ येणे,वेळ साधणे, वेळ वाचवणे, वेळेचे महत्व, वेळेचं व्यवस्थापन, अशा वेगवेगळ्या आघाडींवर वेळ याविषयी चिंतन व्हायला हवं असं वाटतं.

एखाद्या व्यक्तीला कधीही वेळ पाळता येत नाही. कुठेही ही व्यक्ती वेळेवर पोहोचू शकत नाही. एखादी महत्त्वाची मीटिंग असते, सर्वजण जमलेले असतात, मात्र या एका व्यक्तीपायी सर्वांचेच काम खोळंबून राहते.मग सारीच कामे वेळ ओलांडून जातात आणि एकंदरच योजलेल्या कार्यक्रमाचा पार विचका होतो. शिवाय ज्या व्यक्तीमुळे हे सारं अप्रिय घडतं त्याला त्याच्या या सवयीमुळे काही अपराधी वाटलेलं असतं का? त्याच्याजवळ भरपूर कारणं असतात. ट्रॅफिक मध्ये अडकलो, आलार्म न वाजल्यामुळे उठायला उशीर झाला, गाडीचे चाक पंक्चर झाले, फोनवर बोलत होतो कारण महत्त्वाचा फोन होता, अशी विविध खरी खोटी रंजीत अतिरंजीत कारणं देण्यापेक्षा ही मंडळी यापुढे “मी वेळ पाळायला शिकेन. नव्हे मला माझ्यात हा बद्दल घडवावाच लागेल.” असं आत्मप्रबोधन का नाही करत?या सर्व अडथळ्यांसाठी ऑप्शन्स का नाही शोधत?

“भारतीय वेळेनुसार…”

“इंडीअन टाईम” हा एक मजेशीर वाक्यप्रयोग आहे. दिलेल्या वेळेवर जायचेच नसते हा एक संस्कारच

जणू भारतीयांच्या मनावर बिंबलेला आहे अर्थात याबाबतीत नक्की दोष कुणाला द्यायचा हे सांगणं अवघड आहे.

माझी एक मैत्रीण आहे. आम्ही शेजारीच राहतो आणि बऱ्याच ठिकाणी एकत्र जात असतो. माझी मैत्रीण प्राध्यापक. त्यामुळे तिला तासाची सुरू होणारी घंटा आणि तास संपण्याची घंटा यातली ४५ मिनिटे, शिकवताना काटेकोरपणे वापरण्याची सवय. वेळ याविषयी ती अत्यंत तत्पर, वक्तशीर. मी तर तिला गमतीने *पाउण तास* अशीच हाक मारते. एखादा कार्यक्रम साडेचारला सुरू होणार असेल तर घरापासून कार्यक्रम स्थळी पोचायला लागणारा वेळ, ट्राफिक, पत्ता शोधावा लागणार असेल तर तोही वेळ, याचे संपूर्ण गणित मांडून ती घरातून निघण्याची वेळ ठरवते आणि एक मिनिट आधी “मी खाली उतरले आहे. तू ये” असा तिचा निरोप देणारा फोनही येतोच. तिच्या धास्तीने मी वेळ गाठण्यासाठी धडपडते आणि बऱ्याच वेळा आम्ही जेव्हां कार्यक्रम स्थळी पोहोचतो तेव्हा तिथले कार्यकर्ते खुर्च्या, सतरंज्या मांडत असतात. साऊंड सिस्टिम चेक केली जात असते. मुख्य अतिथींना यायला उशीर होणार असतो. सूत्रसंचालकाचा पत्ता नसतो. एक ना अनेक. माझी मैत्रीण प्रचंड अस्वस्थ होते. सारखी घड्याळ बघते. कार्यकर्त्यांना कार्यक्रम वेळेवर सुरू करण्यासाठी विनंती करते. सवयीप्रमाणे मी मात्र तिची धडपड, त्रागा, त्रास, अस्वस्थपणा शांतपणे बघत राहते. एकेकदा तर आम्ही कार्यक्रम सोडून घरी परत आलेलो आहोत. पण इतके असूनही कुठेही दिलेल्या वेळेवर पोहोचलेच पाहिजे हे तत्त्व माझी मैत्रीण काही सोडत नाही. आता तुम्ही मला सांगा हा तिचा गुण आहे की अवगुण आहे? (या माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला कितीही वेळ घ्या.)

 

नाटक कधीही वेळेवर सुरू होत नाही. प्रमुख अतिथी उशिरा पोहोचण्यातच स्वतःचा सन्मान समजतात, अपॉइंटमेंट घेऊनही डॉक्टरची वाट पाहत बसावे लागते, “बँकेत दोन मिनिटात सेवा देण्यासाठी आम्ही बांधील आहोत” या पाट्या फक्त वाचायच्या, प्रत्यक्ष काउंटर वरची जबाबदार व्यक्ती गायबच असते. सरकारी कार्यालयातली घड्याळे तर नेहमीच बंद असावीत. कामाची सुरुवात कधीही वेळेवर होत नाही, मात्र ‘लंच टाईम’ ‘आजचे व्यवहार बंद’ या वेळा मात्र चुकत नाहीत हे विशेष! यांना काय सांगायचं वेळेचं महत्व, “वेळ वाया आयुष्य वाया” ” टाईम इज मनी” हे कळेल का कधी यांना?

 

पण जीवनात काही *वेळा* मात्र खरोखरच खूप महत्त्वाच्या असतात, ज्या संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतात.

 

डॉक्टर रुग्णासोबत आलेल्या व्यक्तीला म्हणतात, “अगदी वेळेवर आणलत यांना. थोडा जरी उशीर केला असता तर….!!”

 

दोन देशांमध्ये— क्रिकेटच्या विश्व करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात,विजयासाठी प्रतिस्पर्धीसाठी एक बॉल उरलेला असतो आणि चार धावांची गरज असते.अटीतटीचीच वेळ असते. अशावेळी गोलंदाजाने टाकलेला बॉल, हातातल्या बॅटवर आदळण्याची वेळ फलंदाज इतकी अचूक पकडतो की तो सहज एक सिक्सर मारून जातो आणि आपल्या देशाला विजय संपादन करून देतो आणि मग यशाचा जल्लोष होतो..

 

एखादा विनोदी अभिनेता का लक्षात राहतो? कारण त्याने उच्चारलेल्या मार्मिक वाक्याचं, किंवा हावभावाचं नेमकं टाइमिंग त्याने साधलेलं असतं म्हणून प्रेक्षकांत हास्याची कारंजी उसळतात. महत्त्व त्या वाक्यापेक्षाही टायमिंगला असतं.

 

चांद्रयान तीन चंद्रावर यशस्वीरित्या उतरल्याचं चित्तथरारक दृश्य १४० कोटी लोकांनी आणि जगात इतरत्रही सगळ्यांनी पाहिलं पण त्याआधी शास्त्रज्ञांनी जे वेळेचं अचूक गणित मांडलेलं होतं ते खूप अलौकिक होतं. काउंट डाऊन होताना, एकेका सेकंदावरची कामगिरी पाहताना या वेळेच्या नियोजनाचं अप्रूप वाटत होतं.

 

केवळ तीन मिनिटे उशीर झाला म्हणून एका विद्यार्थ्याला परीक्षाच देता आली नाही. यामागे कदाचित काही राजकारण असू शकेल पण तीन मिनिटाचा उशीर त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खूपच उलथा पालथ करून गेला हे निश्चित.

 

तर कधी असंही होऊ शकतं की उशीर झाला, फ्लाईट चुकली. आणि नेमके तेच विमान क्रॅश झालं. अशावेळी सहज म्हटलं जातं,”काळ आला होता पण वेळ आली नव्हती.”

 

वेळेचं व्यवस्थापन हाही असाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

” मला वेळच नसतो” किंवा,

“मला हे करायचे आहे पण वेळ मिळत नाही”

” दिवस कसा जातो कळत नाही” अशा तऱ्हेचे संवाद आपल्या कानावर नेहमी पडतात. वास्तविक सर्वांनाच दिवसाचे सारखेच २४ तास मिळतात तरीपण काही लोक इतरांपेक्षा त्यांच्या वेळेपेक्षा अधिक काम करतात असे का? यावर एकच उत्तर आहे ते म्हणजे,त्यांचं वेळेचं चांगलं व्यवस्थापन. टाईम मॅनेजमेंट.

यात आयोजन आणि नियोजन या प्रक्रिया असतात. आपल्या जवळचा वेळ विविध कार्यप्रणाल्यांमध्ये कसा विभागायचा हे तंत्र ज्याला जमतं तोच कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कामे करू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो. वेळेच्या नियोजनामुळे कामातला तणाव कमी होतो, कार्यक्षमता आणि उत्पादक क्षमता वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि यशाचा मार्ग मोकळा होतो.

 

नोकरी करणाऱ्या स्त्रियांमध्ये मल्टी टास्किंग चा गुण असतो. वेळेच्या नियोजनामुळे हे मल्टीटास्किंग जमू शकते. त्यामुळे घर आणि ऑफिस सांभाळणाऱ्या बऱ्याच स्त्रिया दोन्ही आघाड्यांवर पूर्णपणे यशस्वी झालेल्या दिसतात.

 

आपल्या संस्कृतीत घटिकांचे महत्त्व खूप आहे.

” आली लग्न घटिका समीप..” ही मंगलाष्टकातली ओळ आयुष्यातल्या मुहूर्त वेळेचं महत्त्व सांगणारी आहे. जन्ममृत्यूच्या वेळा, त्यावरून मांडलेले आयुष्याचे, मोक्षाचे अंदाज, सूर्यचंद्रांच्या उदयास्ताच्या वेळा, त्यामुळे होणारे हवामानातले, वातावरणातले बदल, वर्ष— महिने— ऋतू —नक्षत्रांच्या वेळा या सर्वांशी मानवी जीवनाचे जगणे, मरणे सारेच जोडलेले आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांची सारी सूत्रे या वेळेवर अवलंबून आहेत.काळ,काम वेग हे परस्परावलंबी आहेत.डिस्टन्स ॲंड टाईम हे आयुष्याला वळण लावणारं महत्वाचं सूत्र आहे.

 

थोडक्यात मानवी जीवनात वेळांचं महत्त्व अधोरेखीत आहे.

*युवर टाईम स्टार्ट्स नाऊ* असे सांगूनच ब्रह्मदेवाने आपल्याला मनुष्य जन्म दिलेला असतो. जगत असताना टप्प्याटप्प्यावर *नाऊ ऑर नेव्हर* ची पाटी लावलेली असते. वेळ पाळा,वेळ वाचवा,प्रत्यक्ष महत्त्वाचे आहे ते हे की गेलेली वेळ परत येणार नाही, कुठलाही निर्णय वेळेवर घ्या, अगदी प्रेमाची कबुली ही वेळेवर द्या, नाहीतर तुमची प्रेमकथा वेगळ्याच वळणावर भरकटू शकते. आळशी पणाने वेळ वाया घालवू नका.

संत कबीराने त्यांच्या दोह्यात सांगितले आहे,

। कल करे सो आज कर

आज करे सो अब।।

हाच आयुष्यातला महत्त्वाचा मंत्र समजून तो जपावा.

“टुमारो हॅज नो एंड””टुमारो नेव्हर कम्स”

*उद्या* कधीच येत नाही….

 

राधिका भांडारकर पुणे.

 

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा