You are currently viewing लोकसहभागा’ने होणार लोकोत्सव ‘सुमंगलम्’  

लोकसहभागा’ने होणार लोकोत्सव ‘सुमंगलम्’  

लोकसहभागा’ने होणार लोकोत्सव ‘सुमंगलम्’

कोल्हापूर

एक किलो प्लास्टिक कचरा, खराब साड्या, ताट-वाटी-तांब्या देण्याच्या आवाहनाला मिळत असलेला मोठा प्रतिसाद, गावागावातून शिधा जमा करण्यासाठी सुरू झालेली लगबग, उत्सवकाळात रोज तीन-चार लाख भाकरी देण्याचे झालेले नियोजन,  बाहेरून आलेले साधुसंत, भक्तगण यांना परिसरातील घराघरात राहण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार, पार्किंग, रस्ते यासाठी शेतकऱ्यांनी खुली करून दिलेली शेती अशा विविध निर्णयासह अनेक उपक्रमातून पंचभूत महोत्सव हा खऱ्या अर्थाने लोकोत्सव होणार आहे. मठाधिपती पूज्यश्री काडसिद्धेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी हजारो हात आणि शंभरावर कमिट्या कार्यरत आहेत.


पर्यावरण वाचविण्याबरोबरच निरोगी पिढी घडविण्यासाठी येत्या २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान पंचभूत महोत्सव होत आहे, तो खऱ्या अर्थाने लोकोत्सव व्हावा यासाठी गेले दोन महिने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या महोत्सवाचे संयोजन कणेरी सिद्धगिरी मठ महासंस्थान करत असले तरी संयोजनातील घटक मात्र केवळ परिसरातील ग्रामस्थच नव्हे तर महाराष्ट्र आणि कर्नाटकसह विविध राज्यातील भक्तगण करत आहेत. हा आमचा लोकोत्सव आहे, ही भावना प्रत्येकांच्या मनात असल्याने दोन महिन्यापासून सारे मनापासून आपलं योगदान देत आहेत. मठावर येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे योगदान या महोत्सवात राहील, यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत, यामुळे हा खऱ्या अर्थाने लोकोत्सव होणार आहे.


महोत्सवादरम्यान, सात दिवसात मठावर पन्नास लाखांवर लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे. यामुळे कोणाचीही गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली आहे. रोज पाच लाखांवर लोकांना मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे. यासाठी पत्रावळ्या अथवा प्लास्टिक न वापरण्याचे ठरले आहे. म्हणून  भक्तांनी ताट-वाटी आणि तांब्या द्यावे असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार मठावर रोज शेकडो ताट-वाट्या येत आहेत. सुशोभिकरणासाठी जुन्या साड्यांचा वापर करण्यात येत आहे. यासाठी महिलांकडून रोज हजारो साड्या दिल्या जात आहेत. आलेल्या लोकांना रोज काय जेवण द्यायचे, त्यामध्ये आपण कोणता पदार्थ द्यायचा याचा निर्णय गावागावांनी घेतला आहे. याशिवाय प्रत्येक घरातून सात दिवस चार ते पाच लाख भाकरी येणार आहेत. सध्या शिधाही मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. त्यासाठी विविध जिल्ह्यातील संयोजन कमिट्या कार्यरत आहेत.
या उत्सवासाठी पंचवीस राज्यातून भक्तगण येणार आहेत. त्यातील बहुतांशी लोकांच्या राहण्याची सोय परिसरातील गावांत असलेल्या घराघरात करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला आहे. मठावर प्लास्टिक कचऱ्याचे विघटन करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येकांनी एक किलो कचरा आणावा असे आवाहन केले आहे.  महोत्सव काळात परिसरात मोठी गर्दी होणार असल्याने रस्ते रूंदीकरण करण्यात येत आहे, त्यासाठी अनेकांनी आपली जमीन दिली आहे. पार्किंगसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी आपले शेत मोकळे करून दिले आहे. रोज शेकडो भाविक सध्या मठाला भेट देत आहेत, त्यामध्ये प्रत्येकाजण ‘स्वामीजी, आम्ही काय देऊ ?’ अशीच विचारणा करत आहेत. काहीजण तर रिकाम्या हाताने न येता काहीना काही वस्तू घेऊनच येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येकजण या महोत्सवात सक्रिय सहभागी होत आहे. हा लोकोत्सव होण्यात प्रत्येकजण खारीचा वाटा उचलत असल्याचे सांगत आहे. यामुळे तो खऱ्या अर्थाने लोकोत्सव होत आहे.

हा लोकोत्सव व्हावा यासाठी पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामींजींचे प्रयत्न सुरू आहेत, त्यासाठी प्रत्येकाचा यामध्ये सहभाग असावा असे उपक्रम राबविण्यात येत आहेत, या सर्वांना भक्तगण आणि परिसरातील ग्रामस्थांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.

माणिक पाटील,चुयेकर, संयोजन कमिटी सदस्य

हा महोत्सव खऱ्या अर्थाने लोकोत्सव व्हावा यासाठी स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सध्या जो भक्तगणांकडून प्रतिसाद मिळत आहे, तो अतिशय सकारात्मक असल्याने हा उत्सव न भूतो, न भविष्यतो होणार याची खात्री आहे.
डॉ. संदीप पाटील, संयोजन समिती सदस्य

प्रतिक्रिया व्यक्त करा