You are currently viewing कणकवलीच्या टिंगल कॉन्टेरो आणि कंपनीची जुगाराची बेळणे येथील बैठक रद्द…

कणकवलीच्या टिंगल कॉन्टेरो आणि कंपनीची जुगाराची बेळणे येथील बैठक रद्द…

कणकवली पासून ६ किमी. वर साकेडी उद्यापासून बैठकीचा नवा अड्डा

संबंधित यंत्रणेच्या ग्रीन सिग्नल नंतर जिल्ह्यातील मोठ्या जुगाऱ्यांना जुगाराच्या बैठकांसाठी रान मोकळे झाले आहे. कणकवलीतील टिंगल कॉन्टेरो, फोंडयाच्या पारावरचा विठ्ठल आणि दात पडलेला फोंडा घाटाच्या खालीचा आप्पा यांची तक्षीम असलेली बैठक कणकवली पासून ७ कि.मी. वर महामार्गा लगत बेळणे येथे होणार होती. बैठकीसाठी जिल्हाभरातून खेळाडूंना निमंत्रित करण्यात आले होते. टिंगल कॉन्टेरो, आप्पा, विठ्ठल नाम जप करत पॅड बांधून मैदानात तयार होतेच. मीडियाचा काहीही अडसर नसल्याचेही तिघांनी घोषित केले होते. परंतु संवाद मीडियाने बेळणे येथील बैठकीची बातमी उघड केल्यानंतर संबंधित यंत्रणेने बेळणे येथे बैठक घेण्यासाठी मज्जाव केला.
संबंधित यंत्रणेने जुगाऱ्यांना जागा माहिती पडल्यास त्याठिकाणी बैठक घेता येणार नाही, त्यामुळे जागा मीडियाला माहिती होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे. परंतु नवनवीन शोधलेल्या जागा संवाद मीडियाला समजतात कशा? याच गर्तेत टिंगल कॉन्टेरो आणि त्याचे जुगारी आहेत. संबंधित यंत्रणेने जागा बदलण्यास सांगितल्याने टिंगल कॉन्टेरो आणि जुगारी मित्रमंडळाने आजची बैठक रद्द करून पुढची बैठक उद्या घ्यायचे जाहीर केले. उद्याच्या बैठकीसाठी टिंगल कॉन्टेरोच्या टीमने कणकवली पासून ६.०० की.मी. वर साकेडी या गावात मुंबई-गोवा हायवे पासून अगदी दोन किलोमीटरवर एक बंगला महिना ४००००/- रुपये भाड्याने घेतला आहे. साकेडी येथील भाड्याच्या बंगल्यात उद्यापासून टिंगल कॉन्टेरो, आप्पा आणि विठ्ठल नाम जपणाऱ्या फोंडयाच्या पारावरच्या विठ्ठलाची मुख्य तक्षीम असणारी बैठक बसणार आहे. साकेडीतील काही मुख्य व्यक्तींची भागवाभागवी करून उद्याच्या बैठकीचे नियोजन दिमाखात करण्यात आले आहे.
साकेडी येथे बंद बंगल्यात बसणाऱ्या उद्याच्या बैठकीसाठी सर्व खेळाडूंना निमंत्रण दिलेले आहेच, परंतु उद्याच्या बैठकीसाठी जिल्ह्यातील अट्टल जुगाऱ्यांसोबतच कोण कोण राजकीय धुरंदर आपले नशीब आजमावणार आहेत हे मात्र उद्याची बैठक बसताच जाहीर होणार आहे. उद्याच्या नवीन जागेतील बैठकीबाबत संबंधित यंत्रणा काय भूमिका घेते हे देखील उद्याच दिसून येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा