You are currently viewing सिंधुदुर्ग बदलतोय….

सिंधुदुर्ग बदलतोय….

सिंधुदुर्ग बदलतोय.. काळच ठरवेल….

राजकिय विशेष…..

मालवण तालुक्यातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या श्रीभराडी देवीची जत्रा भाविकांच्या अलोट गर्दीत पार पडली. जत्रोत्सवाची पूर्व तयारी आणि येणाऱ्या भाविकांना आंगणे वाडीत पोचणे सोयीस्कर व्हावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडीकडे जाणारे सर्व राज्य महामार्ग डांबरीकरण करून घेत भाविकांना सुखद धक्का दिला होता. परंतु रस्त्यांवर लावलेले भाजपाचे फलक मात्र “सिंधुदुर्ग बदलतोय” या दोन शब्दात बरंच काही बोलून गेले. भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या भाषणात नाम.रवींद्र चव्हाण यांना उद्देशून केलेले खोचक विधान नाम.नारायण राणे यांना ते बोल खटकल्याचे सरळ सरळ सांगून गेले.
“महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते उत्तम आहेत, काही करायचे राहिले असतील” …पण *सिंधुदुर्ग बदलतोय* … या फलकावरील टॅग लाईनवर बोलताना रवींद्र चव्हाण यांना उद्देशून नारायण राणे यांनी म्हटले की, “माझ्या मागे असलेले ६०० लोकप्रतिनिधी हे काय सहा महिन्यात जमलेले नाहीत त्यासाठी ३३ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावागावात, घराघरात फिरलो आहे….”
नारायण राणेंच्या भाषणातील विधानांचा थेट रोख रवींद्र चव्हाण यांचे लागलेले “सिंधुदुर्ग बदलतोय” हे फलक असल्याचे आणि त्यावरून राणे नाराज झाल्याचेही दिसून आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतलेली पकड पाहता नारायण राणे यांचा उपयोग करून भाजपाने पक्ष वाढीची मुळे घट्ट रोवली आणि रवींद्र चव्हाण यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. जिल्ह्याच्या राजकीय गोटात देखील, “राणे यांना बाजूला करून रवींद्र चव्हाण हेच कोकणचे नेतृत्व” अशी चर्चा सुरू आहे. एकंदरीत कालच्या चित्रावरून पक्षाने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना पुरेपूर ताकद पुरवलेली दिसली आणि जिल्ह्यात मूळ भाजपाचे लोकच केंद्रस्थानी आणल्याचे पाहायला मिळाले
नारायण राणे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कोकणचे नेतृत्व सोपवले होते. राणे सेना सोडून काँग्रेसमध्ये गेल्यावर काँग्रेस नेतृत्वाने कोकणची संपूर्ण जबाबदारी राणेंकडे सोपवली होती. त्यामुळे राणे समर्थकांना सर्व पदे मिळाली होती. राज्यात देखील काहींना पदे मिळाली आणि त्यातूनच आताचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष असलेले राजन तेली विधानपरिषद आमदार झाले होते… तेलींचा राजकीय उदय हा राणे यांच्या मुळेच झाला होता. भाजपा मध्ये मात्र राणे आले तरी तसे चित्र दिसत नसून रवींद्र चव्हाण हेच जिल्ह्यातील भाजपाचे नेतृत्व असल्याचे ठळकपणे अधोरेखित होत आहे.
“सिंधुदुर्ग बदलतोय” या फलकाखाली सिंधुदुर्ग भाजपाचे सर्वेसर्वा रवींद्र चव्हाण असून त्यांच्याच नेतृत्वात जिल्ह्यातील रस्ते आदी विकसित होत असल्याचे चित्र उभे राहत आहे आणि कदाचित भविष्यातील भाजपाच्या अंतर्गत कलहाचे कारण देखील हेच फलक असतील अशी चर्चा राजकीय होतात सुरू होताना दिसत आहे. कालचे फलक उद्या काय दाखवतील हे येणारा काळच ठरवणार हे मात्र नक्की…!

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

four − 1 =