*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सुजाता नवनाथ पुरी लिखित अप्रतिम लेख*
*कार्य हाच देव*
संस्कृत मधे एक खूप छान असे सुभाषित आहे-
*उद्यमिन ही सिधंती कार्यानी न मनोरथै*
याचा अर्थ असा कि केवळ काम अथवा कार्य केल्यानेच यश मिळते फक्त इच्छेने नाही.ज्या प्रमाणे एखादा सिंह भुकेलेला असेल आणि तो हरणाची शिकार करून आपली भूक भागवावी अशी इच्छा मनात ठेवून फक्त झोपून राहत असेल तर झोपलेल्या सिहांच्या तोंडात हरीण स्वतः होऊन येणार नाही,त्याला त्यासाठी प्रयत्नच करावे लागतील.हे सुभाषित किती तरी जुने असलं तरी आजही आणि सदा सर्व काळ ते लागू होणारे आहे.
कठोर परिश्रम हाच यशाचा राजमार्ग आहे काही लोक हे नशीब आणि यश या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे मानणारे असतात.नशिबात असेल तर मिळेल असे मानणारे हे लोक असतात.असे लोक कोणत्याही कामात कठोर परिश्रम करण्यापेक्षा नशिबाचाच जास्त विचार करत असतात.पण अजुन तरी यशाचा शॉर्टकट निर्माण झालेला नाही.
मुंगी हळू हळू चालली तर एक हजार कोस चालू शकते पण गरुड जर जागेवरून हलला नाही तर एक पाऊलही पुढे जाऊ शकणार नाही.म्हणजेच काय तर कामासाठीची छोटी सुरुवात पण सातत्य असेल तर मोठे यश मिळवून देणारी सिध्द होत असते.एखादे काम करत असताना खूप अडचणी येतात आणि ते काम अर्ध्यावर सोडून द्यावेसे वाटते.जिथून आपण हताश होऊन मागं फिरणार असू तेवढे अंतर मागे जाण्यापेक्षा नेटाने पुढे चाललो तर विजयश्री आपली वाट पाहत उभी असते.
केवळ कल्पनेने यश मिळत नाही.योग्य धेयाच्या उद्दिष्टपुर्ती कडे प्रयत्नपूर्वक केलेली वाटचाल म्हणजेच यश.मनात मांडे खाणे ही आपल्या मराठीत एक म्हण आहे.काहीही न करता केवळ आपल्याला जे हवं त्याची स्वप्न पाहत बसणे असा याचा अर्थ होतो.स्वप्न पाहूच नये असे अजिबात नाही. पण ती स्वप्नं सत्यात साकारण्यासाठी जीव तोडून मेहनत करणे हे महत्वाचे आहे.
*कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे कधीही अपयशी होत नाहीत*
*अपयश हे त्यांच्या मार्गावरील अंतर दाखविणारे दगड ठरतात.*
यशाची उंची गाठताना कुठल्याही कामाची लाज बाळगू नका आणि मेहनतीला घाबरु नका.आज काल पालक आपल्या मुलांना काही कमी पडू नये म्हणून आयुष्यभर राब राब राबून संपत्ती कमावून ठेवतात. त्याचा परिणाम असा होतो कि आयतं मिळाल्यामुळे त्या मुलांना त्याचं काही महत्व वाटत नाही आणि अंगात कष्ट करण्याची इच्छा ही राहत नाही.ध्येयाशिवाय होणारा जीवन प्रवास हा सर्वात कंटाळवाणा प्रवास असतो.मग यातूनच अंगात मग्रुरी येते आणि समोरच्या व्यक्तीलाही मन आहे हेच ही मुले विसरून जातात.आणि जेव्हा पश्चाताप येतो तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते.
आपल्या कर्तव्याची जाणीव होणे हा ही एक संस्काराचा भाग आहे.म्हणूनच तर गितेत भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात कि –
*विमोह त्यागून कर्म फलांचा*
*सिद्ध होय पार्था*
*कर्तव्याने घडतो माणुस**
*जाणून पुरुषार्था*
पुरुषार्थ म्हणजे नुसतीच ताकद दाखविणे नव्हे तर वेळ आल्यावर मायेच्या ममतेने आपले कर्तव्य पार पाडणे म्हणजेच खरा पुरुषार्थ होय.
खरं तर कर्म हाच आपला परमेश्वर असतो. ज्याला त्याला आपल्या कर्माच्या गतीनुसार यश मिळत असते. ज्या कामासाठी आपली नियुक्ती झालेली आहे ते अगोदर करणे हेच आपले आद्य कर्तव्य असते. कर्तृत्ववान व्यक्ती कधीही नशिबाच्या आहारी जात नाहीत आणि नशिबाच्या आहारी गेलेल्या व्यक्ती कधीच कर्तुत्ववान होऊ शकत नाहीत.
*यशा इतका बोलकं दुसरं काहीच नसतं*
परंतु हे यश सहजासहजी मिळवून प्रथम दर्शनी सोपं वाटत असलं तरी यासाठी आयुष्यात येणार्या कित्येक सुखद क्षणांचा त्याग करावा लागतो आणि मन मारून परिश्रम करावे लागतात.
असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी.ही वृत्ती तुमच्यातील आळशीपणाच दाखवीत असते.स्वप्नरंजन हे ज्यांना जीवन वाटते त्यांचे जीवन माती मोल होत असते. एका बीजाला अंकुरित होण्यासाठी अगोदर मातीत गाडून घ्यावे लागते.
फळा फुलांनी बहरून आलेल्या बागेकडे पाहून मन किती प्रसन्न होत असतंना.पण आपल्याला माहीत आहे का या अवस्थेपर्यंत येण्यासाठी त्या झाडांनी किती तरी जीवघेणे ऋतू अंगावर झेललेले असतात.
तसाच एखादा यशस्वी माणूस ही आपल्याला खूप आनंदात दिसत असला तरी त्या यशामागे त्याची किती वर्षांची तपस्या असते.फक्त मनोरंजक स्वप्न आपल्याला थोड्या वेळाची करमणूक देऊ शकतात.वास्तव सुख फक्त आपले कर्म अथवा कष्टच देऊ शकतात.
*गर्दीचा हिस्सा बनू नका,तर गर्दीचे कारण बना*
आणि हे फक्त मनात इच्छा असल्याने होणार नाही तर त्या साठी तितकीच कठोर मेहनत ही हवी असते.तुमचे काम तुम्ही किती प्रामाणिक पणे करता यावरच तुमचे मन स्वास्थ्य अवलंबून असते.कारण तुम्ही सगळ्यांना फसवू शकता पण आपल्या मनाला नाही.
———————-
*✒️सुजाता नवनाथ पुरी*
अहमदनगर
8421426337