You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन म्हणजे “आंधळं दळतंय कुत्र पीठ खातंय”…!

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन म्हणजे “आंधळं दळतंय कुत्र पीठ खातंय”…!

*राजकिय आखाडा आणि भक्ती* …*याचे राजकिय नेत्यांना भानच नाही*

 

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन म्हणजे “आंधळं दळतंय अन् कुत्र पीठ खातंय” याचा प्रत्यय काल श्री.भराडी देवी जत्रेच्या दिवशी आंगणेवाडी येथील जिल्हा प्रशासनाच्या नियोजनामध्ये आला. महिनाभर अगोदर आंगणेवाडी जत्रोत्सवाचे नियोजन जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासनाचे प्रमुख अधिकारी, पोलिस प्रशासन, आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ, मुंबई, गावकरी आदींच्या उपस्थितीत केले जाते. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी ताटकळत राहण्याची वेळ येत नाही. प्रशासन आणि ग्रामस्थ मंडळ त्याची जबाबदारी घेत असतात. परंतु काल झालेल्या जत्रोत्सवात मात्र पहिल्यांदाच प्रशासनाने आंगणेवाडी जत्रोत्सव नियोजनात वरिष्ठांची मर्जी राखण्याचा प्रयत्न करताना येणाऱ्या हजारो भाविकांना तीन तीन तास रस्त्यांवर ट्रॅफिक जाम मध्ये ताटकळत ठेवले आणि जिल्हा प्रशासनासह पालकमंत्री लोकांच्या रोषास कारणीभूत ठरले.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गेले काही दिवस आंगणे वाडीकडे जाणारे सर्व रस्ते सुसज्ज केले त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी जाताना रस्त्यांचा कसलाही त्रास होणार नाही असे स्पष्ट केले होते. आंगणेवाडीकडे जाणारे रस्ते गुळगुळीत झालेच परंतु जिल्हा प्रशासनाच्या मिळमिळीत कारभारामुळे भाविकांना व्हायचा तो त्रास झालाच आणि आंगणेवाडी येथील मेळाव्यासाठी आलेल्या व आणलेल्या गाड्यांमुळे कित्येक भाविक तीन तीन तास रस्त्यातच ट्रॅफिक मध्ये अडकले. त्यामुळे “आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय” अशा प्रकारची शेरेबाजी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनावर सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आली.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अथक प्रयत्नांनी आंगणेवाडीकडे जाणारे रस्ते सुसज्ज केले होते. परंतु आंगणेवाडी येथे जमणारी लाखोंची गर्दी, मुंबईतून जत्रेसाठी येणारे लाखो चाकरमानी आदींचे लक्ष भाजपच्या कार्याकडे वेधून घेण्याच्या प्रयत्नात, आणि भविष्यात होणाऱ्या मुंबई महानगर पालिका निवडणुका आदी डोळ्यासमोर ठेऊन जत्रोत्सवाच्याच दिवशी आंगणेवाडी येथेच भाजपाचा आनंद मेळावा घेण्याचा घेतलेला निर्णय यामुळे जत्रोत्सवासाठी येणाऱ्या खऱ्या भाविकांचा मात्र हिरमोड झाला. “राजकीय आखाडा आणि भक्ती” हे दोन वेगवेगळे विषय आहेत याचं भान पक्षीय नेत्यांना राहिलं नाही परंतु सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने देखील पक्षीय मेळाव्याला आंगणेवाडीत परवानगी देऊन जिल्हा प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या हातचे खेळणे असल्याचे दाखवून दिले. आंगणेवाडी जत्रोत्सव नियोजन बैठका महिनाभर आधी घेणे वगैरे हे सर्व फक्त देखावेच असतात की काय…? अशी शंका जिल्हावासियांना यायला लागली आहे.

श्री भराडीदेवी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान…!

मुख्यमंत्र्यांसहित अनेक मंत्री, आमदार, खासदार, नेते, मुंबई पुण्यातील कोकणवासीय नगरसेवक आदी मंडळी दरवर्षी जत्रेला नवस बोलण्यासाठी, फेडण्यासाठी येत असतात. त्यामुळे मंत्री, आमदार, खासदार, नेते येणे हे देवीला आणि भाविकांना नाविन्य नाहीच परंतु पक्षाच्या मेळाव्यासाठी गावागावातून ट्रॅव्हल्स भरून बचत गटाच्या महिलांना आणल्याने आणि मेळाव्याच्या निमित्ताने फुकटात जत्रेला जाता येते ह्या दुहेरी उद्देशाने अनेक गावातील बायका मेळाव्यात आल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आंगणेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पक्षाच्या गाड्यांची गर्दी वाढली त्याचा परिणाम रस्ते जाम होऊन ट्रॅफिकवरती झाला आणि जे भाविक श्रद्धेने देवीच्या दर्शनासाठी येत होते त्यांना मात्र नाहक त्रास झाला. भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेला आनंद मेळावा मुंबईतून आलेल्या वरिष्ठ नेते मंडळींना आनंद देऊन गेला परंतु जिल्ह्यातील भराडी देवीच्या भाविकांना मात्र मनस्ताप झाला अशी काहीशी परिस्थिती कालच्या जत्रोत्सव मध्ये अनुभवास आली.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने भाजपाच्या पक्षीय आनंद मेळाव्याला जत्रेच्या दिवशी दिलेली परवानगी मात्र त्यामुळे नक्किच वादातीत राहिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =