इचलकरंजी / प्रतिनिधी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या केंद्र सरकारने 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा पूर्ण अर्थसंकल्प नुकताच जाहीर केला. परंतु या अर्थसंकल्पामधून सर्वसामान्य नागरिकांना काहीच मिळाले नसून केवळ नऊ राज्यातील विधानसभा निवडणुका तसेच 2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर केला आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव शशांक बावचकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
2014 साली देशातील जनतेला मोठ्या अपेक्षा दाखवून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने आपला नववा अर्थसंकल्प जाहीर केला. 2014 साली सत्तेवर येत असताना प्रतिवर्षी दोन कोटी लोकांना नोकऱ्या, 2022 पर्यंत प्रत्येकाला राहायला घर, इंधनाचे दर अवाक्यात आणण्याची घोषणा यासारख्या अनेक घोषणांनी पाऊस पडला होता. तथापि आज सरकारची दहा वर्षे पूर्ण होत असताना यातील कोणतेही आश्वासन पूर्ण झाल्याचे दिसून येत नाही. मागील 45 वर्षातील उच्चतम पातळीवर पोहोचलेली बेरोजगारी, देशांमध्ये झालेली प्रचंड महागाई व त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे मोडलेले कंबरडे, इंधनाचे वाढलेले प्रचंड दर, कोविड काळातील गेलेल्या नोकऱ्या, नोटबंदी व जीएसटी मुळे उध्वस्त झालेला व्यापार, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव देऊ असे सांगून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे खोटे आश्वासन देण्याचा प्रयत्न या सर्वामुळे देशांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जाहीर केलेला अर्थसंकल्प हा केवळ राजकीय हेतूने प्रेरित आहे. शेती खालोखाल रोजगार देणाऱ्या वस्त्र उद्योग व्यवसायाला यातून मोठा दिलासा मिळणे आवश्यक होते. तथापि असे कोणतेच पाऊल सरकारने टाकले नसल्याने वस्त्रोद्योग व्यवसायामध्ये आणीबाणीची परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे. एम एस एम ई च्या नावाखाली सरकार लघुउद्योजकांसाठी काही करत असल्याचे दाखवत असले तरी यातून प्रत्यक्षामध्ये कोणतीही नवनिर्मिती होणार असे दिसून येत नाही. कोविड काळात लघु उद्योजकांसाठी वीस लाख कोटीचे जाहीर केलेले पॅकेज मधून नेमके किती लघुउद्योजकांना त्याची मदत झाली हे सरकारने जाहीर करावे 2011 साली वस्त्रोद्योगाला मदत करण्यासाठी तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी इचलकरंजीचा खास उल्लेख करून मेगा क्लस्टर योजना मंजूर केली होती. त्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पातून मात्र प्रचंड निराशा पदरी पडल्याची दिसत आहे. एकूणच नरेंद्र मोदींच्या सरकारमधील गेल्या सर्व अर्थसंकल्पाप्रमाणेच हाही अर्थसंकल्प फसवा असणार हे निश्चित असल्याची टिकाही शशांक बावचकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.