You are currently viewing आंगणेवाडी यात्रोत्‍सवाकरिता एस.टी. महामंडळ सज्ज

आंगणेवाडी यात्रोत्‍सवाकरिता एस.टी. महामंडळ सज्ज

१४५ जादा बसेस धावणार; विभागीय वाहतूक अधिकारी देशमुख यांची माहिती

 

कणकवली :

 

आंगणेवाडी यात्रोत्‍सवासाठी एस. टी. प्रशासनाने सज्‍जता ठेवली आहे. जिल्ह्यातील विविध आगारांमधून तसेच प्रमुख रेल्‍वे स्थानकांमधूनही थेट आंगणेवाडीला एस. टी. बसेस सोडल्‍या जाणार आहेत. महामंडळाने आंगणेवाडी यात्रोत्‍सवासाठी १४५ बसेसची व्यवस्था ठेवली असल्‍याची माहिती एस.टी.चे विभागीय वाहतूक अधिकारी पी.एस. देशमुख यांनी आज दिली.

4 फेब्रुवारी रोजी आंगणेवाडीची जत्रा आहे. मात्र 3 ते 5 फेब्रुवारी पर्यंत एसटी बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एसटी सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने 3 फेब्रुवारीला रात्री 10 वाजल्यापासून आंगणेवाडी साठी बस सेवा सुरू होणार आहे. तसेच कणकवली आणि कुडाळ रेल्वे स्थानकातूनही प्रवासी उपलब्धतेप्रमाणे थेट आंगणेवाडी साठी एसटी बस सुटणार आहेत. कुडाळ बस आगारातून हिवाळेमार्गे, खोटले मार्गे तसेच निरुखे, पांग्रड, पणदूर, ओरोस या मार्गावरूनही आंगणेवाडी साठी बसेस सुटणार आहेत. मालवण बसस्थानक तसेच टोपीवाला हायस्कूल, देवबाग, तारकर्ली येथूनही एसटी बसेस सुटणार आहेत. कणकवली, देवगड, वेंगुर्ले या बसस्थानकांतूनही एसटी बसेस आंगणेवाडी जत्रे करिता रवाना होणार आहे, असे श्री. देशमुख यांनी सांगितले.

तसेच भाविकांसाठी ग्रुप बुकिंग देखील सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांच्या गावापासून थेट आंगणेवाडी पर्यंत एसटी सेवा दिली जाणार असल्याची माहिती अशी देशमुख यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा