You are currently viewing १९ वर्षांखालील विश्वचषकावर भारताची मोहोर

१९ वर्षांखालील विश्वचषकावर भारताची मोहोर

*इंग्लंडवर सात विकेट्स राखून मात*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

१९ वर्षांखालील आयसीसी महिला टी२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने इंग्लंडचा सात विकेट्स राखून पराभव करीत विश्वविजेतेपद पटकाविले. विजयासाठीचे अवघे ६९ धावांचे उद्दिष्ट भारताने १४ षटकांत तीन बाद ६९ धावा करीत साध्य केले आणि पहिल्याच टी-२० विश्वचषकावर नाव कोरले. सहा धावांच्या मोबदल्यात दोन विकेट्स घेणाऱ्या तितास साधूला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. ग्रेस स्क्रिवेन्सला मालिकावीर म्हणून सन्मानित करण्यात आले. ग्रेसने स्पर्धेत २९३ धावा केल्या आणि नऊ विकेट्स मिळविल्या.

विजयासाठी निर्धारित लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. तिसर्‍या पटकातील पहिल्याच चेंडूवर कर्णधार शफाली वर्मा (११ चेंडूंत १५) हन्नाह बेकरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. अलेक्सा स्टोनहाऊसने तिचा झेल टिपला. श्वेता शेरावतकडून (६ चेंडूंत ५) डाव सावरण्याची अपेक्षा असतानाच चौथ्या षटकातील चौथ्या चेंडूवर ग्रेस स्क्रिवेन्सने तिला हन्नाह बेकरच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. सौम्या तिवारी आणि त्रिशा गोंगाडी यांनी मग डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. त्रिशा तेराव्या षटकातील पाचव्या चेंडूवर अलेक्सा स्टोनहाऊसच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाली. त्यानंतर सौम्याने (३७ चेंडूंत नाबाद २४) हर्षिता वसूच्या साथीने विजय साकारला.

त्याआधी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या प्रभावी गोलंदाजीपुढे इंग्लंडने अक्षरशः लोटांगण घातले. पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर तितास साधूने स्वतःच्याच गोलंदाजीवर लिबर्टी हिपचा झेल टिपला. लिबर्टी शून्यावर बाद झाली. त्यानंतर तिसर्‍या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अर्चना देवीने नियाम हॉलंडला (८ चेंडूंत १०) त्रिफळाचीत केले. चौथ्या पटकात कर्णधार ग्रेस स्क्रिवेन्सला (१२ चेंडूत ४) अर्चना देवीने त्रिशामार्फत झेलबाद केले. सेरेन स्मेल (९ चेंडूंत ३) सातव्या षटकात तितास साधूच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाली. दहाव्या षटकात पार्थी चोप्राने चारिस पेव्हलीला (९ चेंडूंत २) पायचीत करून इंग्लंडची अवस्था ५ बाद ३९ अशी दयनीय केली. झटपट विकेट पडल्यानंतर दबावातून सावरण्यात इंग्लंडच्या मुलींना अपयश आले. त्यामुळे त्यांचा डाव सावरू शकला नाही. कोणतीही जोडी मोठी भागीदारी करू शकली नाही. भारतीय गोलंदाजांनीही टिच्चून मारा करीत त्यांना डोके वर काढण्याची संधी दिली नाही. वरच्या फळीतील फलंदाजांप्रमाणेच इंग्लंडच्या मधल्या आणि अखेरच्या फळीतील फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत राहिल्या. भारताच्या तितास साधू, अर्चना देवी, पार्थी चोप्रा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. मन्नत कश्यप, शफाली वर्मा, सोनम यादव यांनी प्रत्येकी एक विकेट मिळविली.

क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या १९ वर्षांखालील महिलांच्या टी२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी रंगलेल्या अंतिम सामन्यात सौम्या तिवारीने कव्हर्सच्या दिशेने चेंडूला दिशा दाखवली आणि भारतीय खेळाडूंनी वाऱ्याच्या वेगाने मैदानात धाव घेतली. शफाली वर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवतींनी तमाम देशवासीयांच्या अपेक्षांची पूर्तता केली. भारताने इंग्लंडला तब्बल सात गडी आणि ३६ चेंडू राखून धूळ चारत प्रथमच जगज्जेतेपदावर नाव कोरले.

महाअंतिम लढतीत इंग्लंडने दिलेले ६९ धावांचे लक्ष्य भारताने १४ षटकांत तीन फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. चार षटकांत अवघ्या सहा धावा देत दोन बळी टिपणारी मध्यमगती गोलंदाज तितास साधू भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला भारताने १७.१ षटकांत ६८ धावांत गुंडाळले. इंग्लंडकडून रायनाने सर्वाधिक १९ धावा केल्या.

*ऐतिहासिक कामगिरी*

भारतीय महिला संघाने प्रथमच एखादी आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यापूर्वी २००५, २०१७चा एकदिवसीय विश्वचषक, तसेच २०२०च्या टी२० विश्वचषकात भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

*बीसीसीआयकडून पाच कोटीचे बक्षीस*

विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी तब्बल पाच कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. जय शहा यांनी मुलींना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजयाचा जल्लोष करण्यासाठी निमंत्रणही दिले. जय शहा यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. “भारतातील महिला क्रिकेटची प्रगती होत आहे आणि या विश्वचषक विजयाने महिला क्रिकेटचा दर्जा अधिक उंचावला आहे. संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षीस रक्कम म्हणून पाच कोटी रुपये जाहीर करताना मला आनंद होत आहे. हे निश्चितच नव्या वाटा निर्माण करणारे वर्ष आहे. ” असे जय शहा यांनी ट्विट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 14 =