You are currently viewing शिक्षक मतदार संघासाठी जिल्ह्यात १९ मतदान केंद्रे

शिक्षक मतदार संघासाठी जिल्ह्यात १९ मतदान केंद्रे

२१६४ एकूण मतदार: २०३ कर्मचारी निवडणुकीसाठी नियुक्त : जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी

कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी ३० जानेवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार आहे.यासाठी ८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांच्यासाठी जिल्ह्यातील १९ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यात १४५६ पुरुष तर ७०८ महिला अशा एकूण २१६४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदानासाठी २०३ कर्मचारी तर आरोग्य सुविधेसाठी ३८ आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी ड्राय डे जाहीर करण्यात आला असून मतदारांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच या मतदानासाठी ईव्हीएम मशीन न वापरता जुन्या पद्धतीने अर्थात मतपत्रिकेद्वारे मतदान होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ जयकृष्ण फड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी म्हणाल्या की, कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी सोमवार दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी होत आहे. या विभागात ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग असे ५ जिल्ह्यांचा समावेश आहे. या साठी ८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यातील १९ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यात १४५६ पुरुष तर ७०८ महिला अशा एकूण २१६४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या मतपत्रिका आणि पेट्या येथील नियोजन सभागृहातून उद्या(रविवारी) मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत. तसेच मतदान झाल्यावर त्या सर्व मतपेट्या पुन्हा जिल्हा नियोजन समिती सभागृहात जमा केल्या जाणार असून येथून त्या थेट कोंकण विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पोलीस बंदोबस्तात पाठविल्या जाणार आहेत. तर गुरुवार दिनांक २ फेब्रुवारी २०२३ रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

२०३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
कोंकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी ३० जानेवारी रोजी १९ केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविली जात असून यासाठी २०३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्या ठिकाणी कोणास आरोग्य सुविधा लागल्यास ती उपलब्ध व्हावी यासाठी ३८ आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

२१६४ मतदार करणार मतदान
तालुका. केंद्रे. पुरुष मतदार. महिला मतदार. एकूण मतदार
देवगड. ३. १७२. ७८. २५०
वैभववाडी. १. ९९. ३२. १३१
कणकवली. २. २८५. १४१. ४२६
कुडाळ. ३. २६०. १२२. ३८२
मालवण. ४. १४०. ६४. २०४
सावंतवाडी. ३. ३१५. १५४. ४६९
दोडामार्ग. १. ८३. ४१. १२४
वेंगुर्ला. २. १०२. ६४. १६६
एकूण. १९. १४५६. ७०८. २१६४

प्रतिक्रिया व्यक्त करा