You are currently viewing मोरयाचा धोंडा ठिकाणाला शासनाने धार्मिक पर्यटन स्थळ जाहीर करावे…

मोरयाचा धोंडा ठिकाणाला शासनाने धार्मिक पर्यटन स्थळ जाहीर करावे…

मालवण

राष्ट्रीय पर्यटन दिनाचे औचित्य साधत माघी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर आज पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मोरयाच्या धोंड्यावरील श्री गणेशाचे पूजन करत सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी झालेल्या मोरयाचा धोंडा या ठिकाणाला राज्य शासनाने धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून जाहीर करावे असे साकडे घातले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी साडे तीनशे वर्षापूर्वी मालवणच्या सागरात किल्ला बांधणीचा संकल्प सोडल्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी दांडी येथील मोरयाचा धोंडा या ठिकाणी केली. शासनाने मोरयाचा धोंडा या स्थळाला शासकीय पूजेचा मान दिला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रीय पर्यटन दिनाचे औचित्य साधत माघी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर गणेश पूजन करत साकडे घातले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी किल्ल्याच्या पायाभरणीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मोरयाचा धोंडा येथे भूमिपूजन केले. योगायोगाने आज राष्ट्रीय पर्यटन दिन आहे आणि त्याचबरोबर गणेश जयंती आहे. ज्याप्रमाणे पंढरपूर येथे शासकीय महापूजेचा मान आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मोरयाचा धोंडा हे शासकीय पूजेचा मान असलेले ठिकाण आहे. जर पंढरपूर मध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी लोक देश, विदेशातून लाखोंच्या संख्येने येत असतील तर आपल्या भागातील या ठिकाणाचा विकास होणे गरजेचे आहे. मोरयाचा धोंडा येथे देखील पर्यटकांचा ओघ वाढला पाहिजे. या उद्देशाने पर्यटन महासंघाचे कामकाज सुरू आहे आणि याची सुरुवात म्हणून आज आपण एकत्र जमलो आहोत. या स्थळाचे संवर्धन होणे गरजेचे असल्याने तशा आशयाचे पत्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविणार आहोत असे सांगितले. यावेळी अशोक तोडणकर यांनी श्री गणेशाजवळ साकडे घातले.

यावेळी वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, मेघनाद धुरी, अवि सामंत, मंगेश जावकर, सहदेव साळगावकर, गुरू राणे, मेघा सावंत, प्राची माणगावकर, अन्वेशा आचरेकर, ममता तळगावकर, दादा वेंगुर्लेकर, मिलिंद झाड, दादू डिचोलकर, प्रतिभा ढोके, प्रीतम चिंदरकर, विलास चांदेरकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा