You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राडे थांबणार कधी…?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राडे थांबणार कधी…?

नाम.दीपक केसरकरांची भूमिका बदलली म्हणजे दहशतवाद संपला का…?

विशेष संपादकीय…

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील राडे संस्कृती संपणार कधी…? हा प्रश्न आजही जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना भेडसावत आहे. सिंधुदूर्ग जिल्हा, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला तेव्हा जिल्ह्याचा विकास झपाट्याने होईल आणि पर्यटकांचा ओघ जिल्ह्यात वाढून जिल्हा सुजलाम सुफलाम होईल…जिल्ह्यात विकासाची गंगा येऊन लक्ष्मी सुख समाधानाने नांदेल अशी आशा वाटत होती. “जिथे शांतता असते तिथे लक्ष्मी वास करते..नांदते…!”. हे त्रिकालाबाधित सत्य आहे…परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारे राजकीय राडे ही जिल्हा विकासाच्या, पर्यटनाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहशतवाद संपला की जिल्ह्याचा विकास होणार, जिल्ह्याच्या विकासासाठी मी मैदानात उतरलो, माझा लढा हा दहशतवादाच्या विरोधात आहे, कुणा व्यक्तीच्या विरोधात नाही. असे वारंवार सांगताना जिल्ह्यात झालेले राजकीय खून आणि राडे यांची आठवण नाम.दीपक केसरकर करून देत होते. जिल्ह्यात शांतता नांदावी, आणि जिल्हा विकासाबरोबरच बेरोजगारी कमी होण्यासाठी जिल्ह्यातील युवकांच्या हाती काम मिळावे अशी अपेक्षा असतानाच जिल्ह्यातील युवक राडेबाजी आणि अवैध धंद्यांकडे वळत आहे. या गोष्टी चिंताजनक असताना नाम.दीपक केसरकर यांची बदलेली भूमिका लक्षात घेता जिल्ह्यातील दहशतवाद, राडेबाजी संपली आहे का…? याचे उत्तर नाम.दीपक केसरकरांनी देणार आहेत का..? जर जिल्ह्यातील दहशतवाद, राडेबाजी संपली तर नाम. केसरकर यांच्या मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कणकवली परिसरात सुरू असलेला प्रकार म्हणजे राडेबाजी, दहशतवाद नव्हे का…? असा प्रश्न आज जिल्हावासियांच्या मनात उत्पन्न होत आहे.
नाम.केसरकर हे नाव सावंतवाडी शहारापुरते मर्यादित होते, परंतु दहशतवादाच्या विरोधात जिल्हाभरात रान उठवणारे केसरकर आपल्या कठोर भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचले. आपल्या कठोर भूमिकेमुळेच त्यांनी जिल्हावासियांची मने जिंकली. प्रेमाने जग जिंकता येते…असे सांगणारे दीपक केसरकर जिल्ह्यात लोकप्रिय झाले ते “दगडापेक्षा वीट मऊ” असे म्हणत जिल्हावासियांनी केसरकरांना साथ दिली. अक्षरशः डोक्यावर घेतले…केसरकर दोन वेळा मंत्री झाले. परंतु ज्या राणेंच्या विरोधात दंड थोपटून दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून राजकीय प्रवास सुकर केला त्याच राणेंच्या सोबत जात बदलत्या सत्तांतरात राणेंचाच प्रचार करण्याची तयारी दर्शवून केसरकरांनी जिल्हयातील जनतेला कोणता संदेश दिला…? केसरकरांनी दिशा बदलली म्हणजे जिल्ह्यात पूर्वी दहशतवादच नव्हता, केसरकर उगाच वावटळ उठवीत होते की, जिल्ह्यातील दहशतवादच संपला…? असे प्रश्न आज केसरकर प्रेमिंच्याच नव्हे तर जिल्ह्यातील प्रत्येकाच्या मनात उत्पन्न होत आहेत.
शिवसेना ही मराठी माणसांसाठी लढणारी संघटना…पक्ष म्हणून लोक शिवसेनेकडे कधीच आकर्षिले नव्हते, तर मराठी माणसांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरणारी संघटना म्हणजे शिवसेना…! अशीच शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची भावना होती. पण आज मराठी माणूसच रस्त्यावर उतरून दांडे घेऊन मराठी माणसांचीच डोकी फोडत आहेत. मराठी माणूसच मराठी माणसांच्या विरोधात लढत आहे. मालवण येथील राड्याच्या नंतर काल कणकवली जवळच राड्याचे केंद्रबिंदू राहिलेल्या कनेडी येथे भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट अशा दोन गटांमध्ये राडा झाला. तो सुद्धा मराठी माणसांमध्येच…! राडे नवीन परंतु राडे करणारी माणसे तीच असतात जी केसरकर यांनी विरोध केलेली तीच…! परंतु बदलत्या सत्तेच्या राजकारणात नाम.केसरकरांनी विरोधकांशी जुळवून घेतल्याने भविष्यात निवडणुकीच्या प्रचारात नाम.केसरकर आता “दहशतवाद संपला अशी कॅसेट वाजवणार का…?” असा प्रश्न जिल्हावासिय नक्कीच विचारणार हे मात्र खरे….!

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 7 =