You are currently viewing कवितेने मला काय दिले
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

कवितेने मला काय दिले

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री नंदिनी चांदवले लिखित अप्रतिम लेख*

*कवितेने मला काय दिले*

निसर्गतःच आपल्याला कोणतीतरी देणगी मिळालेली असते . कोणाला साहित्यात कोणाला चित्रकलेत तर कोणाला हस्तकलेत रूची असते . मात्र ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. आई वडील योग्य वेळी आपल्याला शाळेत घालतात. शाळेच्या सुंदर वातावरणात मित्र मैत्रिणीत आपण रमून जातो.आपण शब्दांचे बोट धरून लिहू वाचू लागतो. ‘आई माझा गुरु सौख्याचा सागरू ‘ हे शंभर टक्के खरे असले तरी गुरुजनांचा वाटाही खूप मोठा असतो प्राथमिक, माध्यमिक ,उच्चशिक्षण व्यवहारी शिक्षण ,चांगले नागरिक बनवणे यासाठी गुरुजनांचा फार मोठा वाटा असतो म्हणतात ‘ ना गुरुविण कोण दाखवील वाट ‘… शिक्षणाच्या बाबतीत माझ्या बहिणीलाही मी माझा गुरु मानते. ती माझ्यापेक्षा बरीच मोठी असल्याने तिने पहिलीत जाण्यापूर्वीच माझा पहिलीचा अभ्यास पूर्ण करून घेतला होता. त्यामुळे शाळेत माझे कौतुक झाले. मला अभ्यासाची गोडी लागली . त्या वेळच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत पहिलीत असताना आमच्या बाईंनी” छान किती दिसते फुलपाखरू” ही कविता सअभिनय शिकवलेली अजूनही आठवते . खेड्यातल्या मानानं माझी शाळा मोठी व सुंदर होती. सातवीपर्यंतचे वर्ग होते हायस्कूलला गेल्यावर ऑफ तासाला आम्ही सर्व मुली कविता म्हणत असू मजा यायची व पाठही होत असायच्या. पुढे दिवाळी अंक इतर पुस्तके यांची वाचनाची गोडी लागली ययाती, श्रीमान योगी, मृत्युंजय, स्वामी यासारखी अनेक पुस्तके हायस्कूलला असतानाच वाचली त्यामुळे मराठी भाषा सुधारली मी चांगले निबंध लिहू लागले. काही कथाही लिहिल्या त्यावेळी कवितेकडे माझे फारसे लक्ष नसायचे पण आवडायच्या.


कोल्हापूरला कीर्ती कॉलेजमध्ये प्री. डिग्री ला प्रवेश घेतला. सुदैवाने मला प्राध्यापक सूर्यकांत खांडेकर, प्राध्यापक गिंडे , प्राध्यापक अंबादास माडगूळकरa यासारखे उत्तम प्राध्यापक लाभले. त्यांच्या तासाला अख्खावर्ग मंत्रमुग्ध व्हायचा. सरांची शिकवण्याची हातोटी खडा आवाज मुखोद्गत कविता. याचा मनावर फार चांगला परिणाम झाला मला मराठी जास्तच आवडू लागले . आमच्या कॉलेजचे प्राचार्य बॅरिस्टर पी.जी. पाटील आमच्या वर्गावर ऑफ तासाला यायचे इंग्लंडमध्ये शिक्षण घेतले होते त्यामुळे त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व होते अत्यंत खेळीमेळीच्या स्वभाव त्यामुळे त्यांचा तास संपूच नये असं वाटायचं. लेक्चर देता देता आम्हाला इंग्लंडची सफर घडवून आणायचे. इंग्रजी कवी व त्यांच्या कविताने आमचा वर्ग काव्यमय व्हायचा इंग्रजी कवींच्या कविता त्यातील कल्पना, विषय, निसर्ग उलगडून दाखवायचे एकदा बोलता बोलता ते काय म्हणाले आठवत नाही पण एका कवितेचे बीज माझ्या मनात पडले आणि ती पहिली भ्रम नावाची कविता लिहिली. मासिकात छापूनही आली . अजूनही सर्वांना आवडते. आणि मी खऱ्या अर्थाने कवितेकडे वळले . खूप काही सांगायचं असेल तर कवितेमध्ये चार ओळीत सांगू शकतो. हा ही एक मुद्दा आहेच त्यामुळेच मी एका कवितेत म्हटलं आहे.
कथे कथे …तू तुझ्या जागी
मी माझ्या जागी
मी असेन इवलीशी
पडून असेन कोपऱ्याशी
पण, चार ओळीतच सांगेन
संसाराचे मर्म साऱ्या जगाशी !
मनाच्या भावना, मनातली खळबळ… थोडक्यात सांगणारी कविता माझी सखी झाली. मला कवितेतच रमायला आवडू लागले. इतर कवितासंग्रह ही वाचले हाच माझा कवितेचा अभ्यास. पण सुचेल तसं लिहीत गेले आणि मन मोकळं करण्यासाठी कवितेने मला वरदान दिले. माझ्या कविता मैत्रिणींना आवडत असत. पुढे लग्न झाल्यावर माझा कवितेचा छंद मागे पडला
आणि …
कविते..छंद मला तुझा
होता कधीपासून
कळलेच नाही मला
गेलीस कधी निसटून . ..
या कवितेच्या ओळी अवतरल्या
ही निसटलेली कविता संसारातून मोकळीक मिळाल्यावर आपसूकच नेमक्या वेळी माझ्या जवळ आली .
आणि माझा आनंद मला परत मिळाला
एकदा मला कोणीतरी म्हटलं असं काय आहे कवितेत ? आणि… कविता निर्माण झाली
*आनंद*
अंतःकरणात खोलवर
जाणीव होते एकाएकी
कविते तू येणार, फुलणार,
बहरणार डोळे मिटून
मी तयार होते तुला
झेलण्यासाठी…
तू येतेस साकारतेस,
पूर्णही होतेस
आणि.. मातृत्वाचा आनंद
देऊन जातेस !


अशी ही माझी कविता मला जीवनातला अत्युच्च आनंद देते म्हणूनच म्हणतात ना कवि कविता करत नाही तर ती त्याला होत असते. असा उत्कट आनंद देणारी कविता मला भेटली आणि माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली ही कविता म्हणजेच माझी दुहिता . संसार करत असताना कवितेला पूर्ण वेळ देता येत नाही . पण त्यातून विसावा मिळाल्यावर मी निसर्गाने मिळालेली प्रतिभा व कविताची आवड याची सांगड घालून मी जोमाने माझा छंद जोपासू लागले. कविता मासिकात दिवाळी अंकात छापून आल्या. अनेकदा आकाशवाणी पुणे केंद्र व विद्या वाणी रेडिओवर ,बालोद्यान पुणे केंद्र येथे कविता वाचनाचे, पुस्तक,ग्र॔थ परिचयाचे, ग्रंथ परिचय ,बालोद्यान पुणे केंद्र येथे अनेक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. पुणे आकाशवाणी केंद्रावर *आठवणीतील कविता* याचे तीन भागही आम्ही मैत्रिणींनी सादर केले आहेत.
मैत्रिणींचे आप्तांचे प्रोत्साहन मिळाले. कविसंमेलनातून काव्यवाचनासाठी चांगली दाद मिळाली हा अवर्णनीय आनंद मला कवितेनेच दिला. माझ्या आनंदाचा आलेख वर चढला . पिंपरी पुणे, ठाणे, डोंबिवली, बडोदा, यवतमाळ, उस्मानाबाद येथील अखिल भारतीय मराठी कवी संमेलनात कविता सादर करण्याची संधी मिळाली . काही कवितांना पारितोषिकेही मिळाली आणि या कविता साहित्य सागरात छोटेसे अस्तित्व निर्माण झाले . त्याची जाणीव झाली हा माझ्या दृष्टीने परमानंदच आहे.
लहान मुलांसाठी ही मी अधून मधून कविता लिहीत असते. छोट्यांच्या कवितांनी वेगळाच व निरागस आनंद मिळतो . आपण आपलं बालपण आठवतो . आपली संवेदनशीलता टिकून राहते .माझ्या बालकविताही आनंद मासिकात व वनस्थळी या मासिकात छापून आल्या मैत्रिणींच्या व आप्तांच्या प्रेरणेने माझा जून 2018 साली *संवाद* नावाचा कवितासंग्रह प्रकाशित झाला . त्याला डॉक्टर मंदा खांडगे यांची दीर्घ प्रस्तावना लाभली हा आनंद मी विसरू शकत नाही . 2020 साली *’हलवा याचं दुकान*’ हा बालकविता संग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर *चिऊताई चा फ्रॉक* हा संग्रह ही प्रकाशित झाला. त्याचं भाग्य इतकं थोर की डॉक्टर विजया वाड यांच्या वाढदिवसादिवशी निशिगंधावाड यांनी इतर अनेक पुस्तकांबरोबर ऑनलाईन भव्य प्रकाशन सोहळा संपन्न केला.
कविता माझा छंद . माझी दुहिता.. पावलोपावली मला आनंदही देते. आनंदी ठेवते. प्रसंगी धीर देते . मन मोकळं करते. कठीण प्रसंगातून वाट काढताना मनाला दिलासा देते . मन हलकं करते . अशी ही मला सुखाची शिदोरी मिळवून देणारी माझी सखी आहे . म्हणूनच मी तिची शब्द फुले वेचायला सदैव ओंजळ खुली ठेवते.
आणखी काय हवं ?
———–
नंदिनी प्रभाकर चांदवले.
औंधरोड, पुणे.
9766238408.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 2 =