You are currently viewing मराठा मंदिरची काव्यवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न

मराठा मंदिरची काव्यवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न

*कवींनी लोकांना आवडते म्हणून आपली एकच कविता पुन्हा पुन्हा सादर न करता नवनवीन कविता रचत राहिले पाहिजे – प्रा. सामंत*

*मराठा मंदिरची काव्यवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

मुंबई येथील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणार्‍या मराठा मंदिराच्या प्रागतिक संघाच्या शाखेमार्फत काव्यवाचन स्पर्धा २०२३ चे रविवार २२ जानेवारीला मराठा मंदिराच्या शिंदे सभागृहामध्ये संपन्न झाली. प्रागतिक संघाचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकात मराठा मंदिराच्या उपक्रमांची माहिती दिली. काव्यवाचन स्पर्धेची उद्दिष्टे सांंगितली. शासनाने सुचित केल्याप्रमाणे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पंधरवडा सर्वत्र साजरा होत आहे त्याचाच एक भाग म्हणून मराठा मंदिराच्या वतीने काव्य स्पर्धा होत आहे हा दुग्धशर्करा युक्त योग आहे, असेही ते म्हणाले. मराठी भाषा संवर्धनासाठी मराठा मंदिराचाही खारीचा सहभाग असे सांगून काव्य व भाषेचे अतूट नाते कसे आहे हे विषद केले. काव्य हा भाषिक व्यवहाराचा एक प्रकार आहे. ‘भाषेपासून’ व ‘भाषेत’ घडणे हे काव्याचे एक स्थूल वैशिष्टय आहे. याचा अर्थ एवढाच की, भाषा ही काव्याची पहिली अट होय. भाषेशिवाय काव्य असू शकणार नाही. भाषा हा काव्यरचनेचा आवश्यक घटक असून काव्याचा व्यवहार हा एक प्रकारचा भाषिक व्यवहार आहे असे आपले मत श्री. चव्हाण यांनी प्रतिपादीत केले.

काव्यवाचन स्पर्धेस साहित्यकार प्रा. हेमंत सामंत व जयश्री संगितराव हे परीक्षक म्हणून लाभले होते. स्पर्धेसाठी पन्नास कवी कवयित्रींनी कविता पाठवल्या होत्या, पैकी पंचेचाळीस कवींनी उपस्थित राहून आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. अडीच तास चाललेली ही मैफल पुढे पुढे रंगतदार होत गेली. सर्वच कवी शेवटपर्यंत थांबले होते व परस्परांना टाळ्या वाजवून दाद देत होते. सादरीकरण संपल्यानंतर दोन्ही परीक्षकांनी कवितांचे समीक्षण थोडक्यात परंतु सर्वच कवितांना स्पर्श करताना हलके फुलके भाष्य करुन कवींना मार्गदर्शन केले. कवींनी लोकांना आवडते म्हणून आपली एकच कविता पुन्हा पुन्हा सादर न करता नवनवीन कविता रचत राहिले पाहिजे, सादर करीत राहिले पाहिजे. कविता मोठ्या लिहून त्या कंटाळवाण्या न करता छोट्या कवितेने म्हणजे एक दोन कडव्यात किंवा चार ओळीच्या चारोळ्यांनी सुद्धा श्रोत्यांना आनंद देण्याची किमया साधता येते. मोठ्या कविता केल्या जातात मात्र कित्येकदा कवितेमध्ये आशय हरवलेला असतो. कवींनी कविता संपवताना आशय प्रकट करणे गरजेचे आहे म्हणजे कवितेत जिवंतपणा येतो. कवितेचे परीक्षण चार निकषांवर केले. त्यामध्ये कवितेचा विषय, त्याची मांडणी, लय व सादरीकरण यांचा अंतर्भाव होता. सादर झालेल्या पंचेचाळीस कवींमधून गुणाक्रमानुसार प्रथम क्रमांक – भैरवी चितळे -देशपांडे, द्वितीय – सुभाष मोहिते, तृतीय – गणपत चव्हाण, उत्तेजनार्थ – गौरी शिरसाट आणि दिपक शेडगे यांना रोख रक्कम आणि सन्मानपत्र स्वरुपात पारितोषिके तसेच सहभागी सर्व कवींना मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाला चंद्रकांत खोपडे तसेच सौ. साळुंके हे मराठा मंदिराचे पदाधिकारी उपस्थित होते, अध्यक्ष म्हणून अॅड. प्रदीप विचारे यांनी अध्यक्षीय मनोगतात संमेलन चांगले रंगतदार केल्याबद्दल सहभागी कवींचे कौतुक केले. साहित्य शाखा नवोदित साहित्यिकांना वाडःमयीन पुरस्कार देते त्याविषयाची माहिती दिली.

संमेलनाचे सूत्रसंचालन सुवर्णा जाधव यांनी उत्तमप्रकारे केले. प्रत्येक सहभागी कवींना त्या आपल्या हळुवार शब्दांनी उत्तेजन देत होत्या त्यामुळे स्पर्धा रंगतदार झाली. सरतेशेवटी आपली कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. आभारप्रदर्शनात सहभागी झालेले कवी, परीक्षक, मंदिराचे उपस्थित पदाधिकारी, आयोजक प्रदीप विचारे व दिलीप चव्हाण, समिती सदस्य व सर्वात महत्वाचे म्हणजे मराठा मंदिराचा कर्मचारी वर्ग यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दलह आभार व्यक्त करण्यात आले आणि राष्ट्रगीताने संमेलनाची सांगता करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + 11 =