You are currently viewing साकव्य मुंबई विभागाचे संमेलन ठाणे येथे मोठ्या उत्साहात पार पडले

साकव्य मुंबई विभागाचे संमेलन ठाणे येथे मोठ्या उत्साहात पार पडले

*साकव्य मुंबई विभागाचे संमेलन ठाणे येथे मोठ्या उत्साहात पार पडले*

रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ या दिवशी श्रीमती अरुणाताई मुल्हेरकर यांच्या निवासस्थानी, ठाणे, रुस्तमजी अरबेनिया येथे मुंबईतील साकव्य सदस्यांचे एक छोटेखानी संमेलन झाले. या संमेलनाला जवळपास पंचवीस सदस्य उपस्थित होते. संध्याकाळी चार ते सहा वाजेपर्यंतची वेळ ठरलेली असताना उत्साहाच्या भरात प्रत्यक्ष कार्यक्रम आठ वाजेपर्यंत कसा लांबला ते कोणालाही जाणवले नाही. या कार्यक्रमात सुरुवातीला सर्वांनीच आपापला परिचय विस्तृतपणे करून दिला. परिचयाच्या ओघातच सौ.कल्पना गवरे मॅडम यांनी त्यांच्या परदेशात होऊ घातलेल्या आपल्या साकव्यच्या कार्यक्रमाच्या नियोजनाविषयी आणि एकूणच परदेश सहल, परदेश यात्रा यांची विस्तृतपणे माहिती दिली.
सर्वात प्रथम श्री.विलास कुलकर्णी जे साकव्यचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्यांनी ‘आरोग्य मंच’ या साकव्यच्या शाखेसंबंधी आणि हातावरील आणि पायांवरील विशिष्ट जागी दाब दिल्यानंतर होणाऱ्या आरोग्याच्या सुधारणेविषयी खूप महत्त्वपूर्ण, मौलिक असे मार्गदर्शन केले. त्याची काही प्रात्यक्षिकंही त्यांनी दाखवली.
त्यानंतर श्रीमती अरुणाताई यांनी संगीताबद्दलची प्राथमिक माहिती सांगितली. सात सूर आणि त्याच्या अनुषंगाने येणार्‍या अनेक रागांपैकी भूप आणि आणि यमन या रागातली गीतं गाऊन दाखवली. प्रकाश जोशी, श्रद्धा जोशी, सौ वाणी यांनी गायन सादर केले. साकव्यचे चिटणीस श्री.चंद्रशेखर शुक्ल यांच्या ‘अबीर गुलाल’ या अभंगाने अगदी रंगत आणली. हेमंत साने यांनी स्वतः संगीत दिलेलं छानसं गाणं सादर करून सर्वांचच मन जिंकलं.
यानंतर श्री.सोनवणे सर यांनी गझलेच्या संदर्भात प्राथमिक माहिती दिली. सोनवणे सर, वैभव लोखंडे आणि श्री बागवे यांनी सादर केलेल्या तरन्नुममधील गझला अतिशय बहारदार अशा झाल्या.


साकव्यच्या नव्यानेच सुरू झालेल्या ‘साकव्य संस्कृत मंच’ याविषयीची आणि संस्कृत शिकण्याची आवश्यकता का आहे? यांची प्राथमिक माहिती श्री हेमंत कुलकर्णी सरांनी सांगितली.
चंद्रशेखर शुक्ल, विलास कुलकर्णी पांडुरंगदादा कुलकर्णी या सर्वांनीच हितचिंतक सभासदांची संख्या वाढवणं का आवश्यक आहे, त्याचे भविष्यात कोणते फायदे आहेत हे वारंवार सांगितलं. हितचिंतक सदस्यांची संख्या वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला. सरते शेवटी पांडुरंग दादा कुलकर्णी यांनी समारोपाचं भाषण केलं त्यामध्ये त्यांनी साकव्यच्या आतापर्यंतच्या आणि भविष्यात होऊ घातलेल्या मार्गक्रमणाचा थोडक्यात आढावा घेतला आणि त्याची माहिती सर्वांना करून दिली. कार्यक्रमाच्या दरम्यान अरुणाताईंनी अतिशय सुयोग्य पद्धतीने सर्वांच्या खाण्यापिण्याची अतिशय उत्तम अशी व्यवस्था केलेली होती. त्याचा सर्वांनीच मनमुराद आस्वाद घेतला.


आतापर्यंत साकव्यचे सभासद ज्यांना देवाज्ञा झाली त्यांच्यासाठी आणि राष्ट्रीय पातळीवर जे जे कोणी वीर हुतात्मे अनंतात विलीन झाले त्या सर्वांसाठी एक मिनिटाचे मौन धारण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करून सगळेजण अतिशय आनंदाने आणि या संमेलनातून खूप काही घेऊन आपापल्या घरी परतले. अशाप्रकारे अतिशय हृद्य असा हा सोहळा साजरा झाला. साकव्यच्या शिरपेचात अजून एक मानाचा बिंदू या कार्यक्रमातून जोडला गेला.

*वृत्तांकन— हेमंत कुलकर्णी, मुलुंड, मुंबई.*

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − 4 =