You are currently viewing अनिल राणे यांची शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड

अनिल राणे यांची शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड

ओरोस :

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी अनिल राणे यांची रविवारी बिनविरोध निवड करण्यात आली. तर सचिव पदावर गजानन नानचे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी बांधवांचा लढवय्या नेता म्हणून अनिल राणे परिचित आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची सर्वसाधारण सभा व नूतन कार्यकारिणीची निवड रविवारी माध्यमिक पतपेढी सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथील सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. राज्यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दोन संघटना निर्माण झाल्या होत्या. त्या दोन्ही संघटनांचे एकत्रीकरण झाले असल्यामुळे जिल्ह्यातही माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची एकच संघटना असावी, या दृष्टीने प्रयत्न करून तसा ठराव २० नोव्हेंबर २०२२ ला घेण्यात आला होता.
दरम्यान ह्याच उद्देशाने जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची एकच संघटना व एकच अध्यक्ष असावा, यासाठी नवीन निवड प्रक्रिया पार पडली. या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून गोवर्धन पांडुळे पुणे विभागीय सचिव महामंडळ महाराष्ट्र राज्य, संजय पाटील निवडणूक निरीक्षक कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष, बाबा गडगे महामंडळाचे माजी अध्यक्ष व निवडणूक अधिकारी म्हणून उदय घाटवळ यांनी काम पाहिले.
प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत अनिल राणे व गजानन नानचे यांनी केले. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी आठही तालुक्यातील उपस्थित असलेल्या शिक्षकेतर कर्मचारी बांधवांना निवडणूक निर्णय अधिकारी घाटवळ यांनी निवड प्रक्रिया गुप्त घ्यावी की हात उंचावून घ्यावी? याबाबत विचारणा केली असता उपस्थित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हात उंचावून निवड प्रक्रिया घेणेबाबत सहमती दर्शविली.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदासाठी उपस्थितांमधून अनिल राणे यांनी इच्छा व्यक्त केली. आणि राणे यांच्या विरोधात कोणीही उभे न राहता एकमताने हात उंचावून त्यांना आपले मत दिले व अनिल राणे शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले. दरम्यान सचिव पदासाठी देखील गजानन नानचे यांची बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्षपदी सुहास देसाई (दोडामार्ग), उपाध्यक्ष महिला धनश्री गावडे, उपाध्यक्ष सेवक गोपाळ चौकेकर, उपाध्यक्ष सेवक लाडू जाधव, सहसचिव यादवराव ठाकरे, कार्याध्यक्ष प्रदीप सावंत, खजिनदार गोपाळ हरमलकर यांची निवड झाली.
राज्य प्रतिनिधी म्हणून वैभव केंकरे व सेवक श्री. ओमदेव यांची निवड करण्यात आली. तर हिशोब तपासणीसपदी कैलास घाडीगावकर, संघटक पदी निलेश पारकर, रवीकमल सावंत, महिला प्रतिनिधी शर्मिला गावकर, युवा संघटक पदी सुधाकर बांदेकर, तानाजी खोत, ज्येष्ठ सल्लागार म्हणून काका मांजरेकर, पांडुरंग दळवी यांची बिनविरोध निवड झाली तर सदस्य पदासाठी बळीराम सावंत, श्री. सावंत सर, विनायक पाटकर, रुपेश खोबरेकर, राकेश खाजनवाडकर, गणेश देसाई, अनिल कदम, गजानन गवस व गोविंद चिपकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सदर निवड प्रक्रिया पार पडली असून सर्वांनी अनिल राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करणे पसंत केले. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सर्व निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गोपाळ हरमलकर विजय गवस ,शाबी तुळसकर, वैभव कंट्री गोविंद कानसे, राकेश खाजवाडकर आदींनी परिश्रम घेतले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन्ही संघटनेचे एकीकरण झाले असल्याने शिक्षकेतर कर्मचारी बांधवांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण पसरले असून राज्य महामंडळाचे पुढील वर्षीचे राज्य अधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातच घेणार असा शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी यावेळी निश्चय केला.
प्रास्ताविक गजानन नानचे यांनी केले. सूत्रसंचालन सुहास देसाई यांनी तर आभार प्रदर्शन अनिल राणे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =