You are currently viewing भविष्याचा वेध घेणारी महान विभूती म्हणजे बॅ नाथ पै: प्रवीण बांदेकर

भविष्याचा वेध घेणारी महान विभूती म्हणजे बॅ नाथ पै: प्रवीण बांदेकर

कुडाळ :

“भविष्याचा वेध घेणारी महान विभूती म्हणजे बॅ. नाथ पै. सर्वसामान्यांवर नितांत प्रेम करणारे आणि त्यामुळे त्यांना आपलेसे वाटणारे बॅरिस्टर नाथ पै कोकणी मातीशी, इथल्या संस्कृतीशी, इथल्या लोकांच्या सुख-दुःखाशी बांधले गेले असल्याने बॅरिस्टर नाथ पै यांच्या चिरस्मृती आजही लोक आपुलकीने जपताना पाहायला मिळतात. अशा महान विभूतींचे विचार आत्मसात करून आणि त्याच्या विचारांची कास धरून आपण जनतेची सेवा केली तर खऱ्या अर्थाने बॅरिस्टर नाथ पै यांच्या कार्याची ती पोचपावती ठरेल”, असे उद्गार ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ प्राप्त प्रतिथयश साहित्यिक प्रवीण बांदेकर यांनी काढले. ते बॅरिस्टर नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट व बॅ. नाथ पै शिक्षण संस्था आयोजित बॅ. नाथ पै पुण्यतिथी व शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून कोकणी माणसांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे, त्यांचे दुःख त्यांच्या समस्या सरकार दरबारी मांडून त्याचा पाठपुरावा करणारे आणि सर्वात जास्त कोकणी जनतेचा आदर मिळालाय असेच महान सुपुत्र बॅ.नाथ पै होते. त्यांच्या नावाने त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन उमेश गाळवणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बॅ नाथ पै शिक्षण संस्था स्थापन केली व विविध अभ्यासक्रमाने परिपूर्ण करत व भविष्याचा वेध घेत नवीन क्वालिटी पूर्ण अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत ते फार कौतुकास्पद आहेत. असे सांगत संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्यानंतर “उजव्या सोंडेच्या बाहुल्या” या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पुस्तकाबद्दल बोलताना ते म्हणाले ‘प्रत्येकाने इथल्या मातीशी इथल्या संस्कृतीशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजूबाजूची माणसं उघड्या डोळ्यांनी पाहिली तर आपल्याला इथल्या लोकांच्या बटबटीत समस्या अस्वस्थ केल्याशिवाय राहत नाही आणि संवेदनशील लेखकाला यापासून दूर राहता येत नाही “असे सांगत साहित्याची निर्मिती प्रक्रिया, ज्वलंत समस्या याबाबतचा लेखकांचा- साहित्यिकाचा दृष्टिकोन याबद्दल उपस्थितां समोर मनोगत व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर बॅ नाथ पै यांची नात अदिती पै, उमेश गाळवणकर, प्रदीप नेरुरकर, प्रसिद्ध आर्किटेक्चर अमित कामत उभयतां, संस्थेच्या सीईओ अमृता गाळवणकर, बॅ .नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या प्रा डॉ. प्रगती शेटकर, बॅ नाथ पै आणि रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य मीना जोशी, बी.एड महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. परेश धावडे, बॅ.नाथ पै विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अशोक येजरे, सी बी एस ई सेंट्रल स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.शुभांगी लोकरे, उपमुख्याध्यापिका विभा वझे इत्यादी उपस्थित होते.

दीप प्रज्जवलन करून व नाथ पै यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरू झालेल्या या वर्धापन दिन सोहळ्याची सुरुवात सेंट्रल स्कूलच्या मुलांनी गायलेल्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवीण बांदेकर यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रवीण बांदेकर यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

अदिती पै यांनी नाथ पै यांच्या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देताना विविध कला संस्कृती नाट्य इत्यादी कलेंचे आवड असणारे अभ्यासू नाथ पै अशा त्यांच्या अज्ञात व्यक्तिमत्त्वाचा उपस्थितांना परिचय करून दिला.

प्रदीप नेरुरकर यांनी आपल्या मनोगतामध्ये बॅ नाथ पै यांचे विचार मनात रुजवा असे सांगत त्यांच्या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाचा परिचय करुन दिला. कोणतीही शिक्षण संस्था तिच्या रोपट्याला खत पाणी घातल्याशिवाय वाढू शकत नाही आणि हे काम संस्थाचालकांनी केल्यामुळेच संस्थेचे मोठ्या वृक्षांमध्ये रूपांतर होत आहे. याची उपस्थितांना जाणीव करून दिली.

अशोक येजरे यांनी मनोगत व्यक्त करत असताना सुसंस्कृत राजकारणी म्हणजे नाथ पै. आदर्श वक्ते, बुद्धिवंतातील प्रतिभावंत व सामान्यातील असामान्य असलेले बॅ नाथ पै यांच्या कार्य कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला.

सुप्रसिद्ध आर्किटेक्चर अमित कामत यांनी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने महान व्यक्तींना आदरांजली अर्पण करायची असते मी माझ्या आर्किटेक्चर कौशल्याचा वापर करून बॅरिस्टर नाथ पै यांचे अजरामर स्मारक तयार करीत आहे.ते चांगले झाले तर तिचं त्यांना आदरांजली ठरेल.असे सांगत आदरांजली अर्पण केली व संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी बॅ नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा यातील गुणवंत स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण मर्गज यांनी केले सूत्रसंचालन गौतमी माईणकर हिने तर उपस्थितांचे आभार विभा वझे यांनी मानले. यावेळी विविध अभ्यासक्रमाचे प्राध्यापक, प्राचार्य ,नाथ पै प्रेमी जयराम डिगसकर,श्री सांगळे सर व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − three =