You are currently viewing रंग उगवतीचे

रंग उगवतीचे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर यांची “ऋतुगंध” स्पर्धेत सर्वोत्कृष्ट क्रमांक प्राप्त काव्यरचना*

*वृत्त अनलज्वाला*
*रंग उगवतीचे*

रोज येतसे पहाट लेवुनि रंग केशरी
स्वागतासही उभी प्राचिला प्रभा हासरी

झाडांमधुनी लपुनी पाही किरण कोवळे
भास्कर नेसुनि येतो भगवे वस्त्र सोवळे

हिरवा शालू किनार पिवळी बघ सृष्टीची
विसरुनि जाऊ स्वप्न पाहिली ती रात्रीची

पाण्यामध्ये प्रतिबिंब कसे खुलुनी दिसते
ओठांवरती नकळत सुरेल गाणे रुळते

विहरत पक्षी मग स्पर्शाया नभात जाती
घडते पाहा धरणीवरती सुवर्ण क्रांती

दूर सारुनी आडोश्याला दिनकर आला
सोनसळी त्या किरणांचाही उत्सव झाला

उगवतिचे हे रंग नव्याने उजळुनि आले
नवीन वर्षी संकल्प नवे अंकित झाले

©[दीपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =