चॅपेल गल्ली-जुना बाजार मार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; चार दिवस उलटूनही काम न झाल्याने नगरसेवकांनी घेतली पुढाकाराने दुरुस्ती
सावंतवाडी :
दैवज्ञ गणपती मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या चॅपेल गल्ली-जुना बाजार मार्गावरील रस्त्यावर पाणी साचून निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे स्थानिक नागरिकांना अनेक वर्षांपासून मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येबाबत स्थानिक नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही झाली नव्हती.
यामुळे नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी “आजच्या आज रस्ता दुरुस्ती करा, अन्यथा आम्ही स्वतः करून घेऊ,” असा इशारा दिल्यानंतर नगराध्यक्षा श्रद्धा भोसले, बांधकाम विभागाचे अभियंता तुषार सरडे व मनोज राऊळ यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली होती. त्यावेळी तातडीने रस्ता दुरुस्तीचे आदेश देण्यात आले असून त्याबाबत प्रसिद्धीपत्रकही जारी करण्यात आले होते.
मात्र, चार दिवस उलटूनही प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू न झाल्याने संतप्त नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी अखेर स्वखर्चातून संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती करून घेतली.
या कामामुळे स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त करत अनेक वर्षांपासून प्रलंबित व दुर्लक्षित राहिलेला रस्ता स्वतः पुढाकार घेऊन पूर्ण केल्याबद्दल नगरसेवक देव्या सूर्याजी यांचे आभार मानले.
यावेळी शशांक प्रभू, सालू फर्नांडिस, राकेश गवंडळकर, प्रथमेश प्रभू यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
