राज्यस्तरीय शालेय बुद्धीबळ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन…
सिंधुदुर्गनगरी
बंधमुक्त खेळ मन लावून एकाग्रतेने खेळा, हरलात तरी नाउमेद होऊ नका, मात्र कुठे हरलो त्यावर विचार करुन ‘ग्रँडमास्टर्स” होण्यासाठी प्रयत्न करा,अशा शब्दांत जिल्हा व महिला बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने १४ वर्षाखालील मुले व मुलींसाठी राज्यस्तरीय शालेय बुद्धीबळ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन हिर्लोक येथील मामाचो गाव रिसॉर्ट येथे झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे श्री. रसाळ म्हणाले, बुद्धीबळ हा बुध्दीचा खेळ आहे. बुध्दीचा जोर लावा. कस लावा. येथून जाताना खेळ जिंकून जा. हरलात तरी उमेद न सोडता, कुठे कमी पडलो त्यावर विचार करून कमतरता शोधा. त्याची प्रेरणा घेवून पुढे विजयी व्हा.
अध्यक्षीय भाषणात जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते म्हणाले, खेळात सराव आणि सातत्य नेहमी राहीले पाहीजे. सराव आपल्याला परिपूर्ण बनवतो, गुणवत्ता टिकवण्याचे सार म्हणजे सराव. मन लावून खेळा. आपल्या घराचे, आपल्या गावाचे पर्यायाने आपल्या राज्याचे, आपल्या राष्ट्राचे नाव उज्ज्वल करा.
सुरुवातीला कुस्तीपटू ऑलिंपिक वीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी स्पर्धेबाबत माहिती दिली. यावेळी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, चेस इन स्कूलचे राज्य सचिव सुमुख गायकवाड, जिल्हा बुद्धीबळ असोसिएशनचे सचिव श्रीकृष्ण आडेलकर, पवन डोडेजा उपस्थित होते. क्रीडा अधिकारी मनीषा पाटील यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे, शाम देशपांडे, सिद्धांत रायकर, यश साळोखे, कविता मेस्त्री, मंगेश माने यांनी परिश्रम घेतले.