मदत देण्याबरोबरच गव्यांचा बंदोबस्त करा, हेमंत मराठे…
सावंतवाडी
गवारेड्यांच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात दोन गाईंचा मृत्यू झाला. ही घटना आज मळेवाड-धनगरवाडी येथे घडली. यातील एक गाय गाभण होती. यात शेतकरी धाकू शेळके यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान या घटनेची माहिती उपसरपंच हेमंत मराठे यांनी वनविभागाला दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यावेळी गवा रेड्यांचा वेळीच बंदोबस्त करा, अशी मागणी श्री. मराठे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेळके यांनी आपली गुरे माळारानावर चरण्यासाठी सोडली होती. यावेळी त्यांच्यावर अचानक सहा ते सात गवारेड्यांच्या कळपाने हल्ला केला. यात संबंधित दोन्ही मृत गाईंनी त्यांच्याशी झुंज दिली. मात्र त्यांची ती झुंज अपयशी ठरली. त्या मृत गाईंमध्ये एका गाभण गाईचाही समावेश आहे. या दुर्घटनेमुळे शेळके यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान त्यांना तात्काळ मदत देण्यात यावी, तसेच गवारेड्यांचा वेळीच बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी श्री.मराठे यांनी वन विभागाकडे केली आहे.