You are currently viewing सावंतवाडीत कचरा गोळा करण्यासाठी आणलेल्या ई-रिक्षांची “ट्रायल”

सावंतवाडीत कचरा गोळा करण्यासाठी आणलेल्या ई-रिक्षांची “ट्रायल”

सावंतवाडी

घंटागाड्यांना पर्याय म्हणून शहरातील कचरा उचलण्यासाठी सावंतवाडी पालिकेने आणलेल्या “ई-रिक्षा” नागरिकांच्या सेवेत उतरल्या आहेत. पहिल्या टप्प्यात काल दोन गाड्यांची आरोग्य विभागाकडून “ट्रायल” घेण्यात आली. यावेळी नागरिकांच्या प्रतिक्रिया व कचरा उचलण्याची गती याच्या नोंदी करण्यात आल्या. दरम्यान या गाड्यांमुळे सफाई कामगारांची मोठी मेहनत वाचणार असून जलद गतीने कचरा उचलण्याचे काम होईल, तसेच इंधनाचा खर्चही कमी येईल, हे प्रात्यक्षिकावरून दिसून येत आहे, असा विश्वास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून शहरातील कचरा उचलण्यासाठी सहा इ-रिक्षा पालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. सफाई कर्मचाऱ्यांची मेहनत वाचविण्यासाठी घंटागाड्यांना पर्याय म्हणून या ई-रिक्षा सेवेत आणण्यात आल्या आहेत. तर नुकतेच या गाड्यांचे आरटीओ पासिंग झाल्यानंतर काल दोन गाड्यांची ट्रायल घेण्यात आली. यावेळी या गाड्यांच्या माध्यमातून शहरातील कचरा गोळा करण्यात आला. दरम्यान नागरिकांच्या प्रतिक्रिया व कचरा उचलण्याची गती याच्या नोंदीही करण्यात आल्या, असे त्यांनी सांगितले. दरम्यान या गाड्यांमध्ये सुखा, ओला व सॅनिटरी वेस्ट कचरा असे तीन विभाग ठेवण्यात आले आहेत. त्यानुसारच नागरिकांनी कचऱ्याचे विलगीकरण करून गाड्यांमध्ये कचरा द्यावा, जेणेकरून सफाई कर्मचाऱ्यांना त्रास होणार नाही. तसेच गाड्यांचा “मेंटेनन्स” सुद्धा राहील, आणि अधिक काळ गाड्या चांगली सेवा देतील, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − eleven =