सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रवक्ते राहिलेले व माजी जिल्हापरिषद अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केलेले हेमंत उर्फ काका कुडाळकर हे मागील विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेस पक्षाच्या घडामोडींपासून काहीसे अलिप्त राहिले होते. विधानसभा निवडणूकीची दिलेली पक्षाची अधिकृत उमेदवारी ऐनवेळी नाकारल्याने पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बाजावली होती. तेव्हापासून ते अलिप्त होते. परंतु अलीकडेच त्यांची काँग्रेसच्या सेवा फौंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्त केले होते. परंतु काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या अनुभवाची कार्याची दखल न घेतली गेल्याने त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधण्याचे निश्चित केले आहे. ते उद्या आपल्या कार्यकर्त्यां समवेत महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत.
काका कुडाळकर हे राजकारणातील हुशार व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे वैचारिक बैठक आहे. एक विचारधारा घेऊन समाजात पुढे जाण्याची ताकद आहे. काका कुडाळकर हे मूळ शिवसेनेचे नेते होते. त्यांनी पहिली ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली होती, कुडाळ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा सरपंच बसविण्यात ते यशस्वी झाले होते. १९९७ मध्ये घावनळे जि प मधून अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी राजकारणाचे उत्तम ज्ञान घेत पुन्हा २००७ मध्ये कसाल जी प मतदारसंघातून निवडणूक लढवून ते निवडून आले. दुसऱ्याच वर्षी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनले.
शिक्षक भरतीसाठी डीएड धारकांचे आंदोलन झाले. त्यात त्यांनी डीएड धारकांचा शिक्षक भरतीत समावेश करण्यासाठी पुढाकार घेतला. शिक्षक भरतीसाठी २१ आंदोलने झाली होती. अखेर काका कुडाळकर यांच्यामुळे ४०० शिक्षकांची भरती झाली होती. जि. प.अध्यक्ष असताना प्रत्येक सदस्यांना ५ लाख रुपये त्यांनी सुचविलेल्या कामांवर खर्च करण्याची तरतूद केली. कुडाळकर यांच्यामुळे हाच नियम संपूर्ण महाराष्ट्रात लागू झाला. जि प अध्यक्ष असताना ५००० शिक्षकांचा मोर्चा जिल्हापरिषदेवर आला, त्याला हिमतीने सामोरे जात प्राथमिक शाळांची वेळ कमी करून दिली.
दैवज्ञ समाज कुडाळचे सचिव, लायन्स क्लब अध्यक्ष म्हणून काम केले. दुग्ध व मजूर संस्था स्थापन केली, तसेच विविध संस्थांवर ते कार्यरत आहेत. एक उत्तम वक्ता म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. कॉंग्रेसमध्ये असताना त्यांच्या उत्कृष्ट भाषण शैलीमुळे आणि हजरजबाबी पणामुळे काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते म्हणून नियुक्त केले होते. काका कुडाळकर हे सुद्धा नारायण राणे यांच्याच मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडे संघटन कौशल्य आहे त्याचप्रमाणे उत्तम नेतृत्वगुण आहेत. त्यामुळे आपल्या उत्तम नेतृवगुणांमुळे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात उभारी घेण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील.
काका कुडाळकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने पक्षाला जिल्हा पातळीवर नक्कीच चांगले दिवस येतील. त्यांच्यासारखा उत्तम वक्ता प्रभावीपणे राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येय्य धोरणे लोकांपर्यंत पोचवू शकेल, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळेल. काका कुडाळकर यांच्या नव्या वाटचालीस संवाद मीडियाच्या शुभेच्छा..💐