सावंतवाडीचे सुपुत्र डॉ.ऋत्विज पाटणकर जिल्ह्यातील पहिले एम.सी.एच. युरोलॉजिस्ट…

सावंतवाडीचे सुपुत्र डॉ.ऋत्विज पाटणकर जिल्ह्यातील पहिले एम.सी.एच. युरोलॉजिस्ट…

सावंतवाडी शहर ही मोत्यांची खाण, याचं खाणीत आणखी एक मोती सापडला तो म्हणजे डॉ.ऋत्विज पाटणकर…! येथील पाटणकर गॅस सर्व्हिसचे संचालक श्री.रामप्रसाद पाटणकर व संचालिका सौ.ऋचा पाटणकर यांचे जेष्ठ सुपुत्र डॉ.ऋत्विज पाटणकर हे नुकत्याच झालेल्या वैद्यकीय सुपरस्पेशालिटी परीक्षेत एम.सी.एच. युरोलॉजी उत्तीर्ण झाले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले एम.सी.एच. युरोलॉजिस्ट ठरले आहेत. २०१७ मध्ये झालेल्या पहिल्या राष्ट्रीय नीट सुपर स्पेशालिटी परीक्षेतून डॉ.ऋत्विज पाटणकर हे आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील डॉ.पी.एस.आय.एम.एस.अँड आर.एफ या वैद्यकीय महाविद्यालयात किडनी व मूत्रविकार यावरील शल्यचिकित्सक पदव्युत्तर सुपर स्पेशालिटी एम.सी.एच. युरोलॉजी मध्ये गेली तीन वर्षे कार्यरत आहेत. युरोलॉजी विभागात मूत्राशयाशी संबंधित विकारांवर उपचार होतात. यात प्रामुख्याने मुतखडा, किडनी विकार, मूत्राशयातील कॅन्सर, प्रोस्टेट ग्रंथींचे विकार, तसेच किडनी ट्रान्सप्लांट असे उपचार केले जातात.
विजयवाडा येथील डॉ.पी एस आय एम एस अँड आर एफ हे वैद्यकीय महाविद्यालय कृष्णा जिल्ह्याचे मुख्य जिल्हा रुग्णालय असल्याने कोरोनाच्या महामारीच्या काळात कोरोना वॉर्ड ड्युटी व अभ्यास दोन्हीची योग्य सांगड घालत त्यांनी हे यश संपादन केले. आंध्रप्रदेश राज्यातील शासकीय महाविद्यालयाची एम.सी.एच.युरोलॉजी ही परीक्षा सप्टेंबर महिन्यात पार पडली होती. कोरोनाच्या संकटात रुग्णसेवा देत असतानाच अभ्यासातही कुठेही कमी न पडता डॉ.ऋत्विज यांनी उल्लेखनीय यश संपादन केल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जिल्ह्यातील पहिले युरोलॉजिस्ट झाल्यामुळे सावंतवाडी सोबत जिल्हावासीयांनाही त्यांचा अभिमान वाटत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा