You are currently viewing साद फाउंडेशन सिंधुदुर्ग च्या वतीने, सावित्रीमाई फुले जयंती उत्सव साजरा

साद फाउंडेशन सिंधुदुर्ग च्या वतीने, सावित्रीमाई फुले जयंती उत्सव साजरा

दत्ता केसरकर व छाया केसरकर या दांपत्याला ‘साद’ चा “सावित्री-ज्योती सन्मान पुरस्कार” जाहीर.

 देवावर अवलंबून राहणाऱ्या देशात आपण सुद्धा गुलामीतच राहणार – गितांजली नाईक.

कणकवली/प्रतिनिधी

प्रत्येक भारतीयांनी सावित्रीमाई समजून घेताना या माऊली चे विचार सुद्धा अंमलात आणायला हवेत. रूढी,परंपरा व्रत, वैकल्य , त्याचबरोबर देव आणि प्रारब्ध यावर विश्वास ठेवणारे आळशी व भिकारी असून त्यांचा देश गुलामगिरीत राहतो असे विचार व्यक्त करणाऱ्या देशातील पहिली स्त्री शिक्षिका ,मुख्याध्यापिका आणि कवयित्री सावित्रीमाई ला प्रत्येक स्त्री ने आचरणात आणून,स्वतः प्रयत्न करत राहिले पाहीजे अशाच प्रकारे इतर देशांची प्रगती पाहता, देवावर अवंबून राहणाऱ्या देशात आपण सुद्धा गुलामीतच राहणार असे मत प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक यांनी साद फाउंडेशन सिंधुदुर्ग आयोजित सावित्रीमाई फुले जयंती उत्सव प्रसंगी अध्यक्षीय मनोगत मांडताना व्यक्त केले.
यावेळी साद फाउंडेशन सिंधुदुर्ग च्या अध्यक्ष आणि प्रशासकीय अधिकारी मा. गितांजली नाईक, लेखिका व क्रुतिशील शिक्षिका कल्पना मलये, उद्योजिका वर्षु तळेकर, समाजिक कार्यकर्ते व उद्योजक सत्यवान मडवी, गुरुकुल अकॅडमी चे प्रमुख दत्ता केसरकर,युनिक स्पर्धा परीक्षा अकॅडेमी चे संचालक सचिन कोर्लेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी साद फाउंडेशना चा पहिला ‘सावित्री-ज्योती पुरस्कार सन्मान’ गुरकुल अकॅडमी कणकवली चे संचालक दत्ता केसरकर आणि त्यांच्या पत्नी छाया केसरकर या उभयतांना विशेष सन्मान करून जाहीर करण्यात आला. सदर पुरस्काराचे वितरण साद फाउंडेशन च्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
नाईक पुढे म्हणाल्या की, माझ्याही घरात पूजा अर्चा केली जाते परंतू कर्मकांड किंवा देवावर विसंबून न राहता सातत्याने प्रयत्न , मेहनत केल्यानेच आपला उद्धार होतो. त्याचप्रमाणे देव दगडात न शोधता माणसामध्ये शोधायला हवा, ज्या ज्या घटकांना गरज आहे त्यांना मदत केली पाहीजे. यासाठी समाजातील सेवाभावी व्यक्ती , संस्था यांच्या सहकार्याने गरजू, होतकरू, विद्यार्थी तसेच वंचीत,अन्यायग्रस्त,ज्येष्ठ स्त्री पुरुष अशा सर्वच घटकांच्या मदतीसाठी साद फाउंडेशन प्रामाणिक कार्य करण्याचा प्रयत्न करणार आहे.
लेखिका व शिक्षिका कल्पना मलये मॅडम यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाल्या की,स्त्रिया वेगवेगळ्या ठिकाणी स्वतः अडकून बसल्या आहेत स्वतःचे अस्तित्व ओळखून त्यांनी स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी स्वतःच्या पायावर उभं रहायला हवे,तेंव्हाच स्त्रियांचा विकास होईल. यावेळी ज्योती सावित्री सन्मान मूर्ती व 22 वर्ष अविरत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या कणकवलीतील नामांकित गुरुकुल अकॅडेमीचे प्रमुख दत्ता केसरकर सर यांनी ही या प्रसंगी अनमोल विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा अकॅडेमी चे संचालक सचिन कोर्लेकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा