कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य प्रशासनाचा निर्णय
वैभववाडी शहरात कोरोना पाॕझिटीव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण वैभववाडी शहर कंटेंमेंट झोन करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. पुढचे काही दिवस संपूर्ण वैभववाडी बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे. बाजारपेठेतील फक्त मेडिकल सुरु रहातील. अशी माहीती तालुका वैदयकीय अधिकारी डाॕ.उमेश पाटील यांनी दिली आहे.
गेल्या आठ दहा दिवसात तालुक्यातील कोरोना संसर्ग वाढत आहे. रुग्णसंख्या दुप्पट होऊन ५०.पर्यंत पोहचली आहे. त्यातच गुरुवारी वैभववाडी शहरातील एका खाजगी डाॕक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर सांगुळवाडी येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांच्या संपर्कातील व्यक्तीचे स्वॕब घेण्यात येणार आहेत.
तर दोन दिवसापूर्वीच वैभववाडी शहरात चार कोरोना पाॕझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. नगरपंचायतीच्यावतीने संपूर्ण शहर निर्जुंकीकरण करणेसाठी वैभववाडी बाजारपेठ बुधवार दुपारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे खांबाळे येथे सापडलेले कोरोना पाॕझिटीव्ह रुग्ण हे वैभववाडी शहरात सार्वजनिक ठिकाणी वावरणारे असल्यामुळे शहरात आरोग्य विभागाच्यावतीने सर्व्हे करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने संपूर्ण वैभववाडी शहर कंटेंमेंट झोन करण्याचा निर्णय घेतला आहे. वाभवे तांबेवाडी ते अ.रा.विदयालय व नागरीवस्तीच्या भागाचाही यात समावेश करण्यात आला आहे.
सर्वांच्या आरोग्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत जसे नागरीकांनी सहकार्य केले तसेच सहकार्य या पुढेही करावे. शासनाने कोरोना संदर्भात दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करुन आपल्या बरोबर सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणे हे प्रत्येकाच्या हाती आहे.असे आवाहन डाॕ.उमेश पाटील यांनी केले आहे.