You are currently viewing ९ ते ११ जानेवारीला प्राथमिक फेरी

९ ते ११ जानेवारीला प्राथमिक फेरी

बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शिवाजी मंदिरला रंगणार

मुंबई –

मराठी नाट्य वर्तुळामध्ये महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या सुप्रिया प्रॉडक्शन्स आयोजित “बोलीभाषा एकांकिका स्पर्धे”ची अंतिम फेरी १८ जानेवारीला दादरच्या श्री शिवाजी मंदिर मध्ये रंगणार असून यावर्षी श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ, दीपक फरसाण मार्ट आणि व्हिजन व्हॉईस एन अ‍ॅक्ट यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होत आहे. या विशेष स्पर्धेचे हे सहावे वर्ष आहे.

स्पर्धेची प्राथमिक फेरी ९ ते ११ जानेवारी २०२३ या कालावधीत नेहरूनगर कुर्ला येथील प्रबोधन प्रयोग घर येथे होणार आहे. दरवर्षीप्रमाणेच महाराष्ट्रभरातून मराठी भाषेच्या विविध बोलींमधील एकांकिका सादर करणारे नाट्य संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. मराठी भाषेतल्या विविध बोलीतील एकांकिका या स्पर्धेमध्ये सादर होत असल्यामुळे आजवर या स्पर्धेचे वेगळे वैशिष्ट्य राहिले आहे. स्पर्धेत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख ५ जानेवारी आहे.

प्रसिध्द नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या संकल्पनेला प्रसिध्द नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांनी मूर्त रुप दिले आणि २०१६ पासून ही स्पर्धा सुरु झाली. गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रभरातून अनेक बोलींमधून २०० हून अधिक संघ तर ५००० हून अधिक कलावंत या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत.

रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिकांचे स्वरुप असून प्रथम चारसांघिक विजेत्यांसाठी अनुक्रमे २५०००, २००००, १५००० व ५००० अशी पारितोषिके आहेत. प्रथम पारितोषिक विजेत्या संघाला नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार पुरस्काराने गौरवण्यात येणार असून हे पारितोषिक प्रख्यात अभिनेते अशोक सराफ व त्यांचे बंधू सुभाष सराफ यांनी पुरस्कृत केले आहे.

या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश, पार्श्संगीत, रंगभूषा, वेशभूषा, विनोदी लेखन, विनोदी अभिनय, वाचिक अभिनय, व्यवस्थापन या सर्वच घटकांसाठी या विविध क्षेत्रांमध्ये काम केलेल्या दिग्गज कलावंतांच्या नावे पुरस्कार देण्यात येतात.

स्पर्धेची संपूर्ण माहिती, नियमावली व प्रवेश अर्ज
www.Supriya production.com
या वेबसाईटवर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी ८१०८०४०३९३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संघांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा