You are currently viewing इचलकरंजीत २७ डिसेंबरपासून राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

इचलकरंजीत २७ डिसेंबरपासून राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

इचलकरंजी / प्रतिनिधी

येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा चॅरिटेबल व रिसर्च फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे २४वे वर्ष असून मंगळवार दिनांक २७ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता या स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. सदरच्या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्राच्या विविध भागातील ३७ संघांना प्रवेश देण्यात आला आहे. स्पर्धेचे परीक्षक या नात्याने प्रसिद्ध रंगकर्मी प्रभाकर वर्तक – कोल्हापूर, चंद्रशेखर भागवत – पुणे आणि सौ. मेधा दिवेकर – मुलुंड हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मंगळवार दिनांक २७ डिसेंबर रोजी दुपारी एक पासून येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात स्पर्धा सादरीकरणास सुरुवात होईल. या दिवशी, बिटवीन द लाईन्स – महाद्वार मुंबई, पोशिंदा जगाचा – मिरज महाविद्यालय मिरज, आनंद – नाट्य शुभांगी जयसिंगपूर, जखमा उरातल्या ह्या – शारदा रंजन मंच कोल्हापूर, अल्झायमर – वसंतदादा पाटील कॉलेज सांगली, ठेविले अनंते तैसेंचि – बालाजी जुनिअर कॉलेज इचलकरंजी, श्री श्री १०८ दगड – डी डी शिंदे सरकार कॉलेज कोल्हापूर आणि विठाई – राजाराम महाविद्यालय कोल्हापूर या एकांकिका सादर होणार आहेत.

दुसऱ्या दिवशी बुधवारी २८ डिसेंबर रोजी इंट्रोगेशन – युफोरीया आर्ट्स इचलकरंजी, जंगल जंगल बटा चला है – परिवर्तन कला फाउंडेशन कोल्हापूर, स्मारकाची गजाल – महावीर महाविद्यालय कोल्हापूर, चफी – विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, धिंड – गणेश नाट्यकला मंच मंगसुळी, पांढऱ्या घोड्यावरचा राजपुत्र – हापूस क्रिएशन इस्लामपूर, लेखकाचा कुत्रा – मिलाप थिएटर पुणे, गडद निळ्या सावल्या – द फोर्थ वॉल गोवा, आबूटभर – संघ संगती नाट्यसंस्था शिराळा आणि हिडिओ – गायन समाज देवल क्लब कोल्हापूर या एकांकिका सादर करण्यात येतील.

गुरुवार दिनांक २९ डिसेंबर रोजी मर्सिया – समांतर सांगली, जन्नत उल फिरदौस – डी आर के कॉलेज कोल्हापूर, उत्कट आशेला क्षितिज नसते – साई कला मंच इचलकरंजी, आमुशा – सृजन सावंतवाडी, दोघातील एकाची गोष्ट – शांतिनिकेतन ललितकला महाविद्यालय सांगली, हा वास कुठून येतोय ? – रंगयात्रा नाट्यसंस्था इचलकरंजी, होतं असं कधी कधी – इव्हाॅलवीन मीडिया कोल्हापूर, ब्लाइंड स्पेस – स्टोरीया प्रॉडक्शन कल्याण, हात धुवायला शिकवणारा माणूस – अभिरुची कोल्हापूर आणि पत्रास कारण की – यथार्थ सांस्कृतिक प्रतिष्ठान सांगली या एकांकिका होतील.

स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी शुक्रवार ३० डिसेंबर रोजी आर ओ के – बाराखडी नाट्यमंडळी सातारा, पाऊसपाड्या – रंगधुंद नाट्य संस्था चिंचवड, यशोदा – कलादर्शन पुणे, जाहला सोहळा अनुपम – पंचमवेद रंगमंच पुणे, सुपारी – एस एम प्राॅडक्शन पुणे, विभवांतर – कलासक्त मुंबई, डोक्यात गेलंय – ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे, आखाडा – एकदम कडक नाट्यसंस्था मुंबई आणि तुम्ही ऑर नॉट टू मी – आर आय टी इस्लामपूर या एकांकिका सादर करण्यात येतील. स्पर्धेचा बक्षीस समारंभ याच दिवशी होणार आहे.

या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र तसेच गोवा येथील नाट्य कलाकारांचा उत्स्फूर्त कलाविष्कार पाहण्याची संधी इचलकरंजी आणि परिसरातील रसिकांना मिळणार असून स्पर्धा पाहण्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे. रसिकांनी या कलाविष्काराचा आस्वाद घेण्यासाठी जरूर यावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा