‘वाहतूक कोंडीपासून सुटका’ !! एप्रिल पासून जलवाहतूक सुरू…

‘वाहतूक कोंडीपासून सुटका’ !! एप्रिल पासून जलवाहतूक सुरू…

 

नवी मुंबई:

 

सिडकोच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या नेरुळ जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर मुंबई, नवी मुंबई आणि मांडवा ही पहिल्या टप्प्यातील जलवाहतूक सुरू होणार आहे. कोरोना महामारीमुळे या कामांची गती मंदावली होती, मात्र आता पुन्हा काम वेगात सुरू झाले आहे.

 

मुंबई आणि नवी मुंबई जलमार्गाने जोडण्यासाठी एप्रिल २०१८ मध्ये नेरुळ जेट्टीच्या उभारणीला मंजुरी मिळाली. या जेट्टीवर सुमारे १११ कोटी रुपये खर्च होणार आहेत. हे काम दोन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र वनविभागाची ना हरकत मिळण्यास जवळपास १६ महिन्यांचा विलंब लागला. त्यामुळे काम उशिराने सुरू झाले. अनेक अडथळे पार करून सुरू झालेले जेट्टीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. शिवसेना खासदार राजन विचारे यांनी आज जेट्टीला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, जिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, शहर प्रमुख विजय माने यांच्यासह सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

*अडीच तासाचा प्रवास २५ मिनिटांवर*

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारने जल प्रवासी वाहतुकीला विशेष प्राधान्य दिले आहे. मुंबई, ठाणे नवी मुंबई, अलिबाग, मांडवा या ठिकाणांना जोडणाऱ्या जलवाहतुकी मधील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. जलवाहतूक सुरू झाल्यानंतर रस्ते मार्गाने होणारा अडीच तासांचा प्रवास थेट २५ मिनिटांवर येणार आहे, अशी प्रतिक्रिया खासदार राजन विचारे यांनी यावेळी व्यक्त केली.

 

*मेरीटाईम बोर्डाला हॅन्डओव्हर करणार*

प्रवासी जलवाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या नेरुळ जेट्टीचे काम उशिराने सुरू झाले आहे. मात्र हे काम येत्या पाच महिन्यात पूर्ण करून जेट्टी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला हॅन्ड ओव्हर करण्यात येणार आहे, असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा