मालवण
अरुण विजय गावडे वय 24 हा मालवण तालुक्यातील गोळवण या गावातील युवक जून 2014 साली आपल्या आई वडिलांना कामानिमित्त गोवा येथे जात असल्याचे सांगून निघून गेला होता. त्यानंतर आजपर्यंत गेली 6 वर्षे त्याचा कोणताच पत्ता नव्हता. आई वडिलांना फोन नाही किंवा काहीच नाही. त्यामुळे त्याच्या आई वडीलांनी कट्टा पोलीस ठाण्यात आपला मुलगा हरवला असल्याची तक्रार दाखल केली होती. अनेक वर्षे लोटली. परंतु मुलाचा पत्ता लागत नव्हता. पोलीस ठाण्यातील अंमलदार बदलले पण तरीही त्याची कोणतीही माहिती मिळाली नाही. मुलगा परत यावा मिळावा यासाठी आई वडिलांनी अनेक उपास केले, नवस केले. अखेर त्याच्या हाकेला परमेश्वर धावला तो कट्टा पोलीस ठाण्यातील पोलीस रुक्मांगद मुंडे, योगेश सरफदार आणि संतोष पुटवाड यांच्या रूपाने. अरुण गावडे याचे जुन्या नंबरचे सिमकार्ड मुदत संपल्याने बंद होणार होते त्यासाठी त्या सिमकार्डवर रिचार्ज करण्यासाठी कंपनीकडून फोन आला. आणि तो फोन त्याच्या घरी आला. ही बाब त्याच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन सांगितली. त्यानुसार कट्टा पोलीसांनी पुन्हा त्या कंपनीला संपर्क साधून त्या सिमकार्डचे लोकेशन मिळवले आणि त्यानुसार अरुण गावडे याचा पणजी येथे एका हॉटेलमध्ये पत्ता मिळाला. त्यानुसार सर्व जाबजबाब पूर्ण करुन त्याला आज गोवा येथून सिंधुदुर्गात आणून मालवण कट्टा येथे पोलीस ठाण्यात त्याच्या आई वडीलांच्या स्वाधीन करण्यात आले. 6 वर्षांनी एकुलत्या एक मुलाची भेट झाल्यानंतर आई वडिलांच्या अश्रूंचा बांध पोलीस ठाण्यात फुटला. तो प्रसंग पाहून समोर असलेली खाकी गर्दीही गहिवरली. पोलीस हे आपल्यासाठी खरोखरच परमेश्वर ठरले असल्याची भावुक मत त्यांनी व्यक्त केले.