You are currently viewing कणकवली येथील श्रीधर नाईक उद्यानाचे २२ जून रोजी करण्यात येणार लोकार्पण….

कणकवली येथील श्रीधर नाईक उद्यानाचे २२ जून रोजी करण्यात येणार लोकार्पण….

नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष हर्णे यांची माहिती

कणकवली

चौपदरीकरणाच्या कामात बाधित झाल्यानंतर कणकवली शहरातील जुने असलेले श्रीधर नाईक उद्यान गेली काही वर्ष बंद होते. या उद्यानाच्या कामाचे गतवर्षी भूमिपूजन केल्यानंतर आता या उद्यानाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळे येत्या 22 जून रोजी सकाळी 11 वाजता या श्रीधर नाईक उद्यानाचे लोकार्पण करण्यात येणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात बाधित झाल्यामुळे हे उद्यान कणकवली शहरवासियांसाठी गेले दोन वर्ष बंद होते. त्यानंतर या उद्यानाच्या सुशोभीकरणा करिता जिल्हा नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

या निधीच्या माध्यमातून हे उद्यान पुन्हा एकदा सुसज्ज असे करण्यात आले असून, जनतेसाठी हे उद्यान 22 जून रोजी खुले होणार आहे. महामार्गालगत असल्यामुळे या उद्यानात यापूर्वी कायमच गर्दी असायची. त्यामुळे शहरवासीयांना एक संध्याकाळच्या वेळेत मोकळा श्वास घेण्याकरिता हे उद्यान महत्त्वपूर्ण ठरत होते. त्यामुळेच या उद्यानाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात आले. श्रीधर नाईक स्मृती दिनाच्या निमित्ताने 22 जून रोजी होणाऱ्या या उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे, वैभव नाईक, दीपक केसरकर व जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधींना देखील या लोकार्पण सोहळ्याला निमंत्रित करण्यात येणार असल्याचे श्री नलावडे व श्री हर्णे यांनी सांगितले. कणकवली शहरातील महत्त्वाचं उद्यान असल्यामुळे हा कार्यक्रम देखील भव्यदिव्य करणार असल्याचे श्री नलावडे व श्री हर्णे यांनी सांगीतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा