You are currently viewing आमदार नितेश राणेंचा सत्तेचा माज जनताच उतरवेल

आमदार नितेश राणेंचा सत्तेचा माज जनताच उतरवेल

आमदार वैभव नाईक व शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांची घणाघाती टीका

कणकवली

कणकवली तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत आमदार नितेश राणेंनी मतदारांना धमकी दिली. सत्तेचा माज कसा होतो हे नितेश राणेंनी दाखवून दिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पालकमंत्री , जिल्हाधिकारी माझ्या खिशात आहेत.असे त्यांनी जाहीर रित्या सांगितले आहे. याआधी सुद्धा नारायण राणे मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील त्यांना असाच सत्तेचा माज होता. त्यावेळी सिधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने राणेंचा सत्तेचा माज उतरविला होता. आता पुन्हा हि प्रवृत्ती फोफावत आहे.अशा प्रवृत्तीला मात्र जिल्ह्यात थारा देता कामा नये. प्रा. मधु दंडवते, बॅ. नाथ पै. यांचा वारसा असलेला सिंधुदुर्ग जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यात अशा प्रवृत्तीला येथील जनता थारा देणार नाही. आमदार नितेश राणेंचा सत्तेचा माज जनताच उतरवेल असा विश्वास कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांनी व्यक्त करत आ.नितेश राणेंवर घणाघाती टीका केली.

आ. वैभव नाईक पुढे म्हणाले, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या नांदगाव सोसायटी निवडणुकीत नांदगावातील ग्रामस्थांनी शिवसेनेवर विश्वास दाखविला तसाच विश्वास ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही जनता शिवसेनेवर दाखवेल.होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आ. नितेश राणे यांचा पराभव अटळ झाला आहे.जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जास्तीत जास्त ग्रामपंचायती निवडून येणार आहेत. आणि म्हणून नितेश राणे मतदारांना धमकी देऊन सत्तेचा माज दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. याधीसुद्धा नारायण राणे मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील त्यांना असाच सत्तेचा माज होता. त्यावेळी सिधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने राणेंचा सत्तेचा माज उतरविला होता. मुख्यमंत्री झालेले राणे देखील पराभूत झाले होते.आताची सत्ता हि कोर्टाच्या आदेशाने कधीही पडू शकते. आणि त्यामुळेच मंत्री मंडळाचा विस्तार होत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खिशात असलेल्या आ. नितेश राणेंना सत्ता असून देखील मंत्रिपद मिळालेले नाही. आणि ते कधीही मिळणार नाही.
शिवसेनेच्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास झाला तसाच गावचा विकास ग्रामपंचायतच्या माध्यमातून होईल. जिल्ह्यातील जनतेला अपेक्षित विकास केला जाईल अशी खात्री आ. वैभव नाईक यांनी दिली. निवडणुका येतील आणि जातील मात्र अशा प्रवृत्तीला जिल्ह्यात थारा देता कामा नये. प्रा. मधु दंडवते, बॅ. नाथ पै. यांचा वारसा असलेला सिंधुदुर्ग जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा अशा प्रवृत्तीला येथील जनता थारा देणार नाही असा विश्वास आ. वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत म्हणाले, सत्तेचे विकेंद्रीकरण हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले तत्व पायदळी तुडविण्याचे काम आ. नितेश राणे करत आहेत. दोन वेळा आमदार असलेल्या व्यक्तीने असे वक्तव्य करावे आणि ग्रामस्थांना विकास न करण्याची धमकी द्यावी त्या माणसाला लोकप्रतिनिधी म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार नाही. माझ्या नांदगाव मधील जनता सुज्ञ आहे. आम्ही अनेक वेळा लढा दिलेला आहे. निवडणुकीत जय पराजय हि गोष्ट वेगळी असते.आम्ही जिंकणार अशी आम्हाला खात्री आहे. नितेश राणेंचा सरपंच निवडून येणार नाही याची खात्री त्यांना असल्यानेच नितेश राणे असे वक्तव्य करत आहेत. तळागाळातील नागरिकांना न्याय मिळण्यासाठी आम्ही सुज्ञ व चारित्र्यवान उमेदवार दिलेले आहेत. त्यांनाच आपण निवडून देणे गरजेचे आहे. अशी विनंती त्यांनी नांदगाव वासियांना केली. आ. नितेश राणे यांच्या धमकीला उत्तर द्यायचे असेल तर आपण महाविकास आघाडीचा सरपंच विजयी करून देऊया असे आवाहन गौरीशंकर खोत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा