You are currently viewing मूकबधीर दिव्यांग मुलांसाठी निस्वार्थीपणे झटणारा एक “देवमाणूस”…गोकूळ घोरपडे

मूकबधीर दिव्यांग मुलांसाठी निस्वार्थीपणे झटणारा एक “देवमाणूस”…गोकूळ घोरपडे

*मूकबधीर दिव्यांग मुलांसाठी निस्वार्थीपणे झटणारा एक “देवमाणूस”…गोकूळ घोरपडे*

*स्वयं चलित निस्वार्थी सामाजिक संस्था, नाशिक*

काल परवा मी नाशिकला गेले होते. तेथे एका ठिकाणी मला *स्वयं* *चलित निस्वार्थ सामाजिक* *संस्था. नाशिक.* *संचलित निवासी मूकबधिर* *दिव्यांग मुला मुलींचे वसतीगृह* अशी पाटी दिसली. मी सहज आत गेले. तेथे दहा-पंधरा मुले आवाज न करता फक्त हावभाव करत खेळत होती. माझ्या लक्षात आलं हे मूकबधिर आहेत. त्यांच्या त्या फक्त हाव भावाने एकमेकाशी बोलण्याचं मला विशेष वाटलं. ती त्यांची विशेष लकब होती. कदाचित ती त्यांची काही सांकेतिक भाषाच असावी. मस्त खाणा खुणा करत फक्त गप्पा मारत होते.
मी समोर गेले तेव्हा समोरून साधारण 35 ते 40 वयोगटातील त्यांचे शिक्षक येताना दिसले. त्यांनी येऊन मला नमस्कार केला. आणि स्वागत करून आत बोलावलं. मोठा हॉल आणि लागून दोन तीन रूम असं एकत्र घर होतं. बाहेर अंगण होतं. तेथे ते राहतात त्या मुलांना घेऊन.
त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि मी ते ऐकून अवाक झाले. ते म्हणाले. “मॅडम,मी शिक्षक होतो. पण एक-दोन अशी मुले मला दिसली. आणि मी निश्चय केला अशाच मुलांना यापुढे सांभाळायचे दोन मुलांचे आता माझ्याकडे 16 मुले झालेत. चार मुली सुद्धा होत्या पण मी त्या घरी पाठवल्या कारण त्या आता मोठ्या झाल्या. आणि मला थोड जबाबदारीचं वाटल्यामुळे मी त्यांना घरी पाठवलं.
ते म्हणाले, मी लग्न करताना बायकोला अगोदरच विचारलं “मी असा आहे, माझं हेच ध्येय आहे, मला तू साथ देशील ? तीनेही कोणताही विचार न करता लगेच मला होकार दिला. आणि त्याचप्रमाणे आज ती 16 मुलांची आई झाली. माझी अर्धांगिनी म्हणून या मुलांच्या सेवेत ती रमून गेली. इतक्यात त्याही आल्या. स्वयंपाक करत होत्या. एवढ्या 16 मुलांचा स्वयंपाक करणं सोपी गोष्ट नाही. आपण चार माणसात कंटाळून जातो. पण त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान खूप काही सांगून गेलं. त्या उभयतांना एक दोन वर्षाचा मुलगा आहे. *कृष्णा* नाव त्याच. खूप गोड आणि गुणी मुलगा दिसला. ते म्हणाले आपण आयुष्यात येऊन काही चांगलं कार्य करणं सुद्धा गरजेचं आहे ना? चांगल्या मुलांना तर कोणीही शिकवेल. म्हणून माझ्यातील खरा शिक्षक जिवंत झाला आणि हा वसा मी घेतला मॅडम. माझ्यासमोर एक *देव माणूस* बसलेला मला दिसला. मी मनापासून त्याला सॅल्यूट केला.
ते म्हणाले, इथे जवळच माई लेले मूकबधिर विद्यालय आहे. तेथे रोज त्यांना शाळेत पोहोचवतो मी स्वतः. आणि घेऊन सुद्धा येतो. एवढेच माझं काम.सायंकाळी दोन तास अभ्यास घेतो.
घरातील सर्व कामे मुले स्वावलंबनाने करतात. त्यांचे जेवण वाढून घेणे, कपडे धुणे, कपडे उचलणे, गादी उचलणे, जेवणाचं ताट धुऊन घेणे हे कामे त्यांचे तेच करतात. त्यांना तशी सवयच लावली मी.काही कलाकार आहेत. उदा. सुंदर हुबेहूब चित्र काढुन रंगवणे,शिवराय, भगवान महावीर, सावित्रीबाई, अनेक पक्षांचे चित्रे मला दाखविली.कागदी वस्तु फुले सुध्दा हस्तकौशल्य करतात. मी मनात म्हटलं देवाने वाचा आणि श्रवण नाही दिली पण ती उणीव या मार्गाने भरुन काढलीय जणु.
ते म्हणाले, माझ्याशिवाय मुले राहत नाहीत. त्यांचं सर्वस्व मी झालोय. सायंकाळी समोर बगीच्या आहे तेथे घेऊन जातो खेळायला. खेळतात ते त्यांच्या त्यांच्याबरोबर. कधी कधी मीही त्यांच्याबरोबर खेळतो मीही त्यांच्यासारखा होऊन जातो लहान. त्यांची जी भाषा आहे ती आता मलाही कळू लागली. त्यामुळे मी पण हातवारे करूनच त्यांच्याशी बोलतो.
त्यांचे आई वडील वर्षांनी कधीतरी येतात भेटायला. त्यांची कोणतीही मदत नाही. पण मी निर्धार केला आहे तो पूर्ण करणार.
मी सरांना विचारलं. तुम्ही हे कसं सांभाळता ? इतका हा सगळा खर्च काही शासकीय अनुदान मिळतं का तुम्हाला ? तेव्हा ते म्हणाले, ” काहीही नाही “कोणतेही अनुदान नाही. कोणाचीही मदत नाही. काही ठराविक दाते आहेत ते मदत थोडीफार करतात. ते लोक मला येऊन धान्य किंवा भाजीपाला किंवा कपड्यांच्या स्वरूपात मुलांना देऊन जातात. बाकी मी आहेच. मी स्वतः मॅनेज करतो.मला खूप विशेष वाटलं. असं चांगल्या कामाला सरकारी अनुदान नाही म्हणजे काय ,?
मी मनात म्हटलं हा *देव माणु स* किती चांगलं कार्य करतोय ? मी दोघांनाही शुभेच्छा दिल्या यथाशक्ती माझ्याकडून आर्थिक मदत दिली आणि त्यांचा निरोप घेतला आज एका देव माणसाला भेटल्याचा मनापासून समाधान वाटलं.
( आपणास जर सरांशी बोलायचं किंवा काही विचारायचं असल्यास त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देते नक्की बोला मदत नाही दिली तरी त्यांना पाठिंबा नक्की मिळेल.
हा देवमाणूस म्हणजे…*गोकुळ घोरपडे ( 9021590045)*

✒️ *शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा