You are currently viewing आनंदी आणि समृद्ध जीवनाकडे

आनंदी आणि समृद्ध जीवनाकडे

*ब्रिगे. सुधीर सावंत यांचा लेख*

 

औद्योगिक क्रांती सुरु झाली. चीन इंजिनच्या निर्मिती नंतर जगामध्ये औद्योगिक क्रांतीमुळे मानवी जीवनाचा कायापालट झाला. ज्याला रोजगाराची गरज होती ते सर्व शहराकडे पळाले आणि अतिशय गलिच्छ् वातावरणात जगू लागले. जवळ जवळ ३० मजली इमारती उभ्या राहिल्या. इमारतीच्या पाठीमागे उघडी गटारे होती. अशा गलिच्छ् वातावरणात औद्योगिक क्रांतीमध्ये मानवी जीवन सुरु झाले. त्यावेळी समाजात समज होता कि शहर म्हणजे गुन्हेगारीचे केंद्र.

शहराच्या निर्मितीमुळेच मानवाच्या जीवनामध्ये नैतिकता नष्ट होत गेली. ग्रामीण सामाजिक जीवनाचे अनेक लेखकांनी समाजातील उच्च वर्गाने रोमांचक असे चित्र उभे केले. ग्रामीण जीवन म्हणजे सुंदर, नैसर्गिक, आध्यात्मिक, नैतिक असे जीवन. सरंजामदारी, जमीनदारीमुळे, समाजातील उच्च वर्ग हा ग्रामीण भागातच राहत होता आणि समाजातील बेकार लोकांची संख्या शहरात वाढत गेली. जेथे आरोग्य नव्हते, १६ – १६ तास लोकांना काम करावे लागायचे, गुन्हेगारांच्या टोळ्या गल्ली गल्ली मध्ये उभ्या राहिल्या. व्यसनाधीन शहरे निर्माण झाली. दारूचे अड्डे, वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत गेले. त्याचबरोबर टी.बी., कॉलरा, प्लेग सारखे रोग पसरत गेले. आणि मानवाची स्थिती जनावरांपेक्षा बिकट झाली. मार्क्सने शहरांना भांडवल (capital) असे संबोधले.

स्टीम इंजिनमुळे स्वयंचलित उपकरणे निर्माण झाली आणि उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढले. त्यामधून एक नविन श्रीमंतांचा वर्ग निर्माण होत गेला. बऱ्याच ठिकाणी या नविन श्रीमंतांना हिणवले जायचे. त्यांना खालच्या दर्जाचे प्राणी असे पण संबोधले जायचे. त्यावेळी ग्रामीण भागात राहणारे जमीनदार/ सरंजामदार यांना उच्च जातीचे समजले जात होते. समाजात त्यांचे स्थान निकृष्ट होते. कितीही श्रीमंत माणूस असला तर त्याच्या मुलांचे लग्न खानदानी कुटुंबात होत नव्हते. हळूहळू भांडवलशाहीमुळेच कारखानदार प्रचंड श्रीमंत होत गेले. जसे टाटा – बिर्ला, पैशामुळे राजे राजवाड्यांच्या प्रभावाला विरोध करू लागले. त्यातूनच लोकशाहीची कल्पना उमलू लागली. त्या काळात वसाहतवाद वाढत गेला आणि युरोपियन देशांनी पूर्ण जगावर कब्जा केला. लोकशाहीच्या उगमामुळे पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये १६४९ ला राजा विरुद्ध बंड झाले. त्यात राजाचा पराभव झाला. ही लढाई जगामध्ये एक क्रांतिकारी बदल घडवून गेली. शेवटी एकीकडे राजाचे सैन्य आणि दुसरीकडे ऑलीव्हर क्रोमवेल याच्या नेतृत्वाखाली पार्लमेंटचे सैन्य उभे राहिले. लोकांनी राजेशाहीला विरोध केला आणि इंग्लंडच्या राजाला भर चौकामध्ये फाशी देण्यात आली. तसेच अनेक ठिकाणी जमीनदारांचे खून पाडण्यात आले. या रक्तपातावर इंग्लंडची लोकशाही उभी राहिली. ही औद्योगिक क्रांतीची पहिली ठिणगी. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज १९ वर्षाचे होते आणि इंग्लंडमध्ये झालेल्या संघर्षाची त्यांना पूर्ण माहिती होती. म्हणूनच त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. सरंजामशाही नष्ट केली. शेतकऱ्यांना आधार दिला. परिणामत: महाराष्ट्रातील मावळे शिवरायांसाठी मर-मिटायला तयार होते. कारण शिवरायांनी बदलत्या समाजाची दिशा ओळखली आणि कल्याणकारी राज्य निर्माण केले. ही व्यवस्था जगामध्ये प्रचलित झाली. ती आतापर्यंत पुढे आलेली आहे.

अशा अनेक क्रांत्या जगामध्ये झाल्या आणि राजेशाही जवळ जवळ नष्ट झाली आहे. लोकशाही ही भांडवलदारांच्या हातात गेली. त्यात कामगारांचे प्रचंड शोषण झाले आहे. म्हणूनच कार्लमार्क्स नंतर कम्युनिस्ट साम्यवादी चळवळ उभी राहिली. या संघर्षामध्ये लोकांचे राहणीमान आणि जीवन सुधारण्याचा प्रयत्न झाला व हळूहळू मानवाचे शहरातील जीवन सुसहय झाले. शहरात सुखसोयी वाढत गेल्या. मोठमोठे रस्ते, पाणी, टेलिफोन, टेलीव्हिजन येत गेले आणि शहरी जीवन पद्धतीला महत्त्व आले. लोकांच्या मागणीच्या रेट्यामुळे शहरे सुधरू लागली. पण लोकसंख्या देखील वाढत गेली. गावाकडून शहराकडे पलायन मोठ्या प्रमाणात सुरु राहिले. आता बरीचशी शहरे राहण्या लायक नाहीत. त्यातूनच पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. आता जगबुडीवर आले तसे आंतरराष्ट्रीय स्तरावर मेळावे, मिटिंग होत आहेत. जगाला वाचवण्यासाठी अनेक नविन नविन कल्पना निर्माण होत आहेत. पण कितीही सुधारणा झाल्या तरीही शहरी जीवन हे गलिच्छच आहे व ग्रामीण दरिर्द्री असले तरी भारताची बहुसंख्य लोकसंख्या अजून देखील गावातच राहते. पण गाव काही सुधारत नाहीत.

आजच्या जगात आपल्याला नविन दृष्टीकोनातून विकास करावा लागणार आहे. म्हणूनच आम्ही ‘समृद्ध आणि आनंदी गाव’ ही कल्पना समोर आणली आहे. यासाठी गावातील आणि शहरातील लोकांनी एकत्र येऊन विकास करायचा आहे. गावामध्ये आनंद आला पाहिजे. ही संकल्पना कोणत्याच पक्षाने मांडलेली नाही. केवळ पैशाने आनंद मिळत नाही. आनंदी होण्यासाठी अनेक गोष्टी लागतात. सर्वात प्रथम आरोग्य. चांगल आरोग्य निर्माण करण्यासाठी पोषक आहार, व्यायाम, क्रीडा, योगा, या सर्व गोष्टी गावागावात निर्माण झाल्या पाहिजेत. आता किती गावात क्रीडांगणे आहेत याची कल्पना सर्वांनाच आहे. जोपर्यंत गावागावामध्ये क्रीडा विकसित होत नाहीत, तोपर्यंत भारताला जागतिक क्रीडा स्पर्धामध्ये मान खाली घालूनच परत यावे लागेल. आरोग्य उत्तम राहिले तरच लोक आनंदी राहू शकतात. दुसरा मोठा विषय रोजगार. गावागावात रोजगार निर्माण झाला तर गावे समृद्ध होतील. उद्योग शहरात उभे राहतात, म्हणून ग्रामीण भागातून तरुण शहराकडे धावत असतात. म्हणून गावामध्ये उद्योग उभे केले पाहिजेत. ग्रामीण युवकांना आणि महिलांना रोजगार मिळवून दिला पाहिजे. इंटरनेटमुळे आता ते सहज सोपे झाले आहे. गावामध्ये उद्योग उभे करायचे नाहीतर नैसर्गिक शेतीतून विषमुक्त अन्न तयार करणे, ज्याला चांगले दर मिळतात, तसेच कृषि पर्यटन, ग्राम पर्यटन, न्याहारी निवास योजना व गावामध्ये उत्पादीत सामानावर प्रक्रिया करणे व त्याची विक्री व्यवस्था निर्माण करणे.

गोसंवर्धन चळवळ व पशुसंवर्धन हे ग्रामीण जीवनाचा महत्वाचा भाग आहे. उत्पादन आणि उत्पन्नाचे साधन आहे. बचत गटाद्वारे गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी पालन, मत्स्यपालन करणे सहज शक्य आहे. प्रत्येक गाव हे Wi-Fi युक्त पाहिजे, म्हणजे गावातील लोकांना जगाचे ज्ञान मिळविण्यासाठी काही अडचण येणार नाही. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वेगवेगळी साधने उपलब्ध करता येतील. गाव प्रगती पथावर नेण्यासाठी स्थानिक नेतृत्व निर्माण होईल. त्यासाठी इंटरनेटद्वारे जगाशी संवाद साधता येईल व मार्गदर्शन घेता येईल. गावातील शेतमालावर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण घेता येईल व त्या आधारावर उद्योग सुद्धा उभारता येतील. कृषि माल व बचतगटांना बाजारपेठ उपलब्ध होईल. हे सर्वच तेव्हाच साध्य होईल, जेव्हा गावामध्ये विकासाची दिशा एकसंघपणे ठरेल.

अशा सर्व गोष्टीतून समृद्धी गावाकडे वाहत जाईल. तसेच गावामध्ये पाणी, स्वच्छता, पर्यावरणाचे संतुलन व वीज निर्मिती अशा सर्व गोष्टी जर आपण करू शकलो तर गाव समृद्ध आणि आनंदी होईल. या निवडणुका म्हणजे केवळ रस्ते बांधणे नव्हे, पाणी पुरवठा करणे नव्हे, तर ‘आनंदी आणि समृद्ध गाव’ हे उद्दीष्ट असले पाहिजे. त्याची सुरुवात शिंदे साहेबांनी केली आहे. त्याच्यामध्ये सर्व जनतेने सहभागी होऊन आपले जीवन सुखकर बनवावे असे मी आवाहन करत आहे.

 

लेखक: ब्रिगे. सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा: 9987714929

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 18 =