You are currently viewing जखमांसाठी मलम बनवणे कळते आहे

जखमांसाठी मलम बनवणे कळते आहे

*मराठी बालभारती, थीम साँग, शॉर्ट फिल्म आदींसाठी लेखन केलेल्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.सुनंदा सुहास भावसार, नंदुरबार लिखित अप्रतिम गझल रचना*

जखमांसाठी मलम बनवणे कळते आहे
जीवन आहे एक लढाई ,लढते आहे !

उशीर झाला!हरकत नाही,गणित समजले…
सोडविण्याचा प्रयत्न आता,करते आहे !

मुलगी म्हणुनी इतरांचे मन जपले मी तर…
आज स्वतःचे मनही जपणे ,जमते आहे

आंबट खारट तिखट तुरट अन कडूगोडही…
चवीचवीने जीवन मीही जगते आहे !

शिरस्त्राण अन चिलखत आहे शरिरासाठी !
काळजासही कवच घालणे शिकते आहे !

कर्णार्जुन ही नवी भूमिका व्हावी सुंदर… !
अता कृष्ण मी माझ्यासाठी …बनते आहे !

दर्द समजला दर्दीसुद्धा बनले आहे…
आयुष्याची गझल नव्याने सुचते आहे…

©®सौ.सुनंदा सुहास भावसार
दि.३०-११-२०२२ बुधवार
मार्गशीर्ष अष्टमी

प्रतिक्रिया व्यक्त करा