You are currently viewing जीवना माझ्याच काचांवर मला तू नाच म्हण

जीवना माझ्याच काचांवर मला तू नाच म्हण

*गझलेच्या क्षेत्रातील शिवाजी म्हणून ओळख असणारे अहमदनगर येथील डॉ.शिवाजी काळे यांची अप्रतिम गझल रचना*

जीवना माझ्याच काचांवर मला तू नाच म्हण
मी शहाण्यासारखा जगलो तरी वेडाच म्हण

चांगले घडणार असले तर चुकू द्यावे गणित
एकदा तू दोन गुणिले दोन म्हणजे पाच म्हण

जर तुझ्या हळव्या मनाला वाचता येतो दगड
तर भुगा माझ्या मनाचा फुरसतीने वाच म्हण

वर्षभर हृदयामधे हा गारवा टिकतो कसा ?
श्रावणाला यापुढे माझ्यामधेही साच म्हण

स्वत्व जपताना पुसटशी रेघ आपण ओढली
पाहिजे तर आपल्या नात्यातली तू खाच म्हण

मी तुझ्या दिसण्यात माझी सुप्त इच्छा माळतो
लाजण्याच्या आग्रहाला तू हवे तर जाच म्हण

पूर्ण जीवन अर्पिले कुठल्या अपेक्षेने तुला ?
मात्र तू मोक्षाकरीता मी दिलेली लाच म्हण

प्रश्न जखमी काळजाचे शांत बसतिल वेदने
फक्त जीवापाड जपलेल्या फुलाला काच म्हण

मूर्तता देणार आहे मीच त्यांना शेवटी
घे शिवाचा ध्यास किंवा कृष्णही माझाच म्हण

डॉ. शिवाजी काळे

प्रतिक्रिया व्यक्त करा