बांदा
विलवडे – वरचीवाडी येथील शुभांगी सदाशिव दळवी (३४) या विवाहितेने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी तीने विष घेतले होते. स्थानिकानी त्याला उपचारासाठी सावंतवाडीत खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी बांबोळी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. बांबोळी रुग्णालयात शुभांगी यांची तब्येत उपचारांना साथ देत नव्हती. अखेर रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. शुभांगी यांनी आत्महत्येचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण समजू शकले नाही.
बांबोळी रुग्णालयातून विलवडे सरपंच दिनेश दळवी, गणेश दळवी, प्रदिप दळवी, बाबुराव दळवी, विश्राम दळवी, कालिदास दळवी, माजी उपसभापती विनायक दळवी, सोनू दळवी आदी स्थानिकांनी सोमवारी सायंकाळी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. गोवा पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे. अंत्यविधी मंगळवारी सकाळी होणार आहे. त्यांच्या पश्चात पती, सासरा, तीन मुली असा परिवार आहे. विलवडे छत्रपती शिवाजी पतसंस्था लिपिक सदाशिव दळवी यांच्या त्या पत्नी होत.